Saturday, April 23, 2011

आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोहे


" आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोहे" मराठीतील एक अतिशय चाकोरीबाहेर विचार करणारे कवी, संगीतकार, गायक श्री. अवधूत गुप्ते ह्यांचे हे एक प्रसिद्ध गीत. ह्या गीताचे लेखक अवधूत नसून दुसरे कोणी असल्यास मी त्यांची माफी मागतो. कारण अवधूत गुप्तेचेच म्हणून हे गाणे प्रसिद्ध आहे. "सनई चौघडे " ह्या मराठी चित्रपटातील हे गीत. "आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोहे" ह्या संपूर्ण गीतातील ह्या चार शब्दांचा अर्थ काय असावा ह्याचा अनेक दिवसांपासून विचार करतोय. संपूर्ण गीत ऐकल्यानंतरही ह्या चार शब्दांचा काय अर्थ असेल, केवळ सुंदर चाल, सुंदर आवाजातील गीत आणी गायक अवधूत गुप्ते म्हणून तर हे गीत इतके लोकप्रिय झालेले नसेल ना? अर्थ मात्र मनाशी तदात्य्म होण्यासारखा सापडतच नव्हता. आणी, आज पुन्हा मनाशीच हे गीत गुणगुणताना ह्या चार शब्दांचा मला समजलेला अर्थ:

" आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोहे" , कांदेपोहे खाताना आणी ते आपणाला आवडणारे असे झाले असतील तर त्याची चव काही काळतरी आपल्या जिभेवर रेंगाळत असते आणी त्या कालवधीत त्या कान्देपोह्याची आपण पुन्हा पुन्हा आठवण काढून आनंदी, सुखी होतो, हा आनंद आणी हे सुख आपण इतरांशी देखील भरभरून share करतो. अश्याच प्रकारे आपणाला जाणवणारे सुखाचे क्षण आपल्या आयुष्यात येत राहतात, पुढील आयुष्य जगण्याची एक नवी उमेद आपणाला देत राहतात आणी एक सकारात्मक दृष्टीकोन ठेवून आपण आपले आयुष्य जगत असतो. किंबहुना असलेच क्षण/प्रसंग जीवन जगण्यासाठी संजीवनी ठरत असतात. कांदेपोहे आणी आयुष्य, म्हणजेच जीवनात येणारे छोटे छोटे सुखाचे क्षण आणी त्यात मिळणारा आनंद, हा कदाचित ह्या चार शब्दातून मिळणारा संदेश असावा.

परंतु, कांदेपोहे, त्याची चव, खाताना मिळणारा आनंद आणी नंतर काही कालावधीपर्यंत रेंगाळत राहणारी चव, चांगल्या आठवणी, ह्या फक्त सकृतदर्शनी नाहीत काय? ह्या उत्कृष्ठ कांदेपोह्यांची पार्श्वभूमी आपण कधी जाणून त्याचे विश्लेषण करण्याचा करण्याचा प्रयत्न करतो काय? कांदेपोहे म्हणजे आयुष्यातील एक अविस्मरणीय चांगला क्षण. पण, हा चांगला क्षण कश्यामुळे निर्माण होऊ शकला, त्यासाठी कोणी कोणी प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष प्रयास केलेत हे मात्र आपण सोयीस्करपणे विसरून जातो. " आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोहे" ह्या ओळीतील चूल आणी कढई, आयुष्यातील ह्या दोन शब्दांचा आपण कधी विचार केलाय काय? कांदेपोहे म्हणजे आयुष्यातील एक चांगला, आठवणीत राहणारा क्षण, पण, हा क्षण अविस्मरणीय होण्यासाठी चूल आणी कढई तेवढीच महत्वाची नाही काय? कदाचित कांदेपोहे करणारी व्यक्ती फार सुगरण असलेही, पण जेवढे कांदेपोहे करावयाचे आहे हे ध्यानात ठेवून त्यासाठी नेमकी आवश्यक आकाराची कढई नसल्यास,व्यवस्थित परतून हे कांदेपोहे चांगले झाले असते काय? आणी " चूल"?, कांदेपोहे करणारी व्यक्ती सुगरण, कढई देखील योग्य आकाराची, मग चुलीचे काय महत्व? कांदेपोहे स्वादिष्ठ होण्यासाठी, त्याला योग्य प्रमाणात आच उष्णता मिळण्यासाठी, ते योग्य प्रमाणात शिजण्यासाठी, " चूल" देखील तेवढीच महत्वाची नाही काय?, आणी ही उष्णता निर्माण करताना जाळून राख होणारी ती लाकड?

