Tuesday, June 26, 2012

Witch Hunting





४० वर्ष वयाची रामकली मध्य प्रदेश राज्ज्यातील सिधी जिल्ह्यातील सेन्द्वा गावात राहणारी एक आदिवासी महिला. रामकलीच्या सासर्यांना दोन बायका, पहल्या बायकोची ३ मूले आणी दुसऱ्या बायकोची 5 मूले. पहिल्या बायकोचा मुलगा जगन्नाथ हा  रामकलीचा पती. रामकलीच्या सासर्यांनी त्यांच्या ८ मुलांमध्ये जमिनीची वाटणी केलेली. रामकली आणी तिचा नवरा बंसगोपाल त्यांना मिळालेल्या जमिनीवर शेती करून आपली उपजीविका भागवीत होते. परंतु भावाभावात जमिनीवरून वाद आणी भांडण ही नेहमीच व्हावयाचे. बंसगोपाल चा काका जयकरण  ह्याचाही  बंसगोपालच्या शेतीवर डोळा होताच. आणी ह्या सर्व वादावादी साठी रामकलीच जबाबदार ठरवून तिला नेहमीच मारहाण आणी शिवीगाळ व्हावयाची. 

२००५ मध्ये  जयकरण चा मुलगा बाबा आजारी झाला. आदिवासी समाज, अंधश्रद्धेचा जबरदस्त पगडा, डॉक्टर पेक्षा वैदूवरच  जास्त विश्वास, बाबाची प्रकृती जास्तच गंभीर झाली, आणी ह्यातूनच अफवा निर्माण व्हावयाला सुरवात झाली. रामकली ही जादू-टोना करणारी चेटकीण असून तिनेच बाबावर काळी जादू केल्यामुळे बाबा आजारी झालेला आहे. खरे तर बंसगोपालच्या भावांचा त्याच्या शेतीवर डोळा होता आणी रामकली ह्यात एक महत्वाचा अडसर आहे अशी त्यांची ठाम गैरसमजूत, त्यामुळे रामकलीला बदनाम करण्याची ही नामी संधी. गावात जात पंचायत बोलाविण्यात आली, रामकली आणी तिच्या पतीला पाचारण करण्यात आले. रामकली ही चेटकीण असून तिनेच बाबावर  काळी जादू केल्यामुळे बाबा आजारी झालेला आहे हा  आरोप तिच्यावर ठेवण्यात आला, आरोपाचा तिने इन्कार केल्यानंतर तिला मारहाण करण्यास सुरवात झाली, अंगावरील कपडे काढून तिला अमानुष पणे मारहाण करून, जबरदस्तीने मल-मुत्र पाजण्यात येवून तिला फासावर लटकविण्याचा प्रयत्न करण्यात आला. कशीबशी स्वतःची सुटका करून रामकली पळून गेली.

एका सेवाभावी संस्थेच्या मदतीने रामकलीने  पोलीस मध्ये तक्रार केली, पोलिसांनी बंसगोपालच्या  भावांना अटक करून दोन दिवसांनी सोडून दिले. २००५ ते २०१० ह्या कालावधीत कोर्टकेस सुरु आहे, निर्णय झालेला नाही, रामकली आणी तिचे कुटूंब गावाबाहेर राहून आतिशय दहशतीत आणी लाचारीने आपले जीवन जगत आहेत. 

२१ व्या शतकातील ही घटना अविश्वसनीय आणी अंगावर शाहरे आणणारी. आणी, दुर्दैवाने ही एकाच घटना नाही. स्त्रियांवरील अत्त्याचाराचे विरोधात आम्ही Action
Aid  ह्या संस्थे सोबत  मध्य प्रदेश राज्ज्यातील सिधी, सिंग्रोली आणी छतरपूर ह्या जिल्ह्यात काम करीत आहोत. Witch  Hunting  ह्या   विषयवारील अभ्यास करताना पोलीस रेकोर्ड नुसार मध्य प्रदेश मधील तीन जिल्ह्यात आणी छातीसगड राज्ज्यातील तीन जिल्ह्यात अश्या ६६ दुर्दैवी घटनांचा अभ्यास करून आम्ही एक पुस्तक देखील प्रकशित केलेले आहे. आणी हे एक हिमनागाचे  आपणाला दिसणारे एक टोक आहे. अश्या कितीतरी घटनांची नोंद देखील झालेली नसेल. चेटूक, अंधश्रद्धा, जादू टोना ह्यांचा आधार घेवून ह्यासाठी फक्त स्त्रियांनाच दोषी ठरवून त्यांचावर आत्त्याचार करणाऱ्या पुरुषप्रधान संस्कृतीला काय म्हणावे? रामकली सारख्या किती तरी स्त्रिया चेटूक करणाऱ्या आहेत ह्या अंध विश्वसापोटी मारल्या जात असतील किंवा एक उपेक्षित जीवन जगत असतील?