Friday, January 28, 2011

आत्महत्त्या



आत्महत्त्या


  • २२ वर्षीय विवाहित महिलेची अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेवून आत्महत्त्या - संभाव्य कारण "हुंडा"
  • विषप्राशन करून २ शेतकऱ्यांची आत्महत्त्या - ? कर्जबाजारी
  • दिराच्या लैंगिक छळवादाला कंटाळून फाशी लावून नवविवाहितेची आत्महत्त्या
  • २ कॉलेज विध्यार्थांची हाताची नस कापून आत्महत्त्या - प्रेमातील अपयश - संभाव्य कारण
  • ७ व्या माळ्यावरून उडी मारून एका तरुण म्यानेजर ची आत्महत्त्या - कामातील असःह्य झालेला ताणतणाव
  • एका हॉटेल मध्ये नवविवाहित जोडप्याची झोपेच्या गोळ्या खावून आत्महत्त्या - संभाव्य कारण "अंतरजातीय विवाह"
  • चालत्या गाडीतून उडी मारून एका तरुणाची आत्महत्त्या - संभाव्य कारण " लैंगिकदृष्ट्या असमर्थता"
  • समुद्रात बुडून एका व्यापाऱ्याची आत्महत्त्या - संभाव्य कारण " मित्राने केलेली फसवणूक आणी धंद्यात खोट"
  • वेल्लोर मेडिकल कॉलेज मधील एका कौनसिलर ची आत्महत्त्या - सतत परामर्श देताना झालेला असःह्य ताणतणाव

वर्तमानपत्र वाचताना किंवा टीवी बघताना सातत्याने दिसणाऱ्या ह्या बातम्या. २००९-२०१० चा गुन्हे विभागाचा अहवाल - गेल्या दशकात आत्महत्येचे प्रमाण १ लक्ष लोकसंखेमागे ८.४७ वरून ११.२७ इतके वाढलेले. अहवालानुसार एका वर्षात ११०५८७ आत्महत्यांची नोंद. दररोज ३१० आणी प्रत्येक ५ मिनिटाला एका आत्महत्येची नोंद. सर्वसाधारणपणे पुरुष आणी स्त्रया ह्यांचे आत्महत्येचे प्रमाण १.२ मागे १.००, परंतू १५ ते २९ वयोगटात हेच प्रमाण ०.८ मागे १.५. दूरदैवाची बाब म्हणजे केरळ सारख्या भारतातील सामाजिक - सांस्कृतिक पुढारलेल्या आणी १००% स्त्रियांची साक्षरता असणाऱ्या राज्यात हेच प्रमाण १ लक्ष लोकसंखेमागे ३१. आणी सर्वच क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या बंगलोर शहरात हेच प्रमाण १ लक्ष लोकसंखेमागे ३४. अंगावर शाहरे आणणाऱ्या ह्या बातम्या आणी ही आकडेवारी. खरोखरच आम्ही सुशिक्षित, सकारात्मक विचारसरनीचे झालेलो आहोत काय? आणि ही आकडेवारी फक्त नोंदी झालेल्या घटनांची, पोलिसांच्या आणी इतर अनेक दबावांमुळे कितीतरी घटनांची नोंदच होत नाही, ही वस्तुस्थिती. कदाचित एका मोठ्या हिमनगाचा हा एक वरवर दिसणारा भाग. आत्महत्येने नोंद झालेल्या मृत्यूंच्या १० ते २०% जास्त आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांचे प्रमाण, आणी ३०-४०% जास्त आत्महत्येचा विचार सतत मनात असणारयांचे प्रमाण (अश्या व्यक्ती त्यांच्या कामांवर संपूर्ण लक्ष केंद्रित करून, त्यांच्या कडून अपेक्षित असणारे कार्य करू शकतील काय? त्याचा विपरीत परिणाम देश्याच्या सर्वांगीण प्रगतीवर होईल काय?) . एक शास्त्रीय आकडेवारी. खरोखरच भयंकर आहे ही आकडेवारी. आणी, असं कां घडाव हा एक मोठा यक्षप्रश्न?