म्हणजेच काय तर कांदेपोहे हा जीवनातील एक अविस्मरणीय चांगला क्षण असेल तर, फक्त कान्देपोह्याची उत्कृष्ठ चव किंवा ते करणारी सुगरण व्यक्ती, फक्त ह्याचा विचार न करता, ह्या अविस्मरणीय चांगल्या क्षणासाठी कारणीभूत ठरणाऱ्या, परंतू सकृतदर्शनी न जाणवणाऱ्या बाबींचा देखील आपण विचार केल्यास आयुष्यातील हा एक अविस्मरणीय चांगला क्षण अधिक काळ पर्यंत आपणाला आठवत राहील आणी विचारांची, वर्तणुकीची एक वेगळीच दिशा आपणास देत राहील आणी खऱ्या अर्थाने आपणाला "चूल" आणी "कढई" ह्या दोन शब्दांचा अर्थ आणी त्याचे महत्व कळेल. आणी सर्वात महत्वाचे म्हणजे, ह्या सुंदर क्षणासाठी कोठेही उल्लेख न झालेली, राख झालेली ती लाकड?, स्वतः जाळून नाहीशी झालेली ती लाकड आणी त्यांचा त्याग, ह्याचाही विचार केल्यास " आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोहे" ह्या चार शब्दांचे, आयुष्याच्या आठवणीतील चांगल्या क्षणाचे महत्व बरेच काल पर्यंत आपल्या स्मरणात राहील.

Thursday, April 7, 2011

दमलेल्या बाबाची.......

३ मुले आणी आई वडील असे हे कुटूंब. परिस्थिती अतिशय मध्यमवर्गीय. वडील एका कंपनीत लेखापाल ह्या पदावर. कुटुंबाचा खर्च जेमतेम भागेल एव्हडेच मासिक उत्पन्न. आपले मासिक उत्पन्न वाढविण्याकरिता आणी पदोन्नतीसाठी किमान पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे ह्याची वडिलाना जाणीव. दिवसभर काम करून संध्याकाळच्या कॉलेज मध्ये जाऊन, घरी वापस आल्यानंतर पुन्हा अभ्यास. ध्येय एकाच,आपल्या मुलांना चांगल्यात चांगल्या परीस्तीतीत ठेवण्यासाठी कोणतीही मेहनत करण्याची तयारी. ह्या सर्व ओढाताणीत, मुलांशी खेळण्यासाठी, बोलण्यासाठी, एकत्रित जेवण्यासाठी, पत्नीशी देखील बोलण्यासाठी वेळच नाही. आपले उज्वल भविष्य आणी त्याकरिता करावी लागणारी मेहनत, एव्हडेच विचार सतत डोक्यात. मेहनत करून पदवी परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केल्यानंतर पदोन्नती आणी पगारवाढ. घरची आर्थिक परिस्थिती थोडी सुधारलेली. तरी देखील अधिक सुधारण्याकरिता पुन्हा पदव्युत्तर परीक्षेची तयारी आणी सतत काम. नंतर अधिकारी ह्या पदावर पदोन्नती, पुन्हा पगारवाढ. दोन खोल्यांच्या घरातून ३ खोल्यांच्या घरात स्थानांतर. मुलांचे उत्तम भावित्तव्य घडविण्यासाठी, घरातील सर्वाना उत्तमात उत्तम सुविधा प्राप्त होण्यासाठी पुन्हा उच्च शिक्षण, पुन्हा कंपनीत फार मोठ्या पदावर पदोन्नती. सतत मेहनत आणी कामात व्यग्र ह्यामुळे ८-८ दिवस मुलांशी, पत्नीशी बोलणे देखील होत नव्हते. मुलांची आणी पत्नीची, बाबाशी/पतीशी बोलणेच होत नाही ही सततची तक्रार आणी ठराविक उत्तर, "मी ही सर्व मेहनत कोणासाठी करीत आहो?". आर्थिक परिस्थितीत अधिक सुधारणा झाल्यानंतर, स्वतः चा ५ खोल्यांचा ब्लॉक, पत्नीला कामात त्रास होऊ नये म्हणून दोन घरगड्यांची नियुक्ती, मुलांना उत्तमात उत्तम कॉलेज मध्ये दाखला, त्यांना कॉलेज मध्ये जाण्यासाठी कार आणी वाहनचालक.

नंतर कंपनीच्या सर्वात जेष्ठ पदावर पदोन्नती. समुद्रकिनारी, मुलांसाठी, पत्नी साठी नवीन बंगल्याची खरेदी. जेवढे मोठे पद तेव्हडीच कामाची जास्त व्यग्रता, सततचे दौरे, प्रवास आणी आपण सुरवातीला जे काही ठरविले होते ते सर्व आपल्या मुलांना मिळत आहे हे बघून धन्न्यता. परंतु वडील मात्र आपल्या पासून फार दुरावलेले आहेत, त्यांना आपणासाठी काहीच वेळ नाही ही मुलांची सततची तक्रार, पत्नीचीही हीच तक्रार. परिवारात एकत्रित संवादाचा संपूर्ण अभाव.

वडील, वय वर्षे ५५, संध्याकाळी चुकून लवकर घरी आले. मुले बाहेर गेलेली, पत्नी देखील मैत्रिणीसोबत बाहेर गेलेली. बंगल्यातील बाल्कनीत बसून चहा पीत समुद्र किनार्याचे अवलोकन. निसर्ग इतका सुंदर आहे ह्याची प्रथमच जाणीव झालेली. मनात अनेक विचार आणी आयुष्याचा संपूर्ण चित्रपट डोळ्यापुढे. आयुष्याच्या ह्या कुतरओढीत सर्व ऐहिक सुख प्राप्त केले, पण खऱ्या अर्थाने जीवन मात्र जगावयाचे राहूनच गेले. मुले, पत्नी दुरावलेली, काय मिळविले आयुष्याच्या ह्या संध्याकाळी. डोळ्यात दोन अश्रू आलेत आणी निर्धार केला. बस झाली ही धावाधाव, उद्यापासून प्रत्येक क्षण मुलांसाठी, पत्नीसाठी जगायचा. रात्री मुले, पत्नी घरी आलीत. अनेक वर्षानंतर सर्वांनी एकत्र जेवण केले, खूप गप्पा मारल्यात आणी वडिलांनी आपली चूक काबुल केली. सर्वाना हा एक सुखद धक्काच होता. वडिलांनी जाहीर केले, उद्यापासून सकाळी आपण सर्व समुद्रकिनारी फिरायला जावू , रोज संध्याकाळी मी लवकर घरी येईन, एकत्रित सर्वांनी जेवण करायचे, खूप गप्पा मारायच्या, शनिवार, रविवार संपूर्ण कुटुंबासाठी, आता ह्यापुढील सर्व आयुष्य फक्त आणी फक्त कुटुंबासाठीच. घरात प्रथमच अतिशय आनंदी वातावरण, आणी ह्याच आनंदी वातावरणात सर्व झोपायला गेलेत.

सकाळी ५.३० वाजता फिरायला जाण्यासठी मुलाने वडिलांच्या खोलीचा दरवाजा ठोठावला, दरवाजा उघडाच होता, वडील पलंगावर झोपलेले होते, वडिलांना उठविण्याचा मुलाने प्रयत्न केला, पण रात्रीच वडिलांची प्राणज्योत मालविलेली होती. वडिलांसाठी, कुटुंबासाठी ही सुंदर सकाळ झालेलीच नव्हती.

बहुदा अनेकांनी वाचलेली किंवा ऐकलेली ही कथा, परंतू जीवनात कोणत्या वेळी कशाला प्राधान्य द्यावे, बरेच काही आपणाला अंतर्मुख होवून विचार करावयास लावणारी.