Saturday, February 12, 2011

उंदीर आणी प्रशासन


मंत्रालयातील सामान्य प्रशासन हा अतिशय महत्वाचा विभाग. श्री करडे, ह्या विभागातील एक अतिशय कर्मठ कर्मचारी. सेवानिवृत्तीला एक वर्ष राहिले असताना कक्ष अधिकारी म्हणून पदोन्नती झालेली. सर्व कायदे मुखोद्गत, कायद्याचा किडा म्हणूनच प्रसिद्धी. काम झाले नाही तरी चालेल पण कायदे, नियम मात्र पाळले गेलेच पाहिजे हा सततचा अट्टाहास. त्यामुळेच कोणाशीच न पटणारी ही व्यक्ती. सामान्य प्रशासन विभागातील भांडार म्हणजे एक मोठं कक्ष आणी त्यात ३०-४० racks, जुन्या पुराण्या असंख्य files त्यात ठेवलेल्या. ह्या साठी एक कक्ष अधिकारी आणी एक शिपाई एवढाच staff. फायीलींची आवक जावक आणी त्यांच्या नोंदी ठेवणे एवढेच काम. कोणालाच नको असणारया श्री करडे ह्यांना साहजिकच पदोन्नती नंतर ह्या भांडारात पाठविण्यात आले.

एक दिवशी सकाळी ११ वाजता आपल्या खुर्चीत बसले असता श्री करडे ह्यांना एक उंदीर दिसला आणी त्यांचे विचारचक्र सुरु झाले. कायदे आणी नियमाचा किडा ते, एक नस्ती (file ) घेतली आणी कागदावर लिहिण्यास सुरवात केली. " दिनांक .. वेळ . विषय: उंदीर आणी त्यामुळे शासनाचे होणारे संभावित नुकसान - आदरणीय महोदय, आज सकाळी खुर्चीवर बसलेलो असताना सकाळी ११ वाजून १७ मिनिटांनी एक उंदीर मला rack क्रमांक ९ समोरून निघून rack क्रमांक १० खाली गेलेला दिसला. ह्या कक्षात अनेक अतिशय महत्वाच्या files आहेत, हा उंदीर त्या files नष्ट करण्याची शक्यता नाकारता येत नाही. मला सेवानिवृत्तीला फक्त १० महिने राहिलेले आहेत. ह्या files व्यवस्थित राखणे माझी नियम क्रमांक ..... नुसार जबाबदारी आहे. परंतू ह्या उंदरावर कोणतीही कार्यवाही करण्याचा नियम क्रमांक ..... नुसार मला अधिकार नाही. त्यामुळे ह्या विषयावर त्वरित कार्यवाही न झाल्यास आणी काही महत्वाच्या files नष्ट झाल्यास मी जबाबदार राहणार नाही. शेवटच्या ओळीवर लाल शाईने अधोरेखांकित केले. खाली आपली स्वाक्षरी केली. त्याखाली नियमानुसार सेवा जेष्ठतेनुसार अवर सचिव, उप सचिव, सचिव आणी प्रधान सचिव ह्याची नावे लिहिली. file ला "प्रथम प्राधान्य", "अति महत्वाचे", "तातडीचा निर्णय" "विशेष दुताद्वारे" असे ४-५ लाल रंगाचे tags लावले. शिपायाला बोलावून ही file तत्काळ अवर सचिवांकडे घेवून जाण्याचे आदेश दिले. शिपाई file घेवून अवर सचिवांच्या कक्षात गेला. सामान्यतः मंत्रालयात कोणत्याच file वर तातडीने निर्णय होत नसतो. ४-५ tags लावलेली file, शेवटचे फक्त लाल शाईने अधोरेखांकित केलेले वाक्य वाचले. विचार केला "काही तरी भंयकर प्रकरण दिसतंय, न वाचताच आपली लहान स्वाक्षरी केली आणी त्याच शिपायाला ही file उप सचिवांकडे घेवून जाण्याची सूचना दिली. " ह्या विषयावर त्वरित कार्यवाही न झाल्यास आणी काही महत्वाच्या files नष्ट झाल्यास मी जबाबदार राहणार नाही" हे लाल शाईने अधोरेखांकित केलेले वाक्य वाक्य पाहून वरील अधिकार्यांनीही न वाचता सही करून शेवटी शिपाई ही file घेवून प्रधान सचिवांच्या कक्षात गेला. त्यांनीही शेवटचे वाक्य वाचले आणी त्याखालील सर्वांच्या सह्या पहिल्या. इतर काहीच वाचले नाही. आता आपण निर्णय घेतला आणी फसलो तर? त्यांनी तत्काळ त्यांच्या हाताखालच्या अधिकार्याला पाचारण केले. file त्यांच्या अंगावर फेकली "मूर्ख, मी सचिव असताना अश्या files मी कधीच वरिष्ठांकडे पाठवत नव्हतो, मीच निर्णय घेत होतो. कशाला बसलात ह्या खुर्चीवर, मूर्ख, बेजबाबदार" शिव्या देवून हाकलून दिले. आणी नंतर हीच वर्तणूक आणी हेच वाक्य - उप सचिव, अवर सचिव ह्यांनी देखील त्याच प्रमाणे आपल्या हाताखालच्या अधिकाऱ्यांच्या अंगावर ही नस्ती फेकून दिली. आणी सर्वात शेवटी शिपायाच्या अंगावर. बिचारा शिपाई ही file घेवून वापस आला. श्री करडे चहा पिण्यासाठी बाहेर गेलेले पाहून शिपायाने ही file साहेबांच्या खुर्चीतील उशीखाली दडवून ठेवली.

२ महिन्यानंतर श्री करडे खुर्चीत बसले असता त्यांच्या ढुंगनाला काही तरी टोचले. उशी वर करून पहिले तर ही file , त्याचीच एक टाचणी त्यांच्या ढुंगनाला टोचली होती. पुन्हा ४-५ नियम, कायदे ह्यांचा उल्लेख करून एक पानभर लिहून ही नस्ती वर पाठविली. शेवटी ही नस्ती प्रधान सचिवांकडे पोहचली. नस्ती वाचावीच लागली त्यांना. एक उंदीर आपल्या विभागात धुमाकूळ घालतोय हे त्यांना कळले. त्यांनी शेरा लिहिला " सामान्य प्रशासन विभागाकडे, उंदराच्या अपेक्षित कार्यवाही बाबत तांत्रिक ज्ञान असणारे अधिकारी नसल्यामुळे ही नस्ती तांत्रिक मार्ग्दर्षानाकरिता आणी योग्य उपाय योजना सुचविण्याकरिता संबंधित विभागांकडे पाठविण्यात यावी. आरोग्य विभाग, कृषी विभाग, warehouse corporation आणी defense ह्या चार विभागांची निवड झाली. पत्रव्यवहार सुरु झाला. आरोग्य विभागाचे अधिकार चौकशी साठी आले. त्यांचा अहवाल " आरोग्य विभाग उंदरांमुळे निर्माण होणारया रोगांच्या प्रतीबंधानाचे तथा उपचाराचे कार्य करते, उंदराला नाहीशे करणे ह्या विभागाचे काम नाही". कृषी विभागाचा चौकशी अहवाल " हा उंदीर घरगुती उंदीर होता कि शेतातील ह्याचा खुलासा करावा, शेतातील उंदीर असल्यास कृषी विभाग निश्चितच मार्गदर्शन करू शकेल". warehouse corporation चा अहवाल " आम्ही उंदीर मारीत नाही तर उंदीर आत येवू शकणार नाही असे warehouse बांधतो. आपल्या विभागाला असे भांडार निर्माण करावयाचे असल्यास आम्ही निश्चितच तांत्रिक सल्ला देवू" सुरक्षा विभाग थोडा समजदार असावा, अधिकारी न पाठवता त्यांनी उलट विचारणा केली " आकस्मिक स्थितीतच सुरक्षा विभाग नागरी विभागास मदत करू शकतो. आपल्या राज्यात आकस्मिक स्थिती जाहीर झालेली आहे काय? नसल्यास कृपया आकस्मिक स्थिती जाहीर करण्यासाठी माननीय राष्ट्रपती महोदयांना प्रथम विनंती करावी"

तो पर्यंत एक उंदीर धुमाकूळ घालतोय हे मंत्रालयात सर्वाना माहित व्हायला लागले. सर्व अहवालांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी महाबळेश्वर येथे दोन दिवसांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ४०-५० अधिकारी सपरिवार उपस्थित होते. निर्णय झाला "ह्या उन्दरासाठी काय करावे ह्याची तांत्रिक माहिती आपल्या कोणत्याच विभागाकडे नसल्यामुळे परदेश प्रशिक्षण दौरा आयोजित करून ३-४ देशांना भेटी द्याव्या". ५ अधिकारी , ५ मंत्री आणी ५ आमदार असे सर्व ४ देशांचा १५ दिवसांचा परदेश दौरा करून परत आले. पुन्हा कार्यशाळा, चर्चा सुरूच राहिली. प्रत्येक विभागात काही असंतुष्ठ अधिकारी, कर्मचारी असतातच. त्यांनी ही सर्व माहिती गोळा करून विरुद्ध पक्षाच्या आमदारांना पुरविली. विधानसभेत आणी विधान परिषदेत प्रश्न विचारण्यात आले, अनेक तास चर्चा झाली, दोन वेळा सभात्याग झाला.

सेवानिवृत्तीला एक महिना राहिला असताना, शिपायाने श्री करडे ह्यांना ह्या उंदराच्या प्रकरण बाबत विचारणा केली. नस्तीतील सर्व माहिती नियम आणी कायद्यासह श्री करडे ह्यांनी शिपायाला समजावून सांगितली. शिपाई म्हणाला, " अर्रेचा, हाच तो उंदीर होता काय? साहेब आपणाला ज्या दिवशी तो उंदीर दिसला त्यानंतर २-३ दिवसांनी मी दरवाज्याजवळ स्टूल वर बसलो होतो, मला तो उंदीर आलामारीखाली दिसला, हातात झाडू घेवून दबा धरून बसलो, थोड्या वेळाने तो पुन्हा बाहेर आला, एका झाडूतच त्याला मारला आणी बाहेर फेकून दिला". श्री करडे, अरे त्या उंदराची केस सुरु असताना तू त्याला कसा मारलास? त्यांनी पुन्हा कायदे, नियम लिहून नस्ती तयार करून वर पाठविली आणी शेवटी चौकशी सुरु असणारया उंदराला मारले म्हणून शिपायाला निलंबित करण्यात आले.

प्रशासन आणी व्यवस्थापन हे दोन शब्द आपण नेहमीच ऐकत असतो. प्रशासन म्हणजे कायद्याच्या, नियमांच्या चौकटीत राहून कार्य करणे. तर व्यवस्थापन म्हणजे उपलब्ध मनुष्यबळ, सामुग्री आणी पैसा ह्यांचा योग्य विनियोग करून अपेक्षित उद्धेश अपेक्षित कालवधीत साध्य करणे. अपेक्षित उद्धेश साध्य करणे हे व्यवस्थापनाचे महत्वाचे कार्य, प्रशासनाचेही तेच कार्य आहे, परंतू उद्धेश साध्य करण्याकडे प्राथमिकता न देता कायदा आणी नियमांचा कीस पडून, फक्त कायद्याच्या, नियमांच्या चौकटीत राहून कार्य करणे हा शासकीय दृष्टीकोन. उंदीर हा जर problem होता तर माझ्या दृष्टीने तो शिपाई एक चांगला व्यवस्थापक होता कारण त्वरित निर्णय घेवून त्याने हा प्रोब्लेम सोडविला होता. पण प्रशासन बघा, बक्शिश तर सोडाच, चौकशी सुरु असणारया उंदराला मारले म्हणून त्यालाच निलंबित व्हावे लागले. ह्या प्रसंगाकडे एक हास्यास्पद कथा म्हणून न बघता, अनावश्यक कालाप्यव्यय, पैश्याचा अनाठायी खर्च टाळण्यासाठी प्रशासन आणी व्यवस्थापन योग्य रित्या समजून आपला उद्धेश कश्या प्रकारे साध्य करता येईल ह्याकडे लक्ष देवून अधिक जाणीवपूर्वक कार्य करणे महत्वाचे ठरते.

11 comments:

  1. very good satire. its the situation of our country today.Dr Sanjay deshpande

    ReplyDelete
  2. A must read article for all government officers to understand management Vs administration: Subhodh

    ReplyDelete
  3. Yes!!! It happens only in India. Great eye opener for the people.Dr.Lalit Sankhe

    ReplyDelete
  4. Nishant: Good article to show hw govt functions.But on many occasions govt. machinary jus bypass all rules and procedures if the out put is of intrest to some one. e.g.Adarsh scam

    ReplyDelete
  5. This story tells why time pass mentality is flourishing in govt set up.
    R.P. Rokade

    ReplyDelete
  6. Typical story of how government functions.Least bothered about results. Nice story:Vikas

    ReplyDelete
  7. @Sanjay D - True thats what inspired me to write this story. Truely a satire.
    @Subodh, Lalit - True But who will bell the cat ? Thats the question
    @Nishant - Totally agreed and thats the irony of our pseudo democracy unfortunately.
    @R. P Rokade - Agreed. But we should all think " Can I at least start from myself ."
    @Vikas - Thanks!

    ReplyDelete
  8. Well done! This how our Mera desh Mahan works.Alert citizens can do lot many things with available rule book, RTI if used properly is a good tool to deal with the situation-
    By -- Mrs Sheetal

    ReplyDelete
  9. Correct description of administration. Why dont you translate this in Hindi and share with top officers in MP. Dr.Namdeo

    ReplyDelete