कौटुंबिक समस्या, लैंगिक समस्या, सामाजिक - सांस्कृतिक - आर्थिक समस्या, दीर्घ आजार, मानसिक आजार, बेरोजगार, कामाच्या ठिकाणी सतत असह्य होत असलेला ताणतणाव, खाजगी क्षेत्रात कार्य करताना अपेक्षित कामाची सततची मागणी आणी त्यातून निर्माण होणारी विफलता, विशेषतः खाजगी क्षेत्रात कार्य करताना नौकरिची सतत अशास्वती, प्रेमभंग, परीक्षेतील अपयश, लैंगिकतेवर आधारित स्त्रियांवर होणारे अत्त्याचार ... ही सर्व साधारणपणे नोंद झालेली आत्म्हत्त्येची कारणे. परंतु ह्या सर्वामागील पार्श्वभूमी, मुलभूत कारणे, आत्म्हत्त्येस प्रवृत्त करणारी परिस्थिती कदाचित वेगळीच असू शकेल, त्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे काय? कारण अनेक वेळा पोलीस नोंदीत असणारया कारणांवर आपलाच विश्वास बसत नाही.

आरोग्य हा जर प्रत्येकाचा मुलभूत अधिकार आहे, आणी, आरोग्याच्या व्याखेत जर मानसिक आरोग्याचा समावेश आहे, तर खऱ्या अर्थाने आपण स्वतः आरोग्य म्हणजे काय हे समजून घेतो काय आणी ते प्राप्त करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतो काय? आत्महत्येचे वाढते प्रमाण हे समाजाच्या खालावलेल्या प्रवृत्तीचे द्योतक आहे. एकीकडे सगळीकडे दिसणारी/ जाणवणारी सामाजिक - आर्थिक उन्नती तर दुसरीकडे आत्महत्येचे वाढते प्रमाण, हा एक मनाला न पटणारा विपर्यास.

जर आत्म्हत्त्येस जबाबदार असणारे सकृतदर्शनी कारण, त्या मागील पार्श्वभूमी, सामाजिक - सांस्कृतिक - आर्थिक समस्या, ह्या सर्वांचा विचार केल्यास, एका करणामागील अनेक उपकारणे, प्रत्येक उपकारणांची पुन्हा उपकारणे, ह्या सर्वांचा विचार करून, वर्तनुकिंची एक समजून उमजून दिशा निश्चित कारणे आणी त्या प्रमाणे सातत्याने वर्तणूक अंगीकार करणे आवश्यक ठरते. बरेच वेळा आत्महत्त्या करणाऱ्या व्यक्तीत त्याच्या वागण्यात काही बदल झालेले जाणवू शकतात. त्यावर वेळीच उपाय योजना केल्यास ही आत्महत्त्या टळू शकते. आपल्या कुटुंबात, मित्र मंडळीमध्ये , कार्याचे ठिकाणी, आपल्या आजूबाजूच्या व्यक्तीत जाणविणारे खालील बदल भविष्यातील धोक्याची घंटा ठरू शकतात:

  • नेहमीच्या वर्तणुकीत अचानक जाणवणारा बदल, झोप न लागणे किंवा खूप वेळ झोपतच राहणे
  • आपल्या कामावर लक्ष केंद्रित न करणे
  • विनाकारण चिडचिड, निराशा, वैफल्यता, इतरांपासून एकटे राहण्याची प्रवृत्ती, अचानकच जडणारी व्यसनाधीनता.
  • जीवनात काहीही ठेवले नाही, माझी कोणालाच गरज नाही, सर्व माझ्या विरोधातच आहेत, मी कोणाच्याच उपयोगाचा राहिलेलो नाही, मला आत्महत्त्या करावीशी वाटते, अश्या प्रकारची सतत भाषा वापरणे.

ह्या अश्या प्रकारच्या वर्तणुकीतील बदल जाणवल्यास, सर्व प्रथम अश्या व्यक्तींचे शांत पणे ऐकून घेणे, कारण शोधण्याचा प्रयत्न करून त्या करिता काही करता येईल काय हा विचार करणे, अश्या व्यक्तींना शक्क्यतोवर एकटे न सोडणे, योग्य परामर्शदात्याची भूमिका वठविणे, गरज भासल्यास मानसिकतज्ञ सल्ला, आणी सर्वात महत्वाचे, अश्या व्यक्तीची टिंगल टवाळी न करणे अतिशय महत्वाचे ठरते.

आत्महत्त्या टाळण्यासाठी समाजाने, इतरांनी, कार्यालयातील वरिष्ठ अधिकार्यांनी, घरातील वडील व्यक्तींनी, आरोग्य विभागाने काय करायला हवे, कसे वागायला हवे, ह्यावर न संपणारी चर्चा न करता, "मी एक व्यक्ती म्हणून काय करू शकतो, ते सर्वस्वी माझ्या हातात आहे असा विचार करून, मी प्रथम माझ्या वर्तणुकीत कसा बदल घडवून आणेल, ह्याचे आत्मपरीक्षण करण्याची जास्त गरज आहे. तसेच मी एक चांगला परामर्शदाता कसा ठरू शकेल, ह्याकरिता जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे. अशी दुर्दैवी घटना माझ्या कुटुंबात देखील घडू शकेल आणी हे टाळण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याची गरज

Monday, January 17, 2011

पती-पत्नी एकाच नाण्याच्या दोन बाजू


दोन प्रसंग/अनुभव:
प्रसंग १: उच्चमध्यमवर्गीय कुटूंब, लग्नाला १५-२० वर्षे झालेली. ऑफिस मध्ये रजा टाकल्यामुळे पती घरी. छोट्या छोट्या कारणांवरून दोघांमध्ये धूसपूस, आणी रागाने पती बाहेर निघून जातो. घरातील मुलांच्या, सासूसासर्यांच्या जबाबदारया, घरातील कामे, पती समजूनच घेत नाही म्हणून ती देखील रागावलेली. संध्याकाळी तो घरी आला. खोलीत तिला पाहून पलंगावरील नीट असलेली चादर त्याने उगाच पुन्हा नीट केली, मोगरयाची चार फुले तिच्या उशीजवळ ठेवून दिली, आणी म्हणला, चुकलेच माझे, असे वागायला नको होते. ह्या शब्दांनी ती देखील विरघळली आणी म्हणली "अहो कळतोना तुमचा राग आणी धूसपूस, पण दिवसभर सर्वांसाठी राबताना केवळ तुम्हीच एकटे माझे, मग माझाही वैताग मी कोणावर काढणार?" तो म्हणला, " आज रजा होती, वाटल मोकळेपणे जगावे, तुला नाही का वाटत कधी तरी अगदी मोकळ मोकळ व्हावस, झटकून सगळी ओझी एक दिवस तरी दुसऱ्याच जगात जगावस?' ती म्हणली " बघून मोगरयाची ही फुले आणी जाणवणारे तुमचे हे प्रेम मनोमनी, जगतेच तर आहे दुसऱ्या जगात ह्या क्षणी" स्वतःचाच मग त्याला राग आला आणी डोळ्यात अश्रू आले दोन, माझ्याशिवाय हिला समजणारे दुसरे आहे तरी कोण? वाटल होत फुकट गेली आज माझी रजा, पण राग येण आणी नंतर जवळ येण हीच तर जीवनाची खरी मजा"

प्रसंग २: उच्चमध्यमवर्गीय कुटूंब, लग्नाला १५-२० वर्षे झालेली. ऑफिस मध्ये रजा टाकल्यामुळे पती घरी. छोट्या छोट्या कारणांवरून दोघांमध्ये धूसपूस, आणी रागाने पती बाहेर निघून जातो, संध्याकाळी तो घरी येतो आणी टीवी बघत बसतो. ती म्हणते, अहो चुकले माझे, बस झाला ना राग, चला जेवायला. "तूच जेव, खूप काम करतेना तूच एकटी ह्या घरात, मला नाही जेवायचे" (बाहेरून मस्त खाउन आलेलो आहे हे मात्र सांगण्यास विसरलेला). रात्रीचे ११.३०: पलंगाच्या एका कडावर नवर्याकडे पाठ करून झोपलेली ती, डोळे बंद असले तरी आसवं पीत विचार करीत पडलेली, माझे काय चुकले?. पहा ना, कशी मस्त झोपली ही, माझी काळजीच नाही, पलंगाच्या दुसऱ्या कडावर बायकोकडे पाठ करून झोपलेला तो .. उद्याचा दिवस कसा निघणार?

मध्यंतरी एक पुस्तक वाचले "Men are from Mars - Women are from Venus" पुरुष आणी स्त्री भिन्न ग्रहांवरील दोन व्यक्ती, एकंदरीतच दोघांचीही जडणघडण थोडी वेगळी, आणी विवाहानंतर ह्या दोन व्यक्ती एकत्र येणार. एकमेकांच्या समजुतीतील फरक, मतभिन्नता, समाजाकडे पाहण्याचा दृष्टीकोन, स्वतः चे अस्तित्व, स्वतः ची वयक्तिक ध्येय, ह्या सर्वांमुळे विवाहानंतर वाद विवाद, कुरबुर, भांडणे ही तर होणारच. मतभिन्नता, वाद विवाद हा विवाहित जीवनाचा एक अविभ्ज्ज्य घटक आहे. अगदी आदर्श विवाहित जोडप्यात देखील असले प्रसंग येणारच, त्यामुळे असले प्रसंग टाळण्यापेक्षा असले प्रसंग निर्माण झाल्यास त्यावर कशी तोड काढावी हे महत्वाचे ठरते.

एरीच फ्रोम म्हणतो: " मी तुझ्यावर प्रेम करतो कारण मला तुझी गरज आहे, ही अपरिपक्व प्रेमाची भाषा, तर मला तू हवी आहेस कारण माझे तुझ्यावर प्रेम आहे, ही परिपक्व प्रेमाची भाषा"
वादविवाद, भांडणावर कशी तोड काढावी ह्यावर अंकगणितासारखे २+२=४ असले उत्तर कुठेही मिळणार नाही. परंतू खालील बाबी लक्षात घेवून दोघांनीही सातत्याने जाणीवपूर्वक प्रयत्न केल्यास ही विषमता टाळणे शक्य होईल:
१. विषमता निर्माण होणारी चिन्हे आणी लक्षणे ओळखता येणे: काही तरी बिघडले आहे, मानसिक तणाव निर्माण होतो आहे. आणी हे कश्यामुळे असू शकेल ह्याचे निदान करण्याचे कौशल्य निर्माण करणे.
२. वादविवाद, विषमता अधिकच बळावू नये ह्या करिता पुढाकार घेऊन योग्य स्थळ आणी वेळ निश्चित करणे (दोघानाही सोयीची असणारी). पुढाकार कोणी घ्यावा ह्याचा नाहकच prestige issue करू नये.
३. दोघांपैकी कोणीतरी पुढाकार घेऊन ह्या वादग्रस्त विषयाची सुरवात करणे, त्याची पार्श्वभूमी जाणून घेणे, एकमेकांवर दोषारोपण न करता सकारात्मक वातावरणात चर्चा घडवून आणणे, फक्त माझेच नेहमी बरोबर असते हा अहंभाव बाजूला सारणे, शांतपणे ऐकून घेण्याची कला आत्मसात करणे. आणी सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या प्रसंगावर वादविवाद निर्माण झालेला असावा फक्त त्याच विषयावर चर्चा करणे. जुनी पुराणी जळमट, वादविवाद ह्या क्षणी पुन्हा पुन्हा उकरून न काढणे (ह्यामुळे निराशे शिवाय काहीही निष्पन्न होणार नाही)
४. विषमता निर्माण होण्यात आपण स्वतः बर्याच अंशी कारणीभूत होता असे आपल्या मनास वाटत असेल तर, ती जबाबदारी घेवून चुकलेच माझे, मी असे वागायला नको होते ह्या वाक्याने सुरवात करा. पुढील मळभ दूर होण्यास ह्यामुळे निश्चितच मदत होईल.
५. मागील असल्याच प्रसंगात दोघानीही चर्चा करून कशी तोड काढली आणी वाद कसा मिटविला, दोघे एकत्र कसे आलो होतो, ह्या सर्वांची आठवण करून, ह्या अनुभवाचा उपयोग करणे.
६. कदाचितच फक्त एकाच तोडगा दोघानाही मान्य असेल. एका पेक्षा जास्त पर्याय असतील तर दोघानाही कोणता पर्याय मान्य असू शकेल हे जाणून त्यावर सकारात्मक चर्चा करणे.
७. दोघानाही मान्य झालेला तोडगा म्हणजेच वादावर पडदा पडणे. परंतू पुन्हा पुन्हा ह्याच विषयावर विवाद निर्माण होणार नाहीत ह्या करिता जाणीवपूर्वक आपल्या स्वभावात, वर्तणुकीत बदल घडवून आणून ह्या वर्तणुकीत सातत्य राखण्याचा प्रयत्न करणे.
८. विवाद मिटल्याचा क्षण दोघांनीही आनंदाने साजरा करणे (हा कसा साजरा करायचा हे आपणासच शोधायचे आहे). एकमेकांनी केलेल्या प्रयासांची मुक्त कंठाने तारीफ करणे. त्या दिवसाचा वाद शक्यतोवर त्याच दिवशी सोडविण्याचा प्रयत्न करणे.
हे टाळा:
१. दोषारोपण
२. नावे ठेवणे (तू/तुम्ही अशीच आहे/असेच आहात, तू/तुम्ही नेहमीच)
३. आपलाच मुद्धा बरोबर आहे हेच ठासून सांगणे
४. त्याच त्याच जुन्या गोष्टी उकरून काढणे (तू/तुम्ही त्यावेळी अशी/असे वागली/वागले होती/होता)
५. विवाद निर्माण होण्या करिता आपल्या दोघांव्यतिरिक्त इतर व्यक्ती कारणीभूत असल्यास आणी त्या व्यक्ती उपस्थित नसल्यास, त्यांनी कसे वागावे ह्यावर जास्त चर्चा करणे टाळणे. कारण त्यांच्या वर्तणुकीवर आपले विशेष बंधन नसते.
६. विवादाचे स्वरूप गंभीर होण्यापर्यंत न थांबणे.
७. मीच का पुढाकार घ्यावा?
पहिला प्रसंग, छोटे छोटे विवाद, गैरसमजुती मिटविण्याकरिता, काय करता येईल, अगदी छोट्या छोट्या गोष्टी - बरेच काही आपणास शिकवून जातो. आपण प्रत्येकाने लक्षात घ्यावे, पती किंवा पत्नी हे काही दोघांचे शत्रू नाहीत. तुम्ही एकमेकांवर थोडेतरी निश्चितीच प्रेम करता, मग आपल्या प्रेमाच्या व्यक्तीसाठी कोणीतरी पुढाकार घेऊन हा विवाद मिटविण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास हे विवादाचे मळभ दूर जाऊन एक सुंदर ताराकांकित आकाश आपणास दिसावयास लागेल आणी उद्याच्या सुंदर ठरणाऱ्या दिवसाकरिता आपण अधिक उमेदीने सामोरे जाऊ.

Saturday, January 1, 2011

अकाली टक्कल - तरुणांसाठी आशेचा किरण


मध्यंतरी एक बातमी वाचली. केरळ येथील एका व्यक्तीने वनस्पतींचा अभ्यास करून एक तेल तयार केले आहे. १५ दिवसातून एकवेळा फक्त १० मिनिटे ह्या तेलाने टकलावर ६ महिने सतत मालिश केल्यास टक्कल नाहीसे होते, हा नवीन शोध. देशातील सर्वोच्य अश्या वैज्ञानिक संस्थेने ह्या तेलाचा शास्त्रीय अभ्यास करून हे तेल अतिशय परिणामकारक असल्याची आणी ह्या तेलाच्या मालिश चा आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम होत नसल्याची ग्वाही दिली. बातमी वाचून एक विचार आला? खरोखर तरुणांना पडणारे अकाली टक्कल, एक आरोग्यविषयक किंवा सामाजिक समस्या असेल काय? आणी असल्यास ह्यावर एखादा राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम राबविणे शक्य होईल काय? बराच अभ्यास केल्यानंतर ही समस्या किती गंभीर आहे ह्याची माहिती मिळाली, त्यातील काही निष्कर्ष:
१. अकाली टक्कल - तरुणांमध्ये निर्माण होणारया मानसिक विकृतीचे महत्वाचे कारण. टक्कल असणारे तरुण जेव्हा सुंदर केस असणारया आपल्या मित्रांसोबत तुलना करतात, त्यामुळे त्यांच्यात एक प्रकारचा मानसिक न्यूनगंड निर्माण होतो.
२. विवाहाकरिता मुलीने नकार दिलेल्या अनेक कारणांपैकी, तरुणाला असलेले टक्कल हे एक अतिशय महत्वाचे कारण.
३. केवळ टक्कल असल्यामुळे, शिक्षित असूनही तथा आवश्यक सर्व कौशल्य असूनही, नौकरी न मिळाल्याची अनेक उदाहरणे.
४. टक्कल असल्यामुळे त्यांना सतत हिणवत असल्यामुळे, समाजावरील त्यांचा राग आणी त्यातून असामाजिक आचरणाकडे वळण्याची त्यांची वृत्ती.
५. मुंबई येथील एका अभ्यासाचा निष्कर्ष: रस्त्यांवरील अपघातात मृत्त