Wednesday, November 23, 2011

Helicopter Parents


सुमीत हा ५ वर्षांचा त्याच्या पालकांचा एकुलता एक मुलगा. आतिशय प्रेमात आणी पालकांच्या सतत देखरेखीत त्याचे संगोपन. त्याने काय खेळावे, खेळू नये, काय खावे, काय खाऊ नये, कोणासोबत खेळावे हे सर्व निर्णय पालकांचेच, त्याच्या आरोग्याची, वाढ विकासाची त्यांना इतकी काळजी कि स्वतः च नीरनिराळी पुस्तके वाचून त्याला रोज ३-४ प्रकारच्या बाटल्यातील protiens आणी vitamins अगदी काळजीपूर्वक देणारे. रोज संध्याकाळी त्याला बगीच्यात फिरवायला नेताना सोबत पाण्याची एक बाटली आणी खेळताना हाताला थोडी देखील माती लागल्यास लगेचच हात पाण्याने धुणारे. प्रकृतीत थोडा देखील बदल जाणवल्यास रात्र रात्र जागून काढणारे. आणि ह्या सर्व कार्यात नातवावर डोळ्यात तेल घालून सतत लक्ष ठेवणारे, सतत सल्ला देणारे आजी आजोबा. एकदा तर सुमित बगीच्यात खेळताना त्यांना एक गांडूळ दिसले आणी तेव्हापासून त्यांनी सुमितला त्या बगीच्यात नेणेच बंद केले. १९९० च्या दशकात क्लायीन आणी फाय ह्या दोन मानसोपचारतज्ञांनी "Helicopter Parents " ही संकल्पना प्रचलित केली. मुलांची वाजवीपेक्षा जास्त काळजी घेणारे, त्यांच्या बारीक सारीक वर्तणुकीवर सतत लक्ष ठेवणारे आणी नियंत्रण ठेवणारे, दैनंदिन जीवनात मुलांनी कसे वागायला हवे हे स्वतः च ठरविणारे पालक म्हणजेच "Helicopter Parents ". जास्तीत जास्त वेळ मुलांच्या संगोपनातील नियोजनात, ते नेहमीच सुरक्षित कसे असावेत, त्यांना जास्तीत जास्त मदत कशी करता येईल, आणी त्यांच्या काळजीत, अश्या प्रकारचे पालक आपला जास्तीत जास्त वेळ घालवतात आणी त्या बद्धल इतरांना अभिमानाने सांगत देखील असतात. अपत्त्यावरील प्रेम, आणी आपला मुलगा/ मुलगी सर्व बाबतीत इतरांपेक्षा उत्तमच असावी ह्या सततच्या जाणीवेतून त्यांची ही वर्तणूक. शाळेतील प्रवेशापासून, मुलांनी कोणते विषय निवडावेत, त्यांनी कोणत्या कॉलेजात प्रवेश घ्यावा, कश्या प्रकारे अभ्यास करावा , कोणते profession निवडावे, आणी नंतरही त्यांच्या प्रगतीची दिश कोणती असावी, हे सर्व फक्त पालकांचेच निर्णय, आणी ह्या निर्णयांची अंमलबजावणी करतना प्रत्येक गोष्टीत सूक्ष्म नियोजन करण्यात स्वतः ला धन्य समजणारे हे पालक म्हणजेच "Helicopter Parents ". स्वतः चा शोध घेवून, मला काय हवे, काय नको, मला काय करायला आवडते, ही विचारक्षमताच निर्माण करण्याची, स्वतः चे निर्णय स्वतः च घेण्याची क्षमताच निर्माण करण्यासाठी मुलांना संधीच न देणारे हे पालक.

उद्धेश जरी खूप चांगला असला तरी, ह्या अश्या वर्तणुकीचा बर्याच मुलांच्या सर्वांगीण विकासावर होणारा दुष्परिणाम:

स्वतः च नवीन नवीन गोष्टी शिकण्यापासून तथा काही अभिनव संकल्पना आमलात आणण्यापासून ही मूले सतत वंचित राहतात.
पालकांचेच एक Clone म्हणून विकास होणारी हे मूले.
भविष्यात निर्माण होणारा निर्णय क्षमतेचा अभाव आणी अगदी छोट्या छोट्या बाबींसाठी इतरांवर अवलंबून राहण्याची वृत्ती.
केलेल्या चुकांमधून शिकण्याची संधी प्राप्त न होणे.
जीवनातील अनाकलनीय, अकल्पित, आकस्मिक घटनांना सामोरे न जाण्याची क्षमता. छोट्याशाही प्रतिकूल परिस्थितीला ध्यर्याने सामोरे न जाण्याची क्षमता आणी त्यातून सतत ताण तणावात राहण्याची वृत्ती.
लहानपणी खूप प्रेम, पालकांचे सततचे केंद्रित लक्ष, जे पहिजे ते मिळणारी ही मूले मोठेपणी मात्र एक पंगुत्व घेवून सतत कोणत्यातरी दडपणाखाली जीवन जगत असतात
आत्मकेंद्रित, नेहमी सहकार्यांपासून दूर राहण्याची प्रवृत्ती आणी त्यामुळे इतरांच्या टीकेचे, अवहेलनेचे लक्ष झालेल्या ह्या व्यक्ती. मानसिक आजार निर्माण होण्यासाठी अगदी अनुकूल प्रवृत्ती.
"Helicopter Parents " ह्या पदवी पासून दूर ठेवावयाचे असल्यास पालकांना काय करणे शक्य आहे?

मुलांच्या विकासाचा अर्थ - त्यांना जसे हवे तसे खेळू द्या. प्रसंगी खेळताना पडले, खरचटले, जखम झाली, इतर मुलांशी भांडणे झालीत, मारा माऱ्या झाल्यात म्हणून त्यांना १००% सुरक्षा मिळण्यासाठी खूप बंधने घालू नयेत.
मुलांना स्वतंत्रता: वयानुरूप त्यांना त्यांच्या वागण्यात स्वतंत्रता असू देणे
मुलांच्या सर्वांगीण विकासात "Helicopter Parents " चे बरेच गुण असणे चांगलेच ठरते, परंतू कोणत्या गोष्टींचा अतिरेक होतोय हे समजून त्या प्रमाणे आपल्या वर्तणुकीत सुधारणा करणे आवश्यक ठरते.
"Helicopter Parents " बनताना बर्याच वेळी पालक स्वतः च्या आवडी निवडी, स्वतः चे सामाजिक जीवन , स्वतः चे वयक्तिक आयुष्य देखील compromose करतात. हे कसे टाळता येईल ह्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करणे.
मुलांना अपयशी होऊ द्या : अपयशातील अनुभवानवरूनच मूले शिकतील, त्यासाठी त्यांना संधी द्या, गरज भासल्यास मदत करा.
तुम्हाला तुमच्या लहानपणी जे काही मिळाले नाही ते सर्व आपल्या मुलांना मिळालेच पाहिजे हा अट्टाहास बाळगू नका.
वाट बघण्याची संधी: मुलांनी कोणत्याही गोष्टीचा आग्रह केला कि त्यांना तो गोष्ट तत्काळ उपलब्ध केलीच पाहिजे, हे टाळता येईल काय. मुलांना थोडी वाट बघण्याची सवय लावणे.
हे सर्व काही एक medical prescription नाही. प्राप्त परिस्थितीनुसार योग्य निर्णय घेवून स्वतः च्या वर्तणुकीत आवश्यक सुधारणा करून त्यात सातत्य बाळगल्यास मुलांच्या योग्य विकासात पालकांचा महत्वाचा वाटा ठरू शकतो ह्यात कोणतेच दुमत नाही ( UNDP च्या ताण तणाव परामर्षक प्राची ह्यांचे लेखावर आधारित)

Saturday, October 8, 2011

Be Nice ; just do not be - "too nice "

काही व्यक्ती वाजवीपेक्षा फारच चांगल्या असतात. कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी सर्व प्रथम धावून जाणाऱ्या, कोणतीही मदत लागल्यास, सर्व प्रथम त्या व्यक्तीच्या पाठीवर मदतीचा हात ठेवणाऱ्या, समोरील व्यक्तीचे दुखः हलके करण्यासाठी स्वतः चा खांदा पुढे करणाऱ्या, अश्या ह्या व्यक्ती. कोणतीही मदत लागल्यास, "मै.. हू.. ना..." असा ह्यांचा, त्यांचे निकटवर्तीय समाजात असणारा लौकिक. इतरांच्या गरजांना स्वतः च्या गरजांपेक्षा नेहमीच प्राथमिकता देणे, अशी ह्यांची वृत्ती. स्वतः ची मत, स्वतः ची प्राथमिकता, स्वतः च्या इच्छा/अपेक्षा कोणासमोरही प्रदर्शित न करणाऱ्या. आज संध्याकाळी काय करीत आहात? असा प्रश्न त्यांना विचारल्यास, त्यांचे उत्तर, " काही नाही, सांगा ना? आपले काही काम आहे काय? मी तयार आहो, आपणास काही मदत हवी असल्यास". ३-४ व्यक्ती आपसात आपल्या भागातील श्री. जोशी ह्यांना सकाळी देवाज्ञा झाल्याची चर्चा करताना ही व्यक्ती ते ऐकते, श्री. जोशी ह्यांचेशी काही विशेष परिचय नसताना देखील आपली सर्व कामे बाजूला सारून तडक जोशी ह्यांचे घरी पुढील सर्व तयारी करण्यासाठी दाखल. पु. ल. देशपांडेच्या "व्यक्ती आणी वल्ली" ह्यातील नारायण सारखेच हे पात्र किंवा अश्या ह्या व्यक्ती. आपल्या समाजात, कार्य क्षेत्रात असले हे "नारायण" आपणास नेहमीच आढळतात. अर्थात, बदलत्या युगात ह्या नारायणांची संख्या कमी झालेली दिसत असली तरीही काही नारायण अजूनही शिल्लक आहेत. चांगले असणे, चांगले वागणे, सर्वांशी सौहार्दपूर्ण वर्तणूक ठेवणे, आवश्यकता भासल्यास इतरांना मदत करणे, ही सर्व वृत्ती निश्चितच चांगली आहे आणी निरोगी समाजासाठी अश्या वृत्तीच्या व्यक्ती देखील असणे आवश्यक आहेत. परंतू चुकीच्या व्यक्ती साठी देखील, चुकीच्या कारणांसाठी, आणी महत्वाचे म्हणजे सतत खूपच चांगले आणी चांगलेच वागणे हे योग्य आहे काय?, काही प्रसंगी नाही म्हणणे देखील योग्य ठरते काय? हा कदाचित चर्चेचा विषय ठरू शकेल.

काही व्यक्तींची मानसिकताच अशी तयार होत जाते कि ते नाही म्हणू शकतच नाही, किंवा त्यांना काय हव तो प्रश्न विचारण्याची हिम्मतच निर्माण होत नाही. कदाचित लहानपणापासून ते अश्या कुटुंबात वाढलेले असतात कि त्यांच्या मताला काहीच किंमत दिली जात नाही, आपली मत काय आहेत ते मांडण्याची त्यांना संधीच दिली जात नाही किंवा आपली मत प्रदर्शित करणे म्हणजे मोठ्यांना challenge करणे किंवा त्यांचा अपमान करणे, इतरांची मत, त्यांच्या मागण्या, स्वतः च्या मतापेक्षा किंवा स्वतः च्या मागण्यापेक्षा अधिक महत्वाच्या आहेत अशीच सतत शिकवण त्यांना दिली जाते. आणी ह्या सर्व मानसिकतेतून "नेहमीच चांगलेच वागणे" हा एक स्वभावाचा by product निर्माण होत असावा? परंतु अशे हे by product जर low self एस्टीम, passivity , fearfulness किंवा desperate loneliness हे स्वभाव गुण देखील त्या व्यक्तीत निर्माण करीत असतील किंवा ह्या ह्या स्वभाव गुणां मुळेच किंवा अतिशय भिडस्त स्वभावामुळे ती व्यक्ती जर "सतत फक्त आणी फक्त चांगलेच वागणे" ह्या वर्तणुकीची निर्माण होत असल्यास बरेच वेळा अशी व्यक्ती एक liability देखील ठरू शकते. आणी मग अश्या व्यक्तीला नेहमीच exploit करणाऱ्या व्यक्तींचा गोतावळा तिच्या आजूबाजूला गोळा झालेला दिसून येतो.

"सतत फक्त आणी फक्त चांगलेच वागणे" ह्या मागचे सत्य:
१. तुम्ही कोणालाही त्याचे चूक आहे हा प्रश्नच विचारू शकत नाही (you are not challenging ): काम झाल्यानंतर एक boring व्यक्ती म्हणून तुमच्याकडे बघण्याचा एक सर्व साधारण दृष्टीकोन
२. You are too available : इतरांच्या फायद्यासाठी स्वतः चा काहीही विचारच न करणे
३. निर्णय घेण्यास अक्षम: किंवा स्वतः पुढाकार घेवून कोणतेही कार्य करण्यास अक्षम. इतरांना आपण नेहमीच आवडावे म्हणून त्यांनाच पुढाकार घेवू देणे, निर्णय घेवू देणे आणी नंतर त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी मात्र "मै.. हू.. ना...". कालांतरातून ह्या स्वभावामुळे निर्माण होणारी एक वैषम्याची भावना, " सर्व आपणाला फक्त वापरूनच घेतात"
४. तुम्ही नाही म्हणूच शकत नाही: इतरांच्या सर्व मातांना आणी सूचनांना तुम्ही फक्त "होयच" म्हणता आणी तुमच्या इच्छेविरुद्धही सतत कार्य करीत असता त्यामुळे तुमची स्वतः ची एक identity शिल्लकच राहत नाही.
५. तुम्हाला नेहमी "गृहीतच" समजल्या जाते
६. तुम्ही खूप विचार करता आणी तो फक्त इतरांचाच: ह्यामुळे तुमचे कुटुंबीय देखील तुमच्यावर सतत नाराज असतात आणी नेहमीच त्यांचेही बोलणे तुम्हालाच ऐकावे लागते.
७. तुम्हाला एखादे वेळी कोणी काम सांगितले नाही तर त्याचेही तुम्हाला वाईट वाटते, आपणाला टाळत तर नाही ना, ह्याचाच पुन्हा पुन्हा विचार. कोणत्याही निर्णय प्रक्रियेत तुम्हाला सहभागी करून घेतले जात नसल्यामुळे मी कोणाला दुखविले तर नाही ना ही भावना अधिकच बळावत जाते.

ह्या सर्व परिस्थितीतून बाहेर निघणे शक्य होईल काय? आहे कठीणच ... पण प्रयत्न तर निश्चितच करता येतील ना? काही सूचना:

१. छोट्याछोट्या बाबतीत निर्णय घेण्यास सुरवात करा आणी आपण घेतलेला निर्णय कसा योग्य होता आणी मी घेतलेल्या निर्णयामुळे मला जे अपेक्षित होत नेमक तेच कसे झाले हे सतत आठवत राहा. तुमच्या गरजा आणी प्राधान्य इतरांना सांगण्याचे धाडस करण्यास सुरवात करा.
२. स्वतः च्या हक्कांची प्रथम स्वतः ला जाणीव होऊ द्या, त्यावर बोलण्यास सुरवात करा, मुख्य म्हणजे तुम्हाला काय वाटत ह्यावर प्रश्न विचारण्यास सुरवात करा.
३. स्वतः च्या मर्यादा ओळखा: इतरांना मदत लागल्यास प्रत्येक वेळी आपण तेथे उपस्थित असूच शकणार नाही ही सत्त्यता समजून घ्या. " माझ्या शिवाय हे काम होणारच नाही" हे वाक्क्य आपल्या शब्दकोशातून नेहमीसाठी गाळून टाका. "कोणाचेच kona वाचून अडत नाही", हे नवीन वाक्क्य आपल्या शब्दकोशात लिहा.
४. हळू हळू इतरांना न दुखावता "नाही" म्हणण्यास शिका, ह्यासाठी प्रसंगी थोड खोट बोलावे लागले तरी चालेल
५. " You Before the World " : रोज सकाळी उठताना आज मी कोणती एक गोष्ट फक्त माझ्या आणी माझ्या साठीच करणार अहो ह्याची खुणगाठ मनाशी बांधून ती गोष्ट दिवसभरात पूर्ण करा, रात्री झोपताना तीच गोष्ट आठवा आणी त्याचा आनंद साजरा करा. इतरांनी आपणास काही प्रश्न विचारण्यापूर्वी आपणास त्या व्यक्तीकडून काय हवे हा प्रश्न विचारण्याचे धाडस करण्यास सुरवात करा.
६. Develop a healthy disregard : तुम्ही सदा सर्वदा सर्वांनाच आनंदी, समाधानी करू शकणार नाही हे सत्त्य सतत मनात बाळगा.
७. इतरांशी चांगले वागा आणी चांगली कामे देखील करा पण सर्वंकष विचार करून तुम्हाला त्यातून आनंद मिळत असल्यास,"त्याला काय वाटेल हे विचार करणे टाळा"
Be Nice ; just do not be - "too nice ". Be yourself - its your best chance of success

(UNDP च्या ताण/तणाव परमार्षक प्राची ह्यांचे लेखावर आधारित)

Friday, September 30, 2011

दृष्टीकोण



संगणकासाठी लागणारे साहित्त्य, उपकरणे निर्मिती करणारा एक तरुण उद्ध्योजक. व्यवसायातील मंदी मुळे त्रस्त झालेला. कर्जाचा डोंगर, कच्चा माल पुरविणाऱ्या पुरवठाधारकांचा पैश्याकरिता सततचा तगादा. ह्या सर्व दुष्टचक्रातून कसा मार्ग काढावा त्याल काहीच कळत नव्हते. एक दिवशी असाच तो आतिशय उदास होवून डोक्यावर हात ठेवून बगीच्यात बसलेला होता, ह्या सर्व विपरीत आर्थिक परिस्थितून बाहेर कसे निघता येईल ह्याचाच विचार करीत होता. अचानक एक म्हातारी व्यक्ती त्यचे समोर उभी ठाकली. " तुला कोणती तरी फार मोठी चिंता किंवा समस्या भेडसावीत असावी असे मला वाटते, तो व्यकी म्हणली"

कोणापाशी तरी आपली समस्या कथन करावी, आपले दुखः हलके करावे ह्या भावनेतून त्याने आपल्या व्यवसायाबाबत सर्व काही त्या म्हातारया व्यक्तीला सांगितले. सर्व ऐकून ती म्हातारी व्यक्ती म्हणली, " मला तुझी समस्या कळलेली आहे, आणी मला वाटत मी तुला निश्चितच काही तरी मदत करू शकेन" . त्या म्हातारया व्यक्तीने त्या उद्धयोजकाचे नाव विचारले, खिशातून चेकबुक काढून त्याचे नावे एक चेक लिहून सही करून त्याचे हातात दिला आणी म्हणला, " हे पैसे असू दे, एक वर्षानंतर ह्याच दिवशी, ह्याच जागी आणी ह्याच वेळी तू मला भेट आणी मी दिलेले पैसे मला परत कर" . आणी तो जसा आला तसाच एक क्षणात पुढे काहीही ना बोलता निघून गेला आणी गायब झाला. उद्ध्योजाकाने कुतूहलापोटी तो चेक पहिला, त्याचे नावाने ५ लाख डॉलर चा तो चेक होता, सही च्या काही टायीप केलेले नाव होते, " डॉ. जॉन डी रॉकफेलर" , जगातील प्रसिद्ध अशी एक श्रीमंत व्यक्ती. ह्या पैशाने माझ्या सर्व आर्थिक विवंचना दूर होतील आणी माझा व्यवसाय पुन्हा नव्या जोमाने मला सुरु करता येईल, ह्याची जाणीव होवून तो आतिशय उत्साहित झाला. व्यवसायातील समस्या दूर करून अभिनव संकल्पना राबवून आपला व्यवसाय नजीकच्या कालावधीत आर्थिक दृष्ट्या कसा संपन्न करता येईल ह्याचे एक स्पष्ठ चित्र त्याच्या डोळ्यासमोर उभे राहिले. अगदी खूपच गरज भासली तरच हा चेक वटवून त्या पैश्याचा मी उपयोग करेन ही खुणगाठ मनाशी बांधून त्याने तो चेक एका पेटीत ठेवून दिला. गरज भासली तर आपल्याजवळ पैसा उपलब्ध असेल ह्या उत्साहाने, व्यवसायातील बारीक सारीक बाबींचे अतिशय सूक्ष्म अवलोकन करून, एक निश्चत आराखडा तयार करून नव्याने व्यवसायाला सुरवात केली. ज्या व्यवसायाच्या बाबीत तोटा होत आहे त्या बंद करून ज्या बाबीत आपणास नफा होऊ शकेल त्याच बाबी करण्याचा एक सकारात्मक दृष्ट्कोन ठेवून, नव्या उत्साहाने व्यवसाय सुरु केला. छोट्या छोट्या बाबीतून थोडासा फायदा, ह्या फायद्याचे योग्य कार्य नियोजन, असे करत करत सहा महिन्यातच त्याचे नुकसान भरून निघाले. पुढे अधिक उमेदीने व्यवसाय करून, एका वर्षात त्याच्या व्यवसायात भरभराट होवून त्याला भरपूर पैसा मिळाला.

वर्षाचे शेवटी, पेटीतील तसाच ठेवून दिलेला चेक बाहेर काढून, ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळी, त्याच बगीच्यात तो चेक परत करण्या साठी त्या म्हातारया व्यक्तीला भेटण्याकरिता तो गेला. ठरलेल्या वेळी ती म्हातारी व्यक्ती देखील उपस्थित झाली. संपूर्ण वर्षातील आपली यशोगाथा सांगून, त्या व्यक्तीचा चेक वापस करून त्याचे आभार व्यक्त करण्यासाठी तो बोलण्यास सुरवात करणार तेवढ्यातच एक नर्स धावत आली. त्या म्हातारया व्यक्तीचा हात धरून म्हणली, " परमेश्वरा, तुझे आभार मानते, हे म्हातारे आजोबा आज लवकरच सापडले, खूप शोधावे नाही लागले", आणी ती नर्स त्या व्यावसायिकाला म्हणली, " मी आपली क्षमा मागते, ह्या आजोबांनी आपणाला त्रास तर नाही ना दिला?, हे आजोबा जवळच एका वृद्धाश्रमात राहतात, असेच मधून मधून कोणालाही न सांगता निघून जातात, बागेत लोकांना भेटतात आणी मी डॉ. जॉन डी रॉकफेलर आहे असे सांगत असतात" . आणी आजोबांचा हात धरून ती नर्स निघून गेली.

त्या व्यावसायिकाला तर आश्चर्याचा धक्काच बसला, संपूर्ण मन आणी शरीर बधीर झाल्यासारखे वाटले त्याला. आवश्यकता भासल्यास आपणाजवळ ५ लाख डॉलर आहेत ह्या एकाच धीरामुळे, नव-नवीन कार्य योजना आखून, त्यांची अंमलबजावणी करून आपण तोट्यात असणारा उद्योग फायदेशीर करू शकलो, त्याचे त्यालाच आश्चर्य वाटले. आणी अचानक त्याला जाणीव झाली, हा पैसा किंवा पैसा जवळ असल्याची केवळ भावना, तो आपण न वापरता, स्वकर्तुत्वावर, सकारात्मक दृष्टीकोन ठेवून केलेलीकार्य योजना आणी त्याची योग्य अंमलबजावणी हेच आपल्या यशाचे गमक होते. आणी सहजच मनात एक विचार देखील आला, " जर त्या दिवशी आपण तो चेक आपल्या खात्यात जमा केला असता आणी ते पैसे आपल्या खात्यात जमा न झाल्याचे दुसऱ्या दिवशी आपणास कळले असते तर?"

Saturday, June 4, 2011

मनसरोवर - कैलाश परिक्रमा


मनसरोवर - कैलाश परिक्रमा
ब्रह्म देवाच्या मनात निर्माण झालेले आणी त्यांनी प्रत्यक्ष्यात साकार केलेले "मनसरोवर". चीन च्या तिबेट प्रांतातील कैलाश पर्वताच्या पायथ्याशी, समुद्र सपाटीपासून ४५८० मीटर उंचीवर असणारे गोड्या पाण्याचे मनसरोवर म्हणजे जगातील एक आश्चर्यच. ८८ किलोमीटर चा परीघ आणी ३०० फुट खोली, साधारणपणे गोलाकार असणारे आणी निळसर रंगाचे पाणी असणारे हे सरोवर. राजहंस ह्या पक्ष्यांचे निवासस्थान. सतलज, ब्रह्मपुत्रा आणी इतर महत्वाच्या नद्यांचे उगमस्थान. हिंदू, बौद्ध आणी जैन ह्या धर्मांचे एक धार्मिक स्थळ. आणी मनसरोवर पासून पुढे ५३ किलोमीटर ची कैलाश पर्वताची परिक्रमा. बहुतांशी पायी किंवा घोड्यावर ही परिक्रमा करावी लागते आणी ह्या परीक्रमेस ३ दिवस लागतात. परिक्रमा करताना ४५८० मीटर उंचीवरून पुढे ६५८० मीटर उंचीवर जावून पुन्हा मनसरोवरला परत आल्यानंतर ही परिक्रमा पूर्ण होते. कैलाश पर्वत म्हणजे भगवान शंकरांचे निवास्थान. अतिशय कठीण अशी ही परिक्रमा आणी ही परिक्रमा पूर्ण केल्यास कळत नकळत केलेल्या पापांची मुक्ती होते ही धारणा.

नागपूर येथील आम्ही ७५ मित्र मंडळींची चमू ८ जून पासून ह्या यात्रेला निघून २४ जून ला वापस येणार. त्यामुळे माझ्या ब्लॉग द्वारे ह्या कालावधीत आपणाशी संपर्क साधू शकणार नाही. परंतू परत आल्यानंतर यात्रेत आलेले अनुभव निश्चितच आपणाशी माझ्या ब्लॉग द्वारे share करणार. आपल्या सर्वांच्या शुभेछ्या सोबत घेवून यात्रेला प्रयाण करीत आहो.

Wednesday, June 1, 2011

विश्वास


एका प्रसिध्द मंदिरातील एक सफाई कामगार. अतिशय श्रद्धेने आणी प्रामाणिकपणे तो सतत आपले काम करीत असायचा. रोज तो हजारो श्रद्धाळू, देवाचे दर्शन घेताना बघायचा. त्याला सतत वाटायचे, एकाच जागेवर उभे राहून रोज हजारो भाविकांना दर्शन देताना देव किती थकून जात असणार? एक दिवस मोठी हिम्मत करून अगदी निरागसपणे त्याने देवाला विचारले," हे देवा, रोज एकाच जागेवर सतत उभे राहून तू किती थकत असणार? एक दिवस तरी मला तुझ्या जागेवर उभे राहू दे ना? त्यामुळे तुला थोडातरी आराम मिळेल" देव म्हणाला, काहीच हरकत नाही, मी तुला माझेच रूप देतो आणी तू माझ्या जागेवर उभा राहा, पण, एक गोष्ट मात्र ध्यानात ठेव, फक्त माझ्या जागेवर माझ्याच रुपात उभे राहावयाचे आणी दर्शनाकरिता येणाऱ्या भाविकांना मंद हास्य करून आशीर्वाद दिल्या सारखे हावभाव चेहऱ्यावर ठेवावयाचे, काहीही बोलवायचे मात्र नाही. माझ्यावर विश्वास ठेव, दर्शनाकरिता येणाऱ्या प्रत्येक भाविकाची काय विनंती आहे आणी त्याला काय आशीर्वाद द्यावयाचे ह्या सर्वांचा आराखडा माझ्याजवळ नेहमीच तयार असतो आणी त्यानुसार कोणाला काय द्यावयाचे हे मी ठरवत असतो. तू मात्र काहीही बोलायचे नाहीस" सफाई कामगाराने देवाची ही सूचना मान्य केली.

दुसरया दिवशी प्रत्यक्ष देवाच्या जागेवर हा सफाई कामगार देवाच्याच रुपात उभा राहिला. थोड्या वेळाने एक अतिशय श्रीमंत व्यक्ती दर्शनासाठी आली. दान पेटीत भरपूर दान टाकले आणी धंद्यात अधिकाधिक भरभराट व्हावी म्हणून आशीर्वाद देण्याची देवाला प्रार्थना केली. जाताना अनवधानाने त्याचे पैस्याचे पाकीट देवासामोरच राहून गेले. देवाने काहीही बोलवायचे मात्र नाही ही ताकीद दिलेली असल्यामुळे देवाच्या रुपात असणारा हा सफाई कामगार, बोलण्याची अनिवार इच्छा होवूनही शांतपणे उभा राहिला. नंतर एका गरीब व्यक्तीने देवाचे दर्शन घेतले, जवळील एक नाणे दानपेटीत टाकले आणी प्रार्थना केली, " हे देवा, फक्त एवढेच नाणे मी तुझ्या चरणी अर्पण करू शकतो, परंतू तुझी सतत सेवा करण्याची संधी मात्र मला लाभू दे. हे देवा, माझे कुटूंब फारच अडचणीत आहे, परंतू माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणी ह्या अडचणीच्या कालावधीतून बाहेर निघण्याकरिता तुझ्या जवळ निश्चितच काहीतरी मार्ग असणार आणी त्या प्रमाणे तू मला योग्य मार्गदर्शन करशील ह्याची मला खात्री आहे". डोळे बंद करून देवाची प्रार्थान केल्यानंतर त्याने डोळे उघडले आणी श्रीमंत व्यक्तीचे विसरलेले पैशाने भरलेले पाकीट त्याला डोळ्यापुढे दिसले. देवाने आपले गाऱ्हाणे ऐकून आपणाला हा प्रसाद दिलेला आहे हे समजून पुन्हा एकदा देवाचे आभार मानून पैशाचे पाकीट घेऊन तो निघून गेला. डोळ्यापुढे हे सर्व चाललेले बघूनही देवाच्या रूपातील सफाई कामगार काहीच बोलू शकला नाही.

लगेचच एक खलाशी दर्शनाकरिता आला. बोटीने खूप लांबच्या प्रवासाला जावयाचे असल्यामुळे, पुढील प्रवास सुरळीत व्हावा म्हणून तो डोळे बंद करून देवाची प्रार्थना करीत होता. आणि नेमके त्याच वेळी पैश्याचे पाकीट चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर ती श्रीमंत व्यक्ती सोबत पोलिसाला घेऊन मंदिरात दाखल झाली. खलाश्याला तेथे पाहून त्यानेच पैशाचे पाकीट चोरले असावे असे समजून त्या श्रीमंत व्यक्तीने खलाश्याला अटक करण्याची सूचना पोलिसाला दिली. खलाशी चोर नसून खलाश्याच्या पूर्वी मंदिरात आलेल्या व्यक्तीने पाकीट नेलेले आहे असे सांगण्याची देवाच्या रुपात असणारया सफाई कामगाराची खूप इच्छा होत होती. पण खऱ्या देवाने सांगितले होते कि काहीच बोलावयाचे नाही. त्याचे पुढे मोठा यक्षप्रश्न निर्माण झाला. श्रीमंत व्यक्तीने देवाचे आभार मानले आणी पोलीस खलाश्याला घेवून जाण्यास निघाले. सफाई कामगाराला वाटले, अश्या प्रसंगी खरा देवही चूप राहिला नसता. शेवटी त्याच्याने राहवलेच नाही आणी देवाच्या रूपातील सफाई कामगाराच्या तोंडून देववाणी बाहेर पडली. " खरा चोर खलाशी नाही, तो नीरपराध आहे, गरीब व्यक्तीनेच पैशाचे पाकीट नेलेले आहे" देववाणी ऐकून, पोलिसाने खलाश्याला सोडून दिले. श्रीमंत व्यक्तीने पुन्हा नमस्कार करून देवाचे आभार मानलेत. रात्री खरे देव प्रकट झाले आणी त्यांनी सफाई कामगाराच्या रूपातील देवाला आजचा दिवस कसा गेला ह्याची विचारणा केली. आज मी एका नीरपराध खलाश्याला कसे वाचविले हे त्याने मोठ्या अभिमानाने देवाला सांगितले. देव मात्र ऐकून फार विचारात पडला. देव म्हणला " तुला बोलू नको म्हणून सांगितले होते, का बोललास, माझ्यावर तुझा विश्वास नव्हता काय? तुला मी आधीच सांगितले होते, कोणाला काय आशीर्वाद द्यावयाचे ह्या सर्वांचा आराखडा माझ्याजवळ नेहमीच तयार असतो आणी त्यानुसार कोणाला काय द्यावयाचे हे मी ठरवत असतो. तू मात्र काहीही बोलायचे नाहीस". तुझ्या बोलण्यामुळे बघ कसा गोंधळ झाला" आणी नंतर देवाने त्याला सांगितले. देव म्हणाला, " अरे, त्या श्रीमंत व्यक्तीने लबाड्या करून खूप धन कमावले आहे, ह्या सर्व खोट्या मार्गाने कमावलेला पैसा, त्यातील काही अंश त्याने दान पेटीत टाकला, त्याच्या पाकिटात देखील खोट्या कमाईचेच पैसे होते. ती गरीब व्यक्ती मात्र माझी परम भक्त आहे, अगदी शेवटचे शिल्लक असणारे नाणे देखील त्याने मोठ्या भक्तीभावाने दान पेटीत टाकले आणी म्हणूनच ह्या पाकिटातील पैश्याची त्यालाच जास्त गरज असल्यामुळे ते पाकीट उचलण्याची इच्छा मीच त्याच्या मनात निर्माण केली. खलाशी तर नीरपराधी होताच आणी तो देखील माझा एक परम भक्त होता. आज तो ज्या बोटीने प्रवास करणार होता ती बोट रात्री वादळात सापडून बुडणार होती. त्याला जर पोलिसाने अटक करून रात्रभर जेल मध्ये ठेवले असते तर आज तो प्रवासाला निघू शकला नसता आणी त्याच जीव वाचला असता. आणी हे सर्व माझ्या भक्तांकरिता मीच केलेली उपाययोजना होती. त्या गरीब व्यक्तीस मिळालेल्या पैश्याचा त्याने निश्चितच सदूपयोग केला असता ". परंतु तू मात्र थोडासाही संयम पळू शकला नाहीस आणी सर्व गोंधळ करून ठेवलास" "माझा भक्त म्हणवतोस, माझ्या दिवसभर उभे राहण्याचे तुला वाईट वाटत होते, पण, मी सांगितलेल्या गोष्टीवर मात्र तू विश्वास ठेवला नाहीस"

Friday, May 20, 2011

तीन इच्छा


अलेक्झांदर एक महान जगज्जेत्ता. जवळजवळ संपूर्ण जग जिंकून आपल्या सैन्यासह माघारी आपल्या देशात परतत होता. वापस जाताना तो अतिशय गंभीर आजारी झाला. अनेक उत्कृष्ट उपाय करूनही आजारातून बरे होण्याची कोणतीही लक्षणे दिसत नव्हती. जिंकलेले संपूर्ण साम्राज्ज्य, एवढी मोठी शूर सेना, आपली जगज्जेती तीक्ष्ण तलवार आणी अमाप संपत्ती, ह्या सर्वांचा त्याग करून आपणाला आता मृत्त्युला सामोरे जावे लागणार ह्याची त्याला जाणीव झाली. आपण आता कोणत्याही परिस्थितीत जिवंत आपल्या मायदेशी पोहचू शकत नाही हे त्याला कळून चुकले. मृत्त्युच्या शेवटच्या घटका मोजत असताना त्याने आपल्या सरदाराला पाचारण केले आणी म्हणाला " मी आता लवकरच हे जग सोडून निघून जाणार आहो, माझ्या तीन इच्छा आहेत आणी त्या पूर्ण करण्याची तुमची जबाबदारी आहे" सरदाराला साश्रूपूर्ण होय म्हणण्याशिवाय गत्त्यंतर नव्हते. अलेक्झांदर म्हणाला:

१. माझी पहिली इच्छा " माझ्या खाजगी डॉक्टरनेच माझी शवपेटिका एकट्यानेच उचलून न्यावी"
२. माझी दुसरी इच्छा " माझी शवपेटिका स्मशानभूमीवर नेण्याच्या संपूर्ण रस्त्यावर मी आतापर्यंत जिंकलेले सर्व सोने, चांदी, जडजवाहीर पसरून ठेवावे"
३. आणि माझी अंतिम इच्छा " माझे दोन्ही हात शवपेटिकेच्या बाहेर काढून लोंबकळत ठेवावे"

आपला राजा आपणाला कायमचे सोडून जाणार, सर्व सेना अतिशय दुखी झाली. सरदाराने इच्छा पूर्ण करण्याचे आश्वासन दिले, तरी देखील हिम्मत करून प्रश्न विचारला " हे राजन, ह्या कसल्या विचित्र इच्छा", राजाने एक दीर्घ श्वास घेतला आणी म्हणाला "माझ्या आयुष्यात मी जे काही आता शिकलो ते सर्व जगाला माहित व्हावे म्हणूनच ह्या तीन इच्छांची पूर्तता करणे गरजेचे आहे"
माझ्या खाजगी डॉक्टरनेच माझी शवपेटिका एकट्यानेच उचलून न्यावी ह्यातून मला जगाला एक संदेश द्यावयाचा आहे. जगातील कोणीही उत्कृष्ट डॉक्टर देखील तुम्हाला मरणापासून वाचवू शकत नाही. मरण हे अंतिम सत्य आहे. त्यामुळे जीवन हे गृहीत न धरता ते चांगल्या प्रकारे कोणालाही न दुखावता कसे जगता येईल हा प्रत्येकाने प्रामाणिकपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे.
जगज्जेत्ता म्हणून नावलौकिक प्राप्त करण्यासाठी मी आयुष्यभर सतत लढाया केल्या, अपार संपत्ती गोळा केली, पण मरताना मात्र मी काहीच घेवून जाणार नाही, म्हणूनच माझी दुसरी इच्छा " माझी शवपेटिका स्मशानभूमीवर नेण्याच्या संपूर्ण रस्त्यावर मी आतापर्यंत जिंकलेले सर्व सोने, चांदी, जडजवाहीर पसरून ठेवावे" केवळ संपत्ती कोणत्याही प्रकारे जमविणे म्हणजेच जीवन नाही हा संदेश लोकांना मिळेल आणी अशी संपत्ती मिळण्यासाठी केलेली धावाधाव म्हणजेच जीवनातील अमुल्य वेळेचा कालापव्य.
जनतेला कळू द्या मी रिकाम्या हातानेच ह्या जगात आलो आणी रिकाम्या हातानेच हे जग सोडून जात आहो, म्हणून माझी तिसरी इच्छा " माझे दोन्ही हात शवपेटिकेच्या बाहेर काढून लोंबकळत ठेवावे" हे सर्व सांगून थोड्याच वेळात त्याचा मृत्त्यू झाला.

बर्याच लोकांनी ही कथा वाचलेली किंवा ऐकलेली असेल. मी देखील ही इंग्रजी कथा वाचली, मुळ लेखकाचे नाव लिहिलेले नव्हते, तरी देखील मुळ लेखक ज्याने ही कथा लिहिली असेल त्याची परवानगी गृहीत धरून मराठीत केलेले भाषांतर आपणापुढे सदर करीत आहो. ह्या कथेचा भावार्थ:
आपले आरोग्य आपल्याच हातात आहे, त्याची योग्य काळजी घ्या.
जमविलेल्या संपत्तीचा आपल्या आनंदासाठी आणी लोकांच्या भल्यासाठी उपयोग करून त्यातून जर आपणाला समाधान मिळत असेल तरच ह्या मिळकतीचा उपयोग.
आपण आपल्या स्वतः करिता जीवनात जे काही केले असेल ते आपल्या मृत्त्यू सोबतच जाळले जाते, दफन केले जाते, परंतू इतरांसाठी काही चांगले केले असल्यास आपल्या मृत्त्यू नंतरही आपण लोकांच्या हृदयात जिवंत असता.
चांगल्या कार्याची लोकांना सतत आठवण राहील असे कार्य करून मृत्त्युला आनंदाने सामोरे जा.

Saturday, April 23, 2011

आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोहे


" आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोहे" मराठीतील एक अतिशय चाकोरीबाहेर विचार करणारे कवी, संगीतकार, गायक श्री. अवधूत गुप्ते ह्यांचे हे एक प्रसिद्ध गीत. ह्या गीताचे लेखक अवधूत नसून दुसरे कोणी असल्यास मी त्यांची माफी मागतो. कारण अवधूत गुप्तेचेच म्हणून हे गाणे प्रसिद्ध आहे. "सनई चौघडे " ह्या मराठी चित्रपटातील हे गीत. "आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोहे" ह्या संपूर्ण गीतातील ह्या चार शब्दांचा अर्थ काय असावा ह्याचा अनेक दिवसांपासून विचार करतोय. संपूर्ण गीत ऐकल्यानंतरही ह्या चार शब्दांचा काय अर्थ असेल, केवळ सुंदर चाल, सुंदर आवाजातील गीत आणी गायक अवधूत गुप्ते म्हणून तर हे गीत इतके लोकप्रिय झालेले नसेल ना? अर्थ मात्र मनाशी तदात्य्म होण्यासारखा सापडतच नव्हता. आणी, आज पुन्हा मनाशीच हे गीत गुणगुणताना ह्या चार शब्दांचा मला समजलेला अर्थ:

" आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोहे" , कांदेपोहे खाताना आणी ते आपणाला आवडणारे असे झाले असतील तर त्याची चव काही काळतरी आपल्या जिभेवर रेंगाळत असते आणी त्या कालवधीत त्या कान्देपोह्याची आपण पुन्हा पुन्हा आठवण काढून आनंदी, सुखी होतो, हा आनंद आणी हे सुख आपण इतरांशी देखील भरभरून share करतो. अश्याच प्रकारे आपणाला जाणवणारे सुखाचे क्षण आपल्या आयुष्यात येत राहतात, पुढील आयुष्य जगण्याची एक नवी उमेद आपणाला देत राहतात आणी एक सकारात्मक दृष्टीकोन ठेवून आपण आपले आयुष्य जगत असतो. किंबहुना असलेच क्षण/प्रसंग जीवन जगण्यासाठी संजीवनी ठरत असतात. कांदेपोहे आणी आयुष्य, म्हणजेच जीवनात येणारे छोटे छोटे सुखाचे क्षण आणी त्यात मिळणारा आनंद, हा कदाचित ह्या चार शब्दातून मिळणारा संदेश असावा.

परंतु, कांदेपोहे, त्याची चव, खाताना मिळणारा आनंद आणी नंतर काही कालावधीपर्यंत रेंगाळत राहणारी चव, चांगल्या आठवणी, ह्या फक्त सकृतदर्शनी नाहीत काय? ह्या उत्कृष्ठ कांदेपोह्यांची पार्श्वभूमी आपण कधी जाणून त्याचे विश्लेषण करण्याचा करण्याचा प्रयत्न करतो काय? कांदेपोहे म्हणजे आयुष्यातील एक अविस्मरणीय चांगला क्षण. पण, हा चांगला क्षण कश्यामुळे निर्माण होऊ शकला, त्यासाठी कोणी कोणी प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष प्रयास केलेत हे मात्र आपण सोयीस्करपणे विसरून जातो. " आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोहे" ह्या ओळीतील चूल आणी कढई, आयुष्यातील ह्या दोन शब्दांचा आपण कधी विचार केलाय काय? कांदेपोहे म्हणजे आयुष्यातील एक चांगला, आठवणीत राहणारा क्षण, पण, हा क्षण अविस्मरणीय होण्यासाठी चूल आणी कढई तेवढीच महत्वाची नाही काय? कदाचित कांदेपोहे करणारी व्यक्ती फार सुगरण असलेही, पण जेवढे कांदेपोहे करावयाचे आहे हे ध्यानात ठेवून त्यासाठी नेमकी आवश्यक आकाराची कढई नसल्यास,व्यवस्थित परतून हे कांदेपोहे चांगले झाले असते काय? आणी " चूल"?, कांदेपोहे करणारी व्यक्ती सुगरण, कढई देखील योग्य आकाराची, मग चुलीचे काय महत्व? कांदेपोहे स्वादिष्ठ होण्यासाठी, त्याला योग्य प्रमाणात आच उष्णता मिळण्यासाठी, ते योग्य प्रमाणात शिजण्यासाठी, " चूल" देखील तेवढीच महत्वाची नाही काय?, आणी ही उष्णता निर्माण करताना जाळून राख होणारी ती लाकड?

म्हणजेच काय तर कांदेपोहे हा जीवनातील एक अविस्मरणीय चांगला क्षण असेल तर, फक्त कान्देपोह्याची उत्कृष्ठ चव किंवा ते करणारी सुगरण व्यक्ती, फक्त ह्याचा विचार न करता, ह्या अविस्मरणीय चांगल्या क्षणासाठी कारणीभूत ठरणाऱ्या, परंतू सकृतदर्शनी न जाणवणाऱ्या बाबींचा देखील आपण विचार केल्यास आयुष्यातील हा एक अविस्मरणीय चांगला क्षण अधिक काळ पर्यंत आपणाला आठवत राहील आणी विचारांची, वर्तणुकीची एक वेगळीच दिशा आपणास देत राहील आणी खऱ्या अर्थाने आपणाला "चूल" आणी "कढई" ह्या दोन शब्दांचा अर्थ आणी त्याचे महत्व कळेल. आणी सर्वात महत्वाचे म्हणजे, ह्या सुंदर क्षणासाठी कोठेही उल्लेख न झालेली, राख झालेली ती लाकड?, स्वतः जाळून नाहीशी झालेली ती लाकड आणी त्यांचा त्याग, ह्याचाही विचार केल्यास " आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोहे" ह्या चार शब्दांचे, आयुष्याच्या आठवणीतील चांगल्या क्षणाचे महत्व बरेच काल पर्यंत आपल्या स्मरणात राहील.

Thursday, April 7, 2011

दमलेल्या बाबाची.......

३ मुले आणी आई वडील असे हे कुटूंब. परिस्थिती अतिशय मध्यमवर्गीय. वडील एका कंपनीत लेखापाल ह्या पदावर. कुटुंबाचा खर्च जेमतेम भागेल एव्हडेच मासिक उत्पन्न. आपले मासिक उत्पन्न वाढविण्याकरिता आणी पदोन्नतीसाठी किमान पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे ह्याची वडिलाना जाणीव. दिवसभर काम करून संध्याकाळच्या कॉलेज मध्ये जाऊन, घरी वापस आल्यानंतर पुन्हा अभ्यास. ध्येय एकाच,आपल्या मुलांना चांगल्यात चांगल्या परीस्तीतीत ठेवण्यासाठी कोणतीही मेहनत करण्याची तयारी. ह्या सर्व ओढाताणीत, मुलांशी खेळण्यासाठी, बोलण्यासाठी, एकत्रित जेवण्यासाठी, पत्नीशी देखील बोलण्यासाठी वेळच नाही. आपले उज्वल भविष्य आणी त्याकरिता करावी लागणारी मेहनत, एव्हडेच विचार सतत डोक्यात. मेहनत करून पदवी परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केल्यानंतर पदोन्नती आणी पगारवाढ. घरची आर्थिक परिस्थिती थोडी सुधारलेली. तरी देखील अधिक सुधारण्याकरिता पुन्हा पदव्युत्तर परीक्षेची तयारी आणी सतत काम. नंतर अधिकारी ह्या पदावर पदोन्नती, पुन्हा पगारवाढ. दोन खोल्यांच्या घरातून ३ खोल्यांच्या घरात स्थानांतर. मुलांचे उत्तम भावित्तव्य घडविण्यासाठी, घरातील सर्वाना उत्तमात उत्तम सुविधा प्राप्त होण्यासाठी पुन्हा उच्च शिक्षण, पुन्हा कंपनीत फार मोठ्या पदावर पदोन्नती. सतत मेहनत आणी कामात व्यग्र ह्यामुळे ८-८ दिवस मुलांशी, पत्नीशी बोलणे देखील होत नव्हते. मुलांची आणी पत्नीची, बाबाशी/पतीशी बोलणेच होत नाही ही सततची तक्रार आणी ठराविक उत्तर, "मी ही सर्व मेहनत कोणासाठी करीत आहो?". आर्थिक परिस्थितीत अधिक सुधारणा झाल्यानंतर, स्वतः चा ५ खोल्यांचा ब्लॉक, पत्नीला कामात त्रास होऊ नये म्हणून दोन घरगड्यांची नियुक्ती, मुलांना उत्तमात उत्तम कॉलेज मध्ये दाखला, त्यांना कॉलेज मध्ये जाण्यासाठी कार आणी वाहनचालक.

नंतर कंपनीच्या सर्वात जेष्ठ पदावर पदोन्नती. समुद्रकिनारी, मुलांसाठी, पत्नी साठी नवीन बंगल्याची खरेदी. जेवढे मोठे पद तेव्हडीच कामाची जास्त व्यग्रता, सततचे दौरे, प्रवास आणी आपण सुरवातीला जे काही ठरविले होते ते सर्व आपल्या मुलांना मिळत आहे हे बघून धन्न्यता. परंतु वडील मात्र आपल्या पासून फार दुरावलेले आहेत, त्यांना आपणासाठी काहीच वेळ नाही ही मुलांची सततची तक्रार, पत्नीचीही हीच तक्रार. परिवारात एकत्रित संवादाचा संपूर्ण अभाव.

वडील, वय वर्षे ५५, संध्याकाळी चुकून लवकर घरी आले. मुले बाहेर गेलेली, पत्नी देखील मैत्रिणीसोबत बाहेर गेलेली. बंगल्यातील बाल्कनीत बसून चहा पीत समुद्र किनार्याचे अवलोकन. निसर्ग इतका सुंदर आहे ह्याची प्रथमच जाणीव झालेली. मनात अनेक विचार आणी आयुष्याचा संपूर्ण चित्रपट डोळ्यापुढे. आयुष्याच्या ह्या कुतरओढीत सर्व ऐहिक सुख प्राप्त केले, पण खऱ्या अर्थाने जीवन मात्र जगावयाचे राहूनच गेले. मुले, पत्नी दुरावलेली, काय मिळविले आयुष्याच्या ह्या संध्याकाळी. डोळ्यात दोन अश्रू आलेत आणी निर्धार केला. बस झाली ही धावाधाव, उद्यापासून प्रत्येक क्षण मुलांसाठी, पत्नीसाठी जगायचा. रात्री मुले, पत्नी घरी आलीत. अनेक वर्षानंतर सर्वांनी एकत्र जेवण केले, खूप गप्पा मारल्यात आणी वडिलांनी आपली चूक काबुल केली. सर्वाना हा एक सुखद धक्काच होता. वडिलांनी जाहीर केले, उद्यापासून सकाळी आपण सर्व समुद्रकिनारी फिरायला जावू , रोज संध्याकाळी मी लवकर घरी येईन, एकत्रित सर्वांनी जेवण करायचे, खूप गप्पा मारायच्या, शनिवार, रविवार संपूर्ण कुटुंबासाठी, आता ह्यापुढील सर्व आयुष्य फक्त आणी फक्त कुटुंबासाठीच. घरात प्रथमच अतिशय आनंदी वातावरण, आणी ह्याच आनंदी वातावरणात सर्व झोपायला गेलेत.

सकाळी ५.३० वाजता फिरायला जाण्यासठी मुलाने वडिलांच्या खोलीचा दरवाजा ठोठावला, दरवाजा उघडाच होता, वडील पलंगावर झोपलेले होते, वडिलांना उठविण्याचा मुलाने प्रयत्न केला, पण रात्रीच वडिलांची प्राणज्योत मालविलेली होती. वडिलांसाठी, कुटुंबासाठी ही सुंदर सकाळ झालेलीच नव्हती.

बहुदा अनेकांनी वाचलेली किंवा ऐकलेली ही कथा, परंतू जीवनात कोणत्या वेळी कशाला प्राधान्य द्यावे, बरेच काही आपणाला अंतर्मुख होवून विचार करावयास लावणारी.

Tuesday, March 29, 2011

प्रसंगावधान


१९७९ मध्ये मी नागपूर जिल्ह्यातील कचारीसावंगा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी ह्या पदावर कार्यरत होतो. डॉ. सपकाळ आमचे जिल्हा आरोग्य अधिकारी. एक वादग्रस्त व्यक्तिमत्व, पण खऱ्या अर्थाने व्यवस्थापन कौशल्य शिकावयाचे झाल्यास त्यांचे कडून शिकावे असे डॉ. सपकाळ. वेळप्रसंगी प्रशासनातील कायदे, नियम बाजूला सारून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना सतत मदत करणारे. त्यांचे दौरे मात्र संध्याकाळचे. संध्याकाळी ४-५ वाजता प्राथमिक आरोग्य केंद्रात २-३ मित्रांसोबत येणार, कामाची तपासणी, चर्चा केल्यानंतर मुक्काम करणार आणी दुसऱ्या दिवशी सकाळी नागपूरला परत जाणार. एकदा असेच सकाळी नागपूरला परत जाताना मलाही काही काम असल्यामुळे त्यांचेसोबत जाण्याची त्यांना विनंती केली आणी त्यांचेसोबत नागपूरला निघालो. त्याकाळी जिल्हा आरोग्य अधिकार्याची पांढरी raunold कार सर्वाना माहित असावयाची. कारण इतर सर्व जिल्हा स्थरावरील अधिकाऱ्यांच्या वाहनापेक्षा ही कार एक वेगळीच होती. काटोल मार्गे आम्ही नागपूर ला जाण्यास निघालो. रस्त्यात कळमेश्वर हे प्राथमिक आरोग्य केन्द्र आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात आणी रस्त्यावर २००-३०० माणसांची गर्दी. जिल्हा आरोग्य अधिकार्याची पांढरी कार बघून लोकांनी वाहन अडविले. स्थानिक वैध्यकीय अधिकार्याच्या विरोधात नारेबाजी सुरु केली. ही सर्व परिस्थिती का घडली त्याची पार्श्वभूमी:रात्री गावातील एक महिला प्रसुतीकारिता रुग्णालयात दाखल झाली. सकाळी तिची प्रसूती झाली आणी प्रसुतीनंतर तिला खूप रक्तस्त्राव सुरु झाला. वैध्यकीय अधिकार्यांनी तपासून काही जुजबी उपचार सुरु केलेत आणी अर्ध्या तासानंतर रक्तस्त्राव खूप प्रमाणात सुरूच असल्यामुळे आणी रुग्णाची सर्वसाधारण स्थिती गंभीर होत असल्यामुळे रुग्णांच्या नातेवायीकाना तिला तत्काळ नागपूर येथील वैध्यकीय महाविध्यालयात पुढील उपचारासाठी घेऊन जाण्याच्या सल्ला दिला. दुर्दैवाने त्यापूर्वीच रुग्णाचा मृत्त्यू झाला. थोड्याच वेळात १०-१२ लोक जमा झालेत. जनसमुदायाची नेहमीच आढळणारी मानसिकता. कोणत्याही परिस्थितीची शहानिशा न करता, डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे ही स्त्री दगावली, ही चुकीची बातमी वार्यासारखी गावात पसरली. १५-20 मिनीटातच १५०-२०० लोक गोळा झालेत. डॉक्टरच दोषी, मारा त्यांना, जाळून टाका हे केन्द्र, ही चर्चा आणी समुदायाची मानसिकता अधिकच भडकत गेली. डॉक्टरांनी घाबरून स्वतःला एक खोलीत कोंडून घेतले. दवाखान्यावर दगडे मारून काचा फोडल्या गेल्यात. आणी तेव्हाच आम्ही तेथे पोहचलो होतो. डॉ. सपकाळ हे जमावाच्या मध्यभागी गेलेत. कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. जमाव साहजिकच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तेवढ्यात २-३ लोकांनी रॉकेल च्या डबक्या देखील आणल्यात. बस.. जला दो, जला दो च्या घोषणा ऐकत येत होत्या. तेवढ्यात २-४ लोकांनी नारेबाजी सुरु केली, हे अधिकारी आता त्यांच्याच अधिकार्याला पाठीशी घालणार. "उनकी गाडी भी जला दो" जोर जोऱ्यात घोषणा सुरु झाल्यात. तेवढ्यात पोलीस ची गाडी ४-५ पोलिसांसह दवाखान्याच्या आवारात शिरताना दिसली. पोलिसांना बघून लोकांना अधिकच उधान आले, घोषणाबाजी सुरूच होती. आणी मग डॉ. सपकाळ ही काय चीज आहे ह्याची चुणूक दिसली. सर्वप्रथम त्यांनी पोलीस आणी त्यांची गाडी दवाखान्याच्या आवाराच्या बाहेर नेण्याचे आदेश दिलेत. एका माणसाच्या हातून रॉकेल चा डबा हिसकला, आणी कोणाच्याही लक्षात येण्यापुर्वीच स्वतःच्या गाडीवर आणी दवाखान्याच्या बाहेरील भिंतीवर डब्यातील रॉकेल भिरकविण्यास सुरवात केली. आणी आपल्या वाहन चालकास म्हणले " आन रे काडी पेटी, मीच प्रथम आग लावतो. लोकांना कळलेच नाही काय होतंय ते, क्षणात नारेबाजी थांबली. मग त्यांनी बोलण्यास सुरवात केली. त्या दुर्दैवी स्त्रीच्या मृत्यूस जर डॉक्टर जबाबदार असतील तर ह्या रुग्णालयाला मीच आग लावतो, तुम्ही कशाला तसदी घेता. नंतर, पोलीस इन्स्पेक्टर ला बोलावले, आतून डॉक्टर ला बाहेर काढले, पोलिसांना आदेश दिलेत, ह्या डॉक्टर विरुद्ध गुन्हा नोंदवून तत्काळ ह्यांना नागपूर ला पोलीस मुख्यालयी घेवून या. मला म्हणले, "देवा, १ तासात संपूर्ण निपक्षपाती चौकशी कर, कर्मचाऱ्यांचे, नातेवायीकांचे statements घे, आणी सर्व अहवाल तयार कर, तो पर्यंत मी येथेच थांबतो. लगेच नागपूर ला फोन करून वरिष्ठ अधिकार्याशी बोललेत. जमावाच्या मध्य भागी खुर्ची टाकून बसलेत आणी तेथेच स्थानिक लिपिकास डॉक्टरांचे निलंबनाचे आदेश टाईप करून आणण्याची सूचना दिली. स्वतःला अधिकार नसताना देखील ह्या आदेशावर स्वाक्षरी केली. सोबतच जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत येत आहे हे बघून त्यांचेही प्रभोदन करण्यास सुरवात केली. जमाव हळू हळू शांत झाला आणी ३० मिनीटातच जमावाची पांगापांग झाली. कधीही कल्पना देखील करू शकणार नाही असा हा मला आलेला अनुभव.२ तासानंतर आम्ही नागपूरला जाण्यास निघालो. मी म्हणलो, "सर, चौकशी अंती मला तरी डॉक्टर चा काहीच दोष दिसत नाही. उगाच आपण त्यांना निलंबनाची शिक्षा दिली आणी पोलिसांच्या गाडीत नागपूरला पाठविले" सर म्हणले, "जमावाला विवेकबुद्धी नसते, जमावाचे मानस शास्त्र जर आपण जाणले नसते तर कदाचित त्या क्षणी खरोखरच दवाखाना पेटवून दिला असता आणी डॉक्टरांना मारहाण देखील केली असती". दुपारी नागपूरला त्यांच्या कार्यालयात आलो तेंव्हा ते वैध्यकीय अधिकारी तेथेच बसले होते. फार घाबरले होते ते. डॉ. सपकाळ ह्यांनी त्यांना समजावून सांगितले, म्हणले तुम्ही निलाब्मित वगेरे काही झाला नाही आहात. तुमचा काहीच दोष नसल्यामुळे मी पूर्णपणे तुमच्या पाठीशी आहो. १५ दिवस आराम करा, परिस्थिती निवळेल, नंतर मीच तुम्हाला त्याच केंद्रात घेवून जायील. १५ दिवसांनी त्यांनी कळमेश्वर ला पंचायत समिती सभागृहात एक सभा बोलाविली. स्थानिक लोक प्रतिनिधी आणी इतर मान्यवर उपस्थित होते. डॉक्टर कसे बरोबर होते, त्यांचे काहीच चुकले नाही, दुर्दैवाने प्रसुतीपश्चात खूप रक्तस्त्राव झाल्यास ५-१० मिनिटात देखील मृत्यू होऊ शकतो, लोकांना समजावून सांगितले. तसेही त्या डॉक्टर बद्धल लोकांचे पूर्वमत चांगले असल्यामुळे त्यांना पुन्हा कामावर रुजू होऊ देण्यास कोणाचाच आक्षेप नव्हता. हेच डॉक्टर नंतर सेवानिवृत्त होत पर्यंत तेथेच होते आणी नंतर ही तेथेच स्थायिक झालेत.वरील प्रसंग, काय करावे, कसे वागावे, कोणत्याच व्यवस्थापनाच्या पुस्तकात ह्या बद्धल निश्चित सूचना नसतील. डॉक्टर सपकाळ ह्या प्रसंगी वागलेत ते योग्य कि अयोग्य, ह्यावर देखील चर्चा होऊ शकेल. परंतू त्या आकस्मिक स्थितीत त्यांनी दाखविलेले धैर्य, प्रसंगावधान आणी आपल्या अधिकार्याची चूक नाही तर त्याचे पाठीशी उभे राहणे, खरोखरच वाखाणण्यासारखे होते. केवळ डॉ. सपकाळ सारखी व्यक्तीच असे करू शकेल. परंतू, आकस्मिक स्थितीत लोकांच्या भावना अधिक न भडकावता, प्रसंगावधान दाखविणे कसे शक्य होते हे मात्र मी त्या प्रसंगातून शिकलो.

Saturday, March 5, 2011

सारांश - भाग 2 - The Immortals of Melhua

सोमरस, रामराज्य आणी चातुरवर्ण्य पद्धती
सोमरसाची संकल्पना आणी त्याची निर्मिती करण्याचा शोध लावणारा ब्रह्मदेव एक महान शास्त्रज्ञच. सोमरसाचा स्वतःसाठी उपयोग न करता समाजाच्या भल्यासाठी उपयोग कसा करता येईल आणी दुष्ट प्रवृत्तीचे लोक ह्याचा दुरुपयोग कसा करणार नाहीत आणी त्यावर नियंत्रण राखण्याकरिता ब्रह्मदेवाने केलेले कार्य नियोजन:
सर्व प्रदेशांमध्ये एक सखोल सर्वेक्षण करून भारताच्या सात विभागातून प्रत्येकी एक ह्या प्रमाणे अतिशय शीलवान, चारीत्र्य्पूर्ण अश्या सात तरुणांची निवड केली. स्वतःच्या गुरुकुलात समाजाच्या भल्यासाठी निरपेक्षरित्या साततत्याने कार्य करण्याची मानसिकता आणी कठोर प्रशिक्षण त्यांना दिले. Superhuman intelligence असणारे, समाजाला योग्य वर्तणुकीची दिशा दाखविणारे, कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता समाजाची सेवा करणारे, प्रत्येक प्रदेशातील एक असे हे सात ऋषी, म्हणजेच सप्तऋषी. वर्तणुकीचे अतिशय कठोर असे नियम त्यांना घालून दिले आणी नंतर त्यांनाच फक्त सोमरस प्राशन करण्याची अनुमती दिली. सप्तऋषीनी हळू हळू ब्रह्मदेवाच्या ह्या सर्व निकषानुसार नवीन नवीन तरुणांना आपल्या पंथात सामावून घेतले, त्यांना कठोर प्रशिक्षण दिले, आणी हा ब्रह्मदेवाचा पंथ किंवा ब्राह्मण म्हणून ओळखला जावू लागला. ह्या तरुणांमध्ये क्षत्रिय तथा इतर तरुण देखिल असायचे. कालांतराने, दुर्दैवाने, ह्यातील काही लोकांनी त्यांची आचारसंहिता विसरून, साधन, संपत्ती जमविण्यास सुरवात केली, सोमारसामुळे प्राप्त झालेल्या अतिरिक्त शक्तीचा दुरुपयोग करून लढाया करून आपआपली साम्राज्ये निर्माण केलीत. ब्राह्मणांमध्येसुद्धा त्यांच्या श्रेष्ठ्तेनुसार गरुड, मोर, हंस असे वर्ग होते. अहंकारामुळे स्वतःला अतिशय श्रेष्ठ् समजून त्यांनी क्षत्रिय, वैष ह्या वर्गातील श्रेष्ठ्, ज्ञानी, जबाबदार अश्या व्यक्तींची अवहेलना करण्यास सुरवात केली. ह्या सर्व प्रकारातून समाजात असहकार आणी बेबंदशाही निर्माण व्हायला लागली. शिवाय प्रत्येक समाजातील फक्त काही विशिष्ठ लोकानाच ह्याचा फायदा होत गेला आणी त्यांचीच फक्त उन्नति होत गेली. ह्या सर्व पार्श्वभूमीवर रामाने निर्माण केलेली आणी काटेकोर पणे आचरणात आणलेली चातुरवर्ण्य पद्धती कशी होती बघूया:
IIM कोलकाता येथून पदवी प्राप्त केलेल्या आमिष ह्या लेखकाने लिहिलेल्या "The Immortals of Meluha" ह्या पुस्तकातील हा सारांश. ही कोणतीही पौराणिक कथा किंवा पौराणिक कथांचे विश्लेषण नसून, वाचल्याशिवाय कळणारच नाही अशी कादंबरी.
रामाच्या असे लक्षात आले की, ह्यामुळे जातीव्यवस्था अधिकच बळकट होत आहे. ब्राह्मणांची मुले ब्राह्मण, क्षत्रियांची मुले क्षत्रिय, वैशांची मुले वैश, हीच परंपरा, ह्यात त्यांच्यातील गुणवत्तेचा, क्षमतेचा कोणताही विचार नाही. एख्याद्या ब्रह्मणाचा निर्बुद्ध मुलगाही ब्राह्मण तर एखाद्या क्षुद्राचा आतिशय हुशार, सर्व गुणवत्ता असणारा मुलगाही क्षुद्र. केवळ कर्मावर आधारित जात का नसावी हा रामाचा विचार आणी त्याने तो आमलात आणण्यास सुरवात केली. जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलाचा पालक म्हणजे राजा. ह्याकरिता रामाने काय केले? नर्मदा नदीच्या किनारी सर्व सोयीनी अध्यायावत अश्या एका फार मोठ्या रुग्णालयाची निर्मिती केली. ह्या रुग्णालयाचे नाव "माहेर". कोणत्याही जातीची असोत, संपूर्ण राज्यातील कोणतीही महिला गर्भवती असताना शेवटच्या तीन महिन्यात तिने "माहेर" मध्ये दाखल झालेच पाहिजे, हा आदेश आणी त्याची काटेकोर अंमलबजावणी. ह्यात श्रीमंत/गरीब असा कोणताही भेदभाव नाही. सर्वांच्या प्रवासाची व्यवस्था. महिलेला रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिच्या जवळ कुटुंबातील कोणीही व्यक्ती असणार नाही. त्या महिलेची संपूर्ण काळजी रुग्णालयातील प्रशिक्षित कर्मचारी घेणार. प्रसुतीनंतर काही कालावधी नंतर (४-६ महिने), ती महिला एकटीच तिच्या घरी परत जाणार. येथे जन्मलेल्या मुलांना आपले आई-वडील कोण आहेत, आपली जात कोणती? किंवा येथे जन्मलेल्या मुलांपैकी आपला मुलगा किंवा मुलगी कोणती? हे कोणालाच ठाऊक नाही. ह्या सर्व मुलांच्या आरोग्याची, विकास-वाढीची जबाबदारी राजाची. थोडी मोठी झाल्यानंतर त्यांना जवळच असणारया गुरुकुलात दाखल केले जाणार. त्यामुळे ह्या मुलांमध्ये कोण ब्राम्हणाचा, क्षत्रियाचा कि क्षुद्राचा, श्रीमंताचा कि गरीबाचा कोणालाच माहित नाही. सर्वाना सारखीच वागणूक आणी सारख्याच सोयी सवलती. ह्या सर्व मुलांचे मुलभूत शिक्षण झाल्यानंतर, त्यांच्या कला गुणवत्तेचा काटेकोर अभ्यास करून, त्या क्षेत्रात पारंगत होण्यासाठी गुरुकुलात त्यांना आवश्यक सर्व प्रशिक्षण दिले जाणार. युवावस्थेत पदार्पण केल्यानंतर ह्या प्रत्येक तरुणाला सोमरस दिला जाणार. १५ वर्ष पूर्ण केल्यानंतर त्यांची परीक्षा घेतली जाणार आणी ह्या परीक्षेच्या निकालावर आधारित त्यांना ब्राम्हण, क्षत्रिय, वैष, क्षुद्र ह्या जाती व्यवस्थेत वर्गीकरण केले जाणार. नंतर पुन्हा त्यांना जाती व्यवस्थेवर आधारित विशेष प्रशिक्षण दिले जाणार आणी त्यांना त्यांच्या वर्ण व्यवस्थेची ओळख म्हणून एक उपर्ण दिले जाणार. ब्राम्हनासाठी पांढरे, लाल क्षत्रीयासाठी, हिरवे वैशाकरिता आणी काळे क्षुद्राकरिता. रामाच्या दृष्टीकोनातून वर्ण म्हणजे रंग, जात नव्हे. पालकांनी नंतर मुलांसाठी अर्ज करायचा. ब्राह्मण पालकांना संपूर्ण ब्राह्मण वर्णातील एक मुलगा randomly दिला जाणार, त्याच प्रमाणे क्षत्रिय पालकाला क्षत्रिय वर्णातील एक मुलगा. हा मुलगा नंतर त्यांच्या पालकांकडे त्यांच्या मुलासारखाच वाढणार आणी त्याला सर्व मुलाचेच हक्क मिळणार. ह्या व्यवस्थेमुळे एखाद्या क्षुद्र मातेचा मुलगा त्याला सर्व सामान संधी उपलब्ध झाल्यामुळे आणी तो खूप हुशार असल्यास तरुणपणी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याचा वर्ण ब्राम्हण म्हणून निश्चित होणार आणी कोणी तरी ब्राम्हण पालक त्याचे पालकत्व स्वीकारणार. तसेच एखाद्या ब्राह्मण मातेच्या मुलाचे पालकत्व त्या मुलाला शिक्षणानंतर काळा वर्ण मिळाल्यास त्याचे पालकत्व एखादा शुद्र स्वीकारणार. आणी रामाने ही व्यवस्था इतक्या काटेकोरपणे आमलात आणली कि सर्व प्रजाही रामावर खुश होती.
अतिशय अनाकलनीय, बुद्धीला पटणार नाही, तरी देखील विचार करायला लावणारे एक वेगळेच लिखाण लेखकाने ह्या पुस्तकात केलेले आहे.

Sunday, February 20, 2011

सारांश - भाग १ - The Immortals of Melhua


बृहस्पती आणी शिवा (नीलकंठ) ह्या दोघांमधील हा संवाद:
बृहस्पती म्हणले, वैचारिक पातळीवर सोमरसाचे शरीरातील कार्य सुलभ असू शकेल, परंतू ही महान संकल्पना प्रत्यक्षात साकारण्याचे कार्य मात्र ब्रह्मदेवाचे". Aging process काही औषधांनी पुढे ढकलणे कसे शक्य आहे ह्याचा अभ्यास करण्यापूर्वी आपण जिवंत का असतो? अशी कोणती मुलभूत बाब आहे जी आपणाला जिवंत ठेवते? बृहस्पती म्हणले, ही मुलभूत बाब म्हणजेच "उर्जा". जोपर्यंत व्यक्ती जिवंत असते तो पर्यंत बोलताना, चालताना, विचार करताना, कामे करताना आणी झोपेत देखील ह्याच उर्जेचा जिवंत राहण्यासाठी उपयोग होतो. ह्या उर्जेचे स्त्रोत काय? तर आपण जे अन्नपदार्थ सेवन करतो त्या अन्नाचे उर्जेत रुपांतर होते, ती शरीरात साठविली जाते. त्यामुळे काही दिवस आपण पूर्ण उपवास जरी केला तरी आपणाला अशक्त जरूर वाटेल, पण तरीदेखील आपण जिवंत असतो. अन्नपदार्थांपासून ही उर्जा वातावरणातील हवेतील प्राणवायू मुळेच निर्माण होते. त्यामुळे, अन्नपदार्थांचे सेवन करूनही, प्राणवायू अभावी उर्जा निर्माण होणार नाही आणी जिवंत राहण्यासाठी उर्जा नसल्यामुळे मृत्त्यू अटळ आहे. शिवा म्हणला," परंतू ह्या सर्वांचा, aging प्रोसेस, काही औषधांनी पुढे ढकलण्याशी काय संबध आहे?" बृहस्पती हसले आणी म्हणले, "हीच तर खरी गोम आहे, जो प्राणवायू आपणाला जिवंत ठेवतो तोच प्राणवायू aging process आणी मृत्त्यू साठी कारणीभूत आहे. जेव्हा प्राणवायू आणी अन्नपदार्थ ह्यांचा संयोग होवून एका रासायनिक प्रक्रियेद्वारे उर्जा निर्माण होते, त्याच प्रक्रियेतून oxidents हे free radicles शरीरात निर्माण होवून साठविले जातात. जसे लोखंडावर प्राणवायूची प्रक्रिया होवून oxidizing process द्वारे त्यावर जंग (rust) निर्माण होवून हळू हळू लोखंडाची गुणवत्ता कमी कमी होत जाते, एखादे फळ हवेत ठेवले तर ते फळही कालांतराने प्राणवायूच्या प्रक्रियेमुळे खराब होते, सडते, तशीच प्रक्रिया आपल्या शरीरात देखील होते. प्राणवायूच्या प्रक्रियेमुळे निर्माण झालेले हे oxidents हळूहळू शरीरातील पेशींवर विपरीत परिणाम करण्यास सुरवात करतात. लोखंडासारखे आपले शरीरही आतून गंजत जाते, हीच aging प्रोसेस, आणी त्याचा परिपाक म्हणजे मृत्त्यू. जो प्राणवायू आपणाला जीवन देतो तोच प्राणवायू हळू हळू आपणाला मृत्त्युच्या निकट नेत राहतो". ज्याप्रमाणे आपण अन्न, पाणी शरीरात साठवून ठेवू शकतो, ह्या गोष्टी मिळाल्या नाही तरी बरेच दिवस जिवंत राहू शकतो, पण प्राणवायू मात्र साठवून ठेवू शकत नाही, काही मिनिटातच प्राणवायू अभावी मृत्त्यू अटळ आहे. कदाचित साठविलेला प्राणवायू हे शरीरासाठी विष ठरेल म्हणूनच निसर्गाने ही किमया केलेली असावी.
बर्याच शास्त्रीय अभ्यासांती ब्रह्मदेवानी सोमरसाचा शोध लावला. सोमरस प्राशन केल्यानंतर शरीरातील oxidents सोबत ह्या सोमरसाची प्रक्रिया होवून हे प्राणघातक oxidents घामाद्वारे किंवा लघविद्वारे विसर्जित केले जातात. सोमरसाचे एका विशिष्ठ कालाविधीनंतर नियमित प्राशन केल्यास aging process आणी मृत्त्यू ही प्रक्रियाच लांबते हाच ब्राह्म्देवांचा शोध. अमिष ह्या कोलकाता येथील IIM संस्थेतून पदवी प्राप्त केलेल्या लेखकाने लिहिलेल्या "The Immortals of Melhua " ह्या पुस्तकातील वरील सोमरसाची पार्श्वभूमी.

राम हा एक सूर्यवंशीय रजा, ज्याने आपल्या प्रजेसाठी आचार विचारांची एक दिशा ठरवून दिली, ज्या प्रदेशात हे रामराज्ज्य अस्तित्वात होते त्या प्रदेशाला लेखकाने "meluha " म्हणून संबोधित केले आहे आणी राजधानी देवगिरी. सोमरसाचा शोध तर ब्रह्मदेवानी लावला परंतू त्याची निर्मिती कोठे करावी जेणेकरून त्याचा दूरूपयोग होणार नाही, म्हणूनच नीती आणी अचार विचारांनी परिपक्व असणारया सूर्यवंशीय meluha ह्या राम राज्ज्यातील मंदार पर्वताची निवड करण्यात आली. बृहस्पती हे ह्या निर्मिती कारखान्याचे प्रमुख. सोमरसाच्या निर्मितीसाठी आवश्यक वनस्पती, संजीवनी वृक्ष मंदार पर्वतानजीकच्या अर्रण्यात भरपूर प्रमाणात उपलब्ध असल्यामुळेच ह्या जागेची निवड. फक्त सरस्वती नदीच्या पाण्याचाच उपयोग सोमरस निर्मितीसाठी होणार असल्यामुळे, मोठ्या कालव्याद्वारे सरस्वतीचे पाणी आणण्यात आले.

सोमरस सेवन केल्यानंतर बर्याच कालावधीपर्यंत विसर्जित होणारा घाम आणी मल- मुत्र ह्यात फार मोठ्या प्रमाणात oxidents असल्यामुळे, आणी ह्या विसर्जनाची योग्य विल्हेवाट न लावल्यास त्याचा शरीरावर आणी त्याच्या सान्निध्यात येणाऱ्या लोकांवर विपरीत परिणाम होणार हे जाणून, व्ययक्तिक स्वच्छता, रोज दोन वेळा स्नान करणे ही सूर्यवंशीयांची सवय, सांडपाण्याची मोठ मोठ्या बंद नाल्या निर्माण करून योग्य विल्हेवाटलावणे हे राजाचे कर्त्तव्य.
अभिमान वाटावे असे रामाने निर्माण केलेले सूर्यवंशीय राज्ज्य. नंतरच्या अनेक पिढ्यातील सूर्यवंशीय राजांनी ही परंपरा जोपासलेली, परंतू हळू हळू ही परंपरा नष्ट होईल काय ह्या भीतीने धास्तावलेले दक्ष (पुस्तकात रामाचा वंशज म्हणून दक्ष राजाचा उल्लेख आहे, दक्ष राज्याचे वय १८८ वर्ष आणी दक्ष राजाची पुत्री म्हणजे सती किंवा पार्वती - वय - ८८). भीती वाटण्याचे महत्वाचे कारण म्हणजे सरस्वती नदीच्या पाण्याचा सतत कमी होत असणारा स्त्रोत. शिवाय शेजारच्या चंद्रवंशीय आणी नागा राज्ज्यकर्त्यांचे सतत होणारे आक्रमण. ह्या सर्व परिस्थितीवर फक्त एकाच व्यक्ती तोडगा काढू शकेल ज्या व्यक्तीचा गळा सोमरसाचे सेवन केल्यानंतर निळ्या रंगाचा होईल. तिबेट मधील मानसरोवर परिसरातील क्षेत्रात अनेक आदिवासी टोळ्या राहत होत्या. अश्याच एका टोळीचा शिवा हा नायक. सूर्यवंशीय राज्याचे मुख्यालय म्हणजे देवगिरी (सात नद्यांचा हा प्रदेश - गंगा, यमुना, सरस्वती, सिंधू, ब्रह्मपुत्रा, शरयू आणी दक्षिणेची राज्याची हद्द म्हणजे नर्मदा). मेलुहा प्रदेशाचा प्रधान म्हणजे "नंदी" . तो शिवाला त्याच्या टोळीसह मेलुहा राज्यातील श्रीनगर येथे घेऊन येतो. सर्व पाहुण्यांना सोमरस दिल्यानंतर, फक्त शिवा सोडून सर्वाना फार त्रास व्हायला लागतो. फक्त शिवाला मात्र काहीच त्रास होत नाही, किंबहुना सोमरस पिल्यानंतर त्याचा कंठ नेहमीचा निळा होतो. हाच तो नीलकंठ, सूर्यवंशीयांना वाचविणारा, म्हणून नंदी त्याला देवगिरी राज्यात घेवून येतो. सोबत शिवाचा मित्र वीरभद्र हा देखील असतो.

आपण सर्वांनी ऐकलेल्या पौराणिक कथांच्या अगदी वेगळे असे हे कथानक. बर्याच गोष्टी अत्तर्क्य, अनाकलनीय, विश्वास न पटण्यासारख्या, तरी देखील, पुस्तकातील राम राज्याची, सोमरसाची संकल्पना विचार करण्यासारखी. आणी अगदी पहिल्या पानापासून वाचतच राहावं असे वाटणारे हे कथानक. सोमरसाची निर्मिती केल्यानंतर त्याचा दूरूपयोग होऊ नये म्हणून ब्रह्मदेवाने केलेली उपाययोजना आणी त्याच अनुषंगाने नंतर रामाने अमलात आणलेली चातुरवर्ण्य पद्धती ह्या बाबत वाचा माझा पुढील लेख ..

Saturday, February 12, 2011

उंदीर आणी प्रशासन


मंत्रालयातील सामान्य प्रशासन हा अतिशय महत्वाचा विभाग. श्री करडे, ह्या विभागातील एक अतिशय कर्मठ कर्मचारी. सेवानिवृत्तीला एक वर्ष राहिले असताना कक्ष अधिकारी म्हणून पदोन्नती झालेली. सर्व कायदे मुखोद्गत, कायद्याचा किडा म्हणूनच प्रसिद्धी. काम झाले नाही तरी चालेल पण कायदे, नियम मात्र पाळले गेलेच पाहिजे हा सततचा अट्टाहास. त्यामुळेच कोणाशीच न पटणारी ही व्यक्ती. सामान्य प्रशासन विभागातील भांडार म्हणजे एक मोठं कक्ष आणी त्यात ३०-४० racks, जुन्या पुराण्या असंख्य files त्यात ठेवलेल्या. ह्या साठी एक कक्ष अधिकारी आणी एक शिपाई एवढाच staff. फायीलींची आवक जावक आणी त्यांच्या नोंदी ठेवणे एवढेच काम. कोणालाच नको असणारया श्री करडे ह्यांना साहजिकच पदोन्नती नंतर ह्या भांडारात पाठविण्यात आले.

एक दिवशी सकाळी ११ वाजता आपल्या खुर्चीत बसले असता श्री करडे ह्यांना एक उंदीर दिसला आणी त्यांचे विचारचक्र सुरु झाले. कायदे आणी नियमाचा किडा ते, एक नस्ती (file ) घेतली आणी कागदावर लिहिण्यास सुरवात केली. " दिनांक .. वेळ . विषय: उंदीर आणी त्यामुळे शासनाचे होणारे संभावित नुकसान - आदरणीय महोदय, आज सकाळी खुर्चीवर बसलेलो असताना सकाळी ११ वाजून १७ मिनिटांनी एक उंदीर मला rack क्रमांक ९ समोरून निघून rack क्रमांक १० खाली गेलेला दिसला. ह्या कक्षात अनेक अतिशय महत्वाच्या files आहेत, हा उंदीर त्या files नष्ट करण्याची शक्यता नाकारता येत नाही. मला सेवानिवृत्तीला फक्त १० महिने राहिलेले आहेत. ह्या files व्यवस्थित राखणे माझी नियम क्रमांक ..... नुसार जबाबदारी आहे. परंतू ह्या उंदरावर कोणतीही कार्यवाही करण्याचा नियम क्रमांक ..... नुसार मला अधिकार नाही. त्यामुळे ह्या विषयावर त्वरित कार्यवाही न झाल्यास आणी काही महत्वाच्या files नष्ट झाल्यास मी जबाबदार राहणार नाही. शेवटच्या ओळीवर लाल शाईने अधोरेखांकित केले. खाली आपली स्वाक्षरी केली. त्याखाली नियमानुसार सेवा जेष्ठतेनुसार अवर सचिव, उप सचिव, सचिव आणी प्रधान सचिव ह्याची नावे लिहिली. file ला "प्रथम प्राधान्य", "अति महत्वाचे", "तातडीचा निर्णय" "विशेष दुताद्वारे" असे ४-५ लाल रंगाचे tags लावले. शिपायाला बोलावून ही file तत्काळ अवर सचिवांकडे घेवून जाण्याचे आदेश दिले. शिपाई file घेवून अवर सचिवांच्या कक्षात गेला. सामान्यतः मंत्रालयात कोणत्याच file वर तातडीने निर्णय होत नसतो. ४-५ tags लावलेली file, शेवटचे फक्त लाल शाईने अधोरेखांकित केलेले वाक्य वाचले. विचार केला "काही तरी भंयकर प्रकरण दिसतंय, न वाचताच आपली लहान स्वाक्षरी केली आणी त्याच शिपायाला ही file उप सचिवांकडे घेवून जाण्याची सूचना दिली. " ह्या विषयावर त्वरित कार्यवाही न झाल्यास आणी काही महत्वाच्या files नष्ट झाल्यास मी जबाबदार राहणार नाही" हे लाल शाईने अधोरेखांकित केलेले वाक्य वाक्य पाहून वरील अधिकार्यांनीही न वाचता सही करून शेवटी शिपाई ही file घेवून प्रधान सचिवांच्या कक्षात गेला. त्यांनीही शेवटचे वाक्य वाचले आणी त्याखालील सर्वांच्या सह्या पहिल्या. इतर काहीच वाचले नाही. आता आपण निर्णय घेतला आणी फसलो तर? त्यांनी तत्काळ त्यांच्या हाताखालच्या अधिकार्याला पाचारण केले. file त्यांच्या अंगावर फेकली "मूर्ख, मी सचिव असताना अश्या files मी कधीच वरिष्ठांकडे पाठवत नव्हतो, मीच निर्णय घेत होतो. कशाला बसलात ह्या खुर्चीवर, मूर्ख, बेजबाबदार" शिव्या देवून हाकलून दिले. आणी नंतर हीच वर्तणूक आणी हेच वाक्य - उप सचिव, अवर सचिव ह्यांनी देखील त्याच प्रमाणे आपल्या हाताखालच्या अधिकाऱ्यांच्या अंगावर ही नस्ती फेकून दिली. आणी सर्वात शेवटी शिपायाच्या अंगावर. बिचारा शिपाई ही file घेवून वापस आला. श्री करडे चहा पिण्यासाठी बाहेर गेलेले पाहून शिपायाने ही file साहेबांच्या खुर्चीतील उशीखाली दडवून ठेवली.

२ महिन्यानंतर श्री करडे खुर्चीत बसले असता त्यांच्या ढुंगनाला काही तरी टोचले. उशी वर करून पहिले तर ही file , त्याचीच एक टाचणी त्यांच्या ढुंगनाला टोचली होती. पुन्हा ४-५ नियम, कायदे ह्यांचा उल्लेख करून एक पानभर लिहून ही नस्ती वर पाठविली. शेवटी ही नस्ती प्रधान सचिवांकडे पोहचली. नस्ती वाचावीच लागली त्यांना. एक उंदीर आपल्या विभागात धुमाकूळ घालतोय हे त्यांना कळले. त्यांनी शेरा लिहिला " सामान्य प्रशासन विभागाकडे, उंदराच्या अपेक्षित कार्यवाही बाबत तांत्रिक ज्ञान असणारे अधिकारी नसल्यामुळे ही नस्ती तांत्रिक मार्ग्दर्षानाकरिता आणी योग्य उपाय योजना सुचविण्याकरिता संबंधित विभागांकडे पाठविण्यात यावी. आरोग्य विभाग, कृषी विभाग, warehouse corporation आणी defense ह्या चार विभागांची निवड झाली. पत्रव्यवहार सुरु झाला. आरोग्य विभागाचे अधिकार चौकशी साठी आले. त्यांचा अहवाल " आरोग्य विभाग उंदरांमुळे निर्माण होणारया रोगांच्या प्रतीबंधानाचे तथा उपचाराचे कार्य करते, उंदराला नाहीशे करणे ह्या विभागाचे काम नाही". कृषी विभागाचा चौकशी अहवाल " हा उंदीर घरगुती उंदीर होता कि शेतातील ह्याचा खुलासा करावा, शेतातील उंदीर असल्यास कृषी विभाग निश्चितच मार्गदर्शन करू शकेल". warehouse corporation चा अहवाल " आम्ही उंदीर मारीत नाही तर उंदीर आत येवू शकणार नाही असे warehouse बांधतो. आपल्या विभागाला असे भांडार निर्माण करावयाचे असल्यास आम्ही निश्चितच तांत्रिक सल्ला देवू" सुरक्षा विभाग थोडा समजदार असावा, अधिकारी न पाठवता त्यांनी उलट विचारणा केली " आकस्मिक स्थितीतच सुरक्षा विभाग नागरी विभागास मदत करू शकतो. आपल्या राज्यात आकस्मिक स्थिती जाहीर झालेली आहे काय? नसल्यास कृपया आकस्मिक स्थिती जाहीर करण्यासाठी माननीय राष्ट्रपती महोदयांना प्रथम विनंती करावी"

तो पर्यंत एक उंदीर धुमाकूळ घालतोय हे मंत्रालयात सर्वाना माहित व्हायला लागले. सर्व अहवालांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी महाबळेश्वर येथे दोन दिवसांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ४०-५० अधिकारी सपरिवार उपस्थित होते. निर्णय झाला "ह्या उन्दरासाठी काय करावे ह्याची तांत्रिक माहिती आपल्या कोणत्याच विभागाकडे नसल्यामुळे परदेश प्रशिक्षण दौरा आयोजित करून ३-४ देशांना भेटी द्याव्या". ५ अधिकारी , ५ मंत्री आणी ५ आमदार असे सर्व ४ देशांचा १५ दिवसांचा परदेश दौरा करून परत आले. पुन्हा कार्यशाळा, चर्चा सुरूच राहिली. प्रत्येक विभागात काही असंतुष्ठ अधिकारी, कर्मचारी असतातच. त्यांनी ही सर्व माहिती गोळा करून विरुद्ध पक्षाच्या आमदारांना पुरविली. विधानसभेत आणी विधान परिषदेत प्रश्न विचारण्यात आले, अनेक तास चर्चा झाली, दोन वेळा सभात्याग झाला.

सेवानिवृत्तीला एक महिना राहिला असताना, शिपायाने श्री करडे ह्यांना ह्या उंदराच्या प्रकरण बाबत विचारणा केली. नस्तीतील सर्व माहिती नियम आणी कायद्यासह श्री करडे ह्यांनी शिपायाला समजावून सांगितली. शिपाई म्हणाला, " अर्रेचा, हाच तो उंदीर होता काय? साहेब आपणाला ज्या दिवशी तो उंदीर दिसला त्यानंतर २-३ दिवसांनी मी दरवाज्याजवळ स्टूल वर बसलो होतो, मला तो उंदीर आलामारीखाली दिसला, हातात झाडू घेवून दबा धरून बसलो, थोड्या वेळाने तो पुन्हा बाहेर आला, एका झाडूतच त्याला मारला आणी बाहेर फेकून दिला". श्री करडे, अरे त्या उंदराची केस सुरु असताना तू त्याला कसा मारलास? त्यांनी पुन्हा कायदे, नियम लिहून नस्ती तयार करून वर पाठविली आणी शेवटी चौकशी सुरु असणारया उंदराला मारले म्हणून शिपायाला निलंबित करण्यात आले.

प्रशासन आणी व्यवस्थापन हे दोन शब्द आपण नेहमीच ऐकत असतो. प्रशासन म्हणजे कायद्याच्या, नियमांच्या चौकटीत राहून कार्य करणे. तर व्यवस्थापन म्हणजे उपलब्ध मनुष्यबळ, सामुग्री आणी पैसा ह्यांचा योग्य विनियोग करून अपेक्षित उद्धेश अपेक्षित कालवधीत साध्य करणे. अपेक्षित उद्धेश साध्य करणे हे व्यवस्थापनाचे महत्वाचे कार्य, प्रशासनाचेही तेच कार्य आहे, परंतू उद्धेश साध्य करण्याकडे प्राथमिकता न देता कायदा आणी नियमांचा कीस पडून, फक्त कायद्याच्या, नियमांच्या चौकटीत राहून कार्य करणे हा शासकीय दृष्टीकोन. उंदीर हा जर problem होता तर माझ्या दृष्टीने तो शिपाई एक चांगला व्यवस्थापक होता कारण त्वरित निर्णय घेवून त्याने हा प्रोब्लेम सोडविला होता. पण प्रशासन बघा, बक्शिश तर सोडाच, चौकशी सुरु असणारया उंदराला मारले म्हणून त्यालाच निलंबित व्हावे लागले. ह्या प्रसंगाकडे एक हास्यास्पद कथा म्हणून न बघता, अनावश्यक कालाप्यव्यय, पैश्याचा अनाठायी खर्च टाळण्यासाठी प्रशासन आणी व्यवस्थापन योग्य रित्या समजून आपला उद्धेश कश्या प्रकारे साध्य करता येईल ह्याकडे लक्ष देवून अधिक जाणीवपूर्वक कार्य करणे महत्वाचे ठरते.

Friday, January 28, 2011

आत्महत्त्या



आत्महत्त्या


  • २२ वर्षीय विवाहित महिलेची अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेवून आत्महत्त्या - संभाव्य कारण "हुंडा"
  • विषप्राशन करून २ शेतकऱ्यांची आत्महत्त्या - ? कर्जबाजारी
  • दिराच्या लैंगिक छळवादाला कंटाळून फाशी लावून नवविवाहितेची आत्महत्त्या
  • २ कॉलेज विध्यार्थांची हाताची नस कापून आत्महत्त्या - प्रेमातील अपयश - संभाव्य कारण
  • ७ व्या माळ्यावरून उडी मारून एका तरुण म्यानेजर ची आत्महत्त्या - कामातील असःह्य झालेला ताणतणाव
  • एका हॉटेल मध्ये नवविवाहित जोडप्याची झोपेच्या गोळ्या खावून आत्महत्त्या - संभाव्य कारण "अंतरजातीय विवाह"
  • चालत्या गाडीतून उडी मारून एका तरुणाची आत्महत्त्या - संभाव्य कारण " लैंगिकदृष्ट्या असमर्थता"
  • समुद्रात बुडून एका व्यापाऱ्याची आत्महत्त्या - संभाव्य कारण " मित्राने केलेली फसवणूक आणी धंद्यात खोट"
  • वेल्लोर मेडिकल कॉलेज मधील एका कौनसिलर ची आत्महत्त्या - सतत परामर्श देताना झालेला असःह्य ताणतणाव

वर्तमानपत्र वाचताना किंवा टीवी बघताना सातत्याने दिसणाऱ्या ह्या बातम्या. २००९-२०१० चा गुन्हे विभागाचा अहवाल - गेल्या दशकात आत्महत्येचे प्रमाण १ लक्ष लोकसंखेमागे ८.४७ वरून ११.२७ इतके वाढलेले. अहवालानुसार एका वर्षात ११०५८७ आत्महत्यांची नोंद. दररोज ३१० आणी प्रत्येक ५ मिनिटाला एका आत्महत्येची नोंद. सर्वसाधारणपणे पुरुष आणी स्त्रया ह्यांचे आत्महत्येचे प्रमाण १.२ मागे १.००, परंतू १५ ते २९ वयोगटात हेच प्रमाण ०.८ मागे १.५. दूरदैवाची बाब म्हणजे केरळ सारख्या भारतातील सामाजिक - सांस्कृतिक पुढारलेल्या आणी १००% स्त्रियांची साक्षरता असणाऱ्या राज्यात हेच प्रमाण १ लक्ष लोकसंखेमागे ३१. आणी सर्वच क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या बंगलोर शहरात हेच प्रमाण १ लक्ष लोकसंखेमागे ३४. अंगावर शाहरे आणणाऱ्या ह्या बातम्या आणी ही आकडेवारी. खरोखरच आम्ही सुशिक्षित, सकारात्मक विचारसरनीचे झालेलो आहोत काय? आणि ही आकडेवारी फक्त नोंदी झालेल्या घटनांची, पोलिसांच्या आणी इतर अनेक दबावांमुळे कितीतरी घटनांची नोंदच होत नाही, ही वस्तुस्थिती. कदाचित एका मोठ्या हिमनगाचा हा एक वरवर दिसणारा भाग. आत्महत्येने नोंद झालेल्या मृत्यूंच्या १० ते २०% जास्त आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांचे प्रमाण, आणी ३०-४०% जास्त आत्महत्येचा विचार सतत मनात असणारयांचे प्रमाण (अश्या व्यक्ती त्यांच्या कामांवर संपूर्ण लक्ष केंद्रित करून, त्यांच्या कडून अपेक्षित असणारे कार्य करू शकतील काय? त्याचा विपरीत परिणाम देश्याच्या सर्वांगीण प्रगतीवर होईल काय?) . एक शास्त्रीय आकडेवारी. खरोखरच भयंकर आहे ही आकडेवारी. आणी, असं कां घडाव हा एक मोठा यक्षप्रश्न?

कौटुंबिक समस्या, लैंगिक समस्या, सामाजिक - सांस्कृतिक - आर्थिक समस्या, दीर्घ आजार, मानसिक आजार, बेरोजगार, कामाच्या ठिकाणी सतत असह्य होत असलेला ताणतणाव, खाजगी क्षेत्रात कार्य करताना अपेक्षित कामाची सततची मागणी आणी त्यातून निर्माण होणारी विफलता, विशेषतः खाजगी क्षेत्रात कार्य करताना नौकरिची सतत अशास्वती, प्रेमभंग, परीक्षेतील अपयश, लैंगिकतेवर आधारित स्त्रियांवर होणारे अत्त्याचार ... ही सर्व साधारणपणे नोंद झालेली आत्म्हत्त्येची कारणे. परंतु ह्या सर्वामागील पार्श्वभूमी, मुलभूत कारणे, आत्म्हत्त्येस प्रवृत्त करणारी परिस्थिती कदाचित वेगळीच असू शकेल, त्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे काय? कारण अनेक वेळा पोलीस नोंदीत असणारया कारणांवर आपलाच विश्वास बसत नाही.

आरोग्य हा जर प्रत्येकाचा मुलभूत अधिकार आहे, आणी, आरोग्याच्या व्याखेत जर मानसिक आरोग्याचा समावेश आहे, तर खऱ्या अर्थाने आपण स्वतः आरोग्य म्हणजे काय हे समजून घेतो काय आणी ते प्राप्त करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतो काय? आत्महत्येचे वाढते प्रमाण हे समाजाच्या खालावलेल्या प्रवृत्तीचे द्योतक आहे. एकीकडे सगळीकडे दिसणारी/ जाणवणारी सामाजिक - आर्थिक उन्नती तर दुसरीकडे आत्महत्येचे वाढते प्रमाण, हा एक मनाला न पटणारा विपर्यास.

जर आत्म्हत्त्येस जबाबदार असणारे सकृतदर्शनी कारण, त्या मागील पार्श्वभूमी, सामाजिक - सांस्कृतिक - आर्थिक समस्या, ह्या सर्वांचा विचार केल्यास, एका करणामागील अनेक उपकारणे, प्रत्येक उपकारणांची पुन्हा उपकारणे, ह्या सर्वांचा विचार करून, वर्तनुकिंची एक समजून उमजून दिशा निश्चित कारणे आणी त्या प्रमाणे सातत्याने वर्तणूक अंगीकार करणे आवश्यक ठरते. बरेच वेळा आत्महत्त्या करणाऱ्या व्यक्तीत त्याच्या वागण्यात काही बदल झालेले जाणवू शकतात. त्यावर वेळीच उपाय योजना केल्यास ही आत्महत्त्या टळू शकते. आपल्या कुटुंबात, मित्र मंडळीमध्ये , कार्याचे ठिकाणी, आपल्या आजूबाजूच्या व्यक्तीत जाणविणारे खालील बदल भविष्यातील धोक्याची घंटा ठरू शकतात:

  • नेहमीच्या वर्तणुकीत अचानक जाणवणारा बदल, झोप न लागणे किंवा खूप वेळ झोपतच राहणे
  • आपल्या कामावर लक्ष केंद्रित न करणे
  • विनाकारण चिडचिड, निराशा, वैफल्यता, इतरांपासून एकटे राहण्याची प्रवृत्ती, अचानकच जडणारी व्यसनाधीनता.
  • जीवनात काहीही ठेवले नाही, माझी कोणालाच गरज नाही, सर्व माझ्या विरोधातच आहेत, मी कोणाच्याच उपयोगाचा राहिलेलो नाही, मला आत्महत्त्या करावीशी वाटते, अश्या प्रकारची सतत भाषा वापरणे.

ह्या अश्या प्रकारच्या वर्तणुकीतील बदल जाणवल्यास, सर्व प्रथम अश्या व्यक्तींचे शांत पणे ऐकून घेणे, कारण शोधण्याचा प्रयत्न करून त्या करिता काही करता येईल काय हा विचार करणे, अश्या व्यक्तींना शक्क्यतोवर एकटे न सोडणे, योग्य परामर्शदात्याची भूमिका वठविणे, गरज भासल्यास मानसिकतज्ञ सल्ला, आणी सर्वात महत्वाचे, अश्या व्यक्तीची टिंगल टवाळी न करणे अतिशय महत्वाचे ठरते.

आत्महत्त्या टाळण्यासाठी समाजाने, इतरांनी, कार्यालयातील वरिष्ठ अधिकार्यांनी, घरातील वडील व्यक्तींनी, आरोग्य विभागाने काय करायला हवे, कसे वागायला हवे, ह्यावर न संपणारी चर्चा न करता, "मी एक व्यक्ती म्हणून काय करू शकतो, ते सर्वस्वी माझ्या हातात आहे असा विचार करून, मी प्रथम माझ्या वर्तणुकीत कसा बदल घडवून आणेल, ह्याचे आत्मपरीक्षण करण्याची जास्त गरज आहे. तसेच मी एक चांगला परामर्शदाता कसा ठरू शकेल, ह्याकरिता जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे. अशी दुर्दैवी घटना माझ्या कुटुंबात देखील घडू शकेल आणी हे टाळण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याची गरज

Monday, January 17, 2011

पती-पत्नी एकाच नाण्याच्या दोन बाजू


दोन प्रसंग/अनुभव:
प्रसंग १: उच्चमध्यमवर्गीय कुटूंब, लग्नाला १५-२० वर्षे झालेली. ऑफिस मध्ये रजा टाकल्यामुळे पती घरी. छोट्या छोट्या कारणांवरून दोघांमध्ये धूसपूस, आणी रागाने पती बाहेर निघून जातो. घरातील मुलांच्या, सासूसासर्यांच्या जबाबदारया, घरातील कामे, पती समजूनच घेत नाही म्हणून ती देखील रागावलेली. संध्याकाळी तो घरी आला. खोलीत तिला पाहून पलंगावरील नीट असलेली चादर त्याने उगाच पुन्हा नीट केली, मोगरयाची चार फुले तिच्या उशीजवळ ठेवून दिली, आणी म्हणला, चुकलेच माझे, असे वागायला नको होते. ह्या शब्दांनी ती देखील विरघळली आणी म्हणली "अहो कळतोना तुमचा राग आणी धूसपूस, पण दिवसभर सर्वांसाठी राबताना केवळ तुम्हीच एकटे माझे, मग माझाही वैताग मी कोणावर काढणार?" तो म्हणला, " आज रजा होती, वाटल मोकळेपणे जगावे, तुला नाही का वाटत कधी तरी अगदी मोकळ मोकळ व्हावस, झटकून सगळी ओझी एक दिवस तरी दुसऱ्याच जगात जगावस?' ती म्हणली " बघून मोगरयाची ही फुले आणी जाणवणारे तुमचे हे प्रेम मनोमनी, जगतेच तर आहे दुसऱ्या जगात ह्या क्षणी" स्वतःचाच मग त्याला राग आला आणी डोळ्यात अश्रू आले दोन, माझ्याशिवाय हिला समजणारे दुसरे आहे तरी कोण? वाटल होत फुकट गेली आज माझी रजा, पण राग येण आणी नंतर जवळ येण हीच तर जीवनाची खरी मजा"

प्रसंग २: उच्चमध्यमवर्गीय कुटूंब, लग्नाला १५-२० वर्षे झालेली. ऑफिस मध्ये रजा टाकल्यामुळे पती घरी. छोट्या छोट्या कारणांवरून दोघांमध्ये धूसपूस, आणी रागाने पती बाहेर निघून जातो, संध्याकाळी तो घरी येतो आणी टीवी बघत बसतो. ती म्हणते, अहो चुकले माझे, बस झाला ना राग, चला जेवायला. "तूच जेव, खूप काम करतेना तूच एकटी ह्या घरात, मला नाही जेवायचे" (बाहेरून मस्त खाउन आलेलो आहे हे मात्र सांगण्यास विसरलेला). रात्रीचे ११.३०: पलंगाच्या एका कडावर नवर्याकडे पाठ करून झोपलेली ती, डोळे बंद असले तरी आसवं पीत विचार करीत पडलेली, माझे काय चुकले?. पहा ना, कशी मस्त झोपली ही, माझी काळजीच नाही, पलंगाच्या दुसऱ्या कडावर बायकोकडे पाठ करून झोपलेला तो .. उद्याचा दिवस कसा निघणार?

मध्यंतरी एक पुस्तक वाचले "Men are from Mars - Women are from Venus" पुरुष आणी स्त्री भिन्न ग्रहांवरील दोन व्यक्ती, एकंदरीतच दोघांचीही जडणघडण थोडी वेगळी, आणी विवाहानंतर ह्या दोन व्यक्ती एकत्र येणार. एकमेकांच्या समजुतीतील फरक, मतभिन्नता, समाजाकडे पाहण्याचा दृष्टीकोन, स्वतः चे अस्तित्व, स्वतः ची वयक्तिक ध्येय, ह्या सर्वांमुळे विवाहानंतर वाद विवाद, कुरबुर, भांडणे ही तर होणारच. मतभिन्नता, वाद विवाद हा विवाहित जीवनाचा एक अविभ्ज्ज्य घटक आहे. अगदी आदर्श विवाहित जोडप्यात देखील असले प्रसंग येणारच, त्यामुळे असले प्रसंग टाळण्यापेक्षा असले प्रसंग निर्माण झाल्यास त्यावर कशी तोड काढावी हे महत्वाचे ठरते.

एरीच फ्रोम म्हणतो: " मी तुझ्यावर प्रेम करतो कारण मला तुझी गरज आहे, ही अपरिपक्व प्रेमाची भाषा, तर मला तू हवी आहेस कारण माझे तुझ्यावर प्रेम आहे, ही परिपक्व प्रेमाची भाषा"
वादविवाद, भांडणावर कशी तोड काढावी ह्यावर अंकगणितासारखे २+२=४ असले उत्तर कुठेही मिळणार नाही. परंतू खालील बाबी लक्षात घेवून दोघांनीही सातत्याने जाणीवपूर्वक प्रयत्न केल्यास ही विषमता टाळणे शक्य होईल:
१. विषमता निर्माण होणारी चिन्हे आणी लक्षणे ओळखता येणे: काही तरी बिघडले आहे, मानसिक तणाव निर्माण होतो आहे. आणी हे कश्यामुळे असू शकेल ह्याचे निदान करण्याचे कौशल्य निर्माण करणे.
२. वादविवाद, विषमता अधिकच बळावू नये ह्या करिता पुढाकार घेऊन योग्य स्थळ आणी वेळ निश्चित करणे (दोघानाही सोयीची असणारी). पुढाकार कोणी घ्यावा ह्याचा नाहकच prestige issue करू नये.
३. दोघांपैकी कोणीतरी पुढाकार घेऊन ह्या वादग्रस्त विषयाची सुरवात करणे, त्याची पार्श्वभूमी जाणून घेणे, एकमेकांवर दोषारोपण न करता सकारात्मक वातावरणात चर्चा घडवून आणणे, फक्त माझेच नेहमी बरोबर असते हा अहंभाव बाजूला सारणे, शांतपणे ऐकून घेण्याची कला आत्मसात करणे. आणी सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या प्रसंगावर वादविवाद निर्माण झालेला असावा फक्त त्याच विषयावर चर्चा करणे. जुनी पुराणी जळमट, वादविवाद ह्या क्षणी पुन्हा पुन्हा उकरून न काढणे (ह्यामुळे निराशे शिवाय काहीही निष्पन्न होणार नाही)
४. विषमता निर्माण होण्यात आपण स्वतः बर्याच अंशी कारणीभूत होता असे आपल्या मनास वाटत असेल तर, ती जबाबदारी घेवून चुकलेच माझे, मी असे वागायला नको होते ह्या वाक्याने सुरवात करा. पुढील मळभ दूर होण्यास ह्यामुळे निश्चितच मदत होईल.
५. मागील असल्याच प्रसंगात दोघानीही चर्चा करून कशी तोड काढली आणी वाद कसा मिटविला, दोघे एकत्र कसे आलो होतो, ह्या सर्वांची आठवण करून, ह्या अनुभवाचा उपयोग करणे.
६. कदाचितच फक्त एकाच तोडगा दोघानाही मान्य असेल. एका पेक्षा जास्त पर्याय असतील तर दोघानाही कोणता पर्याय मान्य असू शकेल हे जाणून त्यावर सकारात्मक चर्चा करणे.
७. दोघानाही मान्य झालेला तोडगा म्हणजेच वादावर पडदा पडणे. परंतू पुन्हा पुन्हा ह्याच विषयावर विवाद निर्माण होणार नाहीत ह्या करिता जाणीवपूर्वक आपल्या स्वभावात, वर्तणुकीत बदल घडवून आणून ह्या वर्तणुकीत सातत्य राखण्याचा प्रयत्न करणे.
८. विवाद मिटल्याचा क्षण दोघांनीही आनंदाने साजरा करणे (हा कसा साजरा करायचा हे आपणासच शोधायचे आहे). एकमेकांनी केलेल्या प्रयासांची मुक्त कंठाने तारीफ करणे. त्या दिवसाचा वाद शक्यतोवर त्याच दिवशी सोडविण्याचा प्रयत्न करणे.
हे टाळा:
१. दोषारोपण
२. नावे ठेवणे (तू/तुम्ही अशीच आहे/असेच आहात, तू/तुम्ही नेहमीच)
३. आपलाच मुद्धा बरोबर आहे हेच ठासून सांगणे
४. त्याच त्याच जुन्या गोष्टी उकरून काढणे (तू/तुम्ही त्यावेळी अशी/असे वागली/वागले होती/होता)
५. विवाद निर्माण होण्या करिता आपल्या दोघांव्यतिरिक्त इतर व्यक्ती कारणीभूत असल्यास आणी त्या व्यक्ती उपस्थित नसल्यास, त्यांनी कसे वागावे ह्यावर जास्त चर्चा करणे टाळणे. कारण त्यांच्या वर्तणुकीवर आपले विशेष बंधन नसते.
६. विवादाचे स्वरूप गंभीर होण्यापर्यंत न थांबणे.
७. मीच का पुढाकार घ्यावा?
पहिला प्रसंग, छोटे छोटे विवाद, गैरसमजुती मिटविण्याकरिता, काय करता येईल, अगदी छोट्या छोट्या गोष्टी - बरेच काही आपणास शिकवून जातो. आपण प्रत्येकाने लक्षात घ्यावे, पती किंवा पत्नी हे काही दोघांचे शत्रू नाहीत. तुम्ही एकमेकांवर थोडेतरी निश्चितीच प्रेम करता, मग आपल्या प्रेमाच्या व्यक्तीसाठी कोणीतरी पुढाकार घेऊन हा विवाद मिटविण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास हे विवादाचे मळभ दूर जाऊन एक सुंदर ताराकांकित आकाश आपणास दिसावयास लागेल आणी उद्याच्या सुंदर ठरणाऱ्या दिवसाकरिता आपण अधिक उमेदीने सामोरे जाऊ.

Saturday, January 1, 2011

अकाली टक्कल - तरुणांसाठी आशेचा किरण


मध्यंतरी एक बातमी वाचली. केरळ येथील एका व्यक्तीने वनस्पतींचा अभ्यास करून एक तेल तयार केले आहे. १५ दिवसातून एकवेळा फक्त १० मिनिटे ह्या तेलाने टकलावर ६ महिने सतत मालिश केल्यास टक्कल नाहीसे होते, हा नवीन शोध. देशातील सर्वोच्य अश्या वैज्ञानिक संस्थेने ह्या तेलाचा शास्त्रीय अभ्यास करून हे तेल अतिशय परिणामकारक असल्याची आणी ह्या तेलाच्या मालिश चा आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम होत नसल्याची ग्वाही दिली. बातमी वाचून एक विचार आला? खरोखर तरुणांना पडणारे अकाली टक्कल, एक आरोग्यविषयक किंवा सामाजिक समस्या असेल काय? आणी असल्यास ह्यावर एखादा राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम राबविणे शक्य होईल काय? बराच अभ्यास केल्यानंतर ही समस्या किती गंभीर आहे ह्याची माहिती मिळाली, त्यातील काही निष्कर्ष:
१. अकाली टक्कल - तरुणांमध्ये निर्माण होणारया मानसिक विकृतीचे महत्वाचे कारण. टक्कल असणारे तरुण जेव्हा सुंदर केस असणारया आपल्या मित्रांसोबत तुलना करतात, त्यामुळे त्यांच्यात एक प्रकारचा मानसिक न्यूनगंड निर्माण होतो.
२. विवाहाकरिता मुलीने नकार दिलेल्या अनेक कारणांपैकी, तरुणाला असलेले टक्कल हे एक अतिशय महत्वाचे कारण.
३. केवळ टक्कल असल्यामुळे, शिक्षित असूनही तथा आवश्यक सर्व कौशल्य असूनही, नौकरी न मिळाल्याची अनेक उदाहरणे.
४. टक्कल असल्यामुळे त्यांना सतत हिणवत असल्यामुळे, समाजावरील त्यांचा राग आणी त्यातून असामाजिक आचरणाकडे वळण्याची त्यांची वृत्ती.
५. मुंबई येथील एका अभ्यासाचा निष्कर्ष: रस्त्यांवरील अपघातात मृत्त्यू पैकी ६५% टक्कल असणारे (केसांचे आच्छादन नसल्यामुळे हेड इंज्युरीचा जास्त धोका)
६. विवाहित टक्कल असणारया तरुणाला त्याची पत्नी सतत हिणवत असते, प्रणयाचे वेळी तिला त्याच्या केसातून हात फिरविण्याची संधी मिळत नाही .. ह्यातून निर्माण होणारा दुरावा.
७. अर्धवट टक्कल, डोक्यावर थोडेसे केस, आणी ह्या केसांनी सतत टक्कल झाकण्याचा प्रयत्न. त्यामुळे सतत कामाकडे होणारे दुर्लक्ष. किंवा, टक्कल झाकण्यासाठी विगचा वापर, त्याचे वेगळेच टेन्शन (माझ्या एका मित्राचा विग मोटारसायकल चालविताना उडून गेला आणी मागे उभ्या असलेल्या गाई ने खाल्ला)
८. एका अभ्यासाचा निष्कर्ष: ३२% युवकांना अकाली टक्कल
म्हणजे, ही एक निश्चितच आरोग्य विषयक समस्या ठरू शकते. शिवाय, ३२% युवकांना अकाली टक्कल, ह्याचा दुष्परिणाम कंगवे, शाम्पू , तेल ह्यांच्या विक्रीवर. देशाचे आर्थिक नुकसान. म्हाल्यांच्या धंद्यावरही विपरीत परिणाम. आणी, ह्या सर्व विचारातून, अभ्यासातून निर्माण झाला एक राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम " राष्ट्रीय अकाली टक्कल उपचार कार्यक्रम". ह्या कार्यक्रमाची अंमलबजावणीची थोडक्यात रूपरेषा:
१. राष्ट्रीय लसीकरण कार्याक्रसोबातच हा कार्यक्रम राबविला जाणार (कारण लसीकरणासाठी आरोग्य कर्मचारी १५ दिवसातून एक वेळा गावात जात असतात).
२. जनगणनेच्या वेळी टक्कल असणारया तरुणांची गणना (पूर्ण टक्कल, अधर्वट टक्कल ह्यांचे वर्गीकरण).
३. आरोग्य सेविकेला तेलाचा पुरवठा (वापरा आणी फेका ह्या तत्वावर असणारया १० ml च्या कुप्या).
४. लसीकरण सत्राचे वेळी टक्कल असणारया तरुणांनी येण्याकरिता मोठ्या प्रमाणात आरोग्य शिक्षण मोहीम ( ह्या करिता उत्कृष्ठ घोषवाक्क्ये तयार करणार्यांना विशेष बक्शिश - विचार करा आणी सुचवा चांगली घोषवाक्क्ये) .
५. लसीकरण सत्राचे वेळी १५ दिवसातून एकदा येणाऱ्या टक्कल असणारया तरुणांची आरोग्य सेविकेद्वारे तेलाने १० मिनिटे मालिश. मालिश करण्याकरिता आपल्या मैत्रिणीला आणण्याची तरुणांना मुभा. विवाहित टकले त्यांच्या पत्नी सोबत येतील, सोबत मुलानाही लसीकरणासाठी आणतील)
(थोडा वेळ डोळे बंद करून वरील चित्र आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न करा - आहा हा - काय सुंदर चित्र - स्त्रिया मुलांना पोलियो, ट्रिपल च्या लसीकरणासाठी घेवून आलेल्या आहेत, लसी करणानंतर मुले खेळत आहेत, टकल्या नवर्यांना बायका डोक्यावर तेल चोळत आहेत, आरोग्य सेविका काही टकल्या तरुणांचे मालिश करीत आहेत (ह्या प्रसंगातून ह्या टकल्यानंचे आणी आरोग्य सेविकेच्या विवाहाचे योग जुळून येण्याची शक्यता) , काही अविवाहित टकले आपल्या प्रेयसी सोबत आलेले आहेत, कोपर्यात जावून प्रेयसी त्यांना मालिश करीत आहे ...)

राष्ट्रीय अकाली टक्कल उपचार कार्यक्रम - फायदे:
१. लोकांच्या गरजांवर आधारित एकमेव उपचारात्मक कार्यक्रम (बरेच राष्ट्रीय कार्यक्रम प्रतिबंधात्मक आहेत)
२. मालिश चा फायदा दिसत असल्यामुळे, लोकांचा आरोग्य सेवेवरील विश्वास वाढेल, त्यामुळे, इतर आरोग्य कार्यक्रम देखील यशस्वीरीत्या राबविले जातील.
३. उपचार कार्यक्रमामुळे, तरुणांमधील नैराश्यतेचे तथा मानसिक आजारांचे प्रमाणात कमी, असामाजिक आचरणाकडे वळण्याच्या वृत्तीत बदल.
४. मालिश करण्यासाठी तरुण मुलीनी पुढाकार घेतल्यास, प्रेम विवाह आणी हुंड्याचे प्रमाण कमी होण्यास मदत.
५. कंगवे, शाम्पू, तेल ह्यांच्या विक्रीत वाढ होवून देशाची आर्थिक उन्नती.
६. टक्कल नाहीसे झाल्यामुळे अधिक उमेदीने कामावर लक्ष केंद्रित, राष्ट्राच्या विकासात हातभार.
७. तेलाच्या निर्मितीचे गृहउद्ध्योग कारखाने - त्यामुळे राष्ट्राच्या आर्थिक विकासाला हातभार.

टीप: हा लेख वाचून, राष्ट्रीय कार्यक्रमाच्या नियोजनात, अंमलबजावणीत अभिनव कल्पना सुचविणाऱ्या वाचकांना राष्ट्रपती तर्फे पारितोषक दिले जायील.

ताजा कलम: तेलाच्या खरेदीत प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा तथा ह्या तेलाच्या परिणामकारकतेबद्धल विरोधी पक्षांनी आरोप केल्यामुळे, सध्या भारत सरकारने हा कार्यक्रम सुरूच केलेला नाही. कृपया लेख वाचून नाहकच गंभीरपणे विचार करू नका, शिल्लक असलेले केस गळून पडतील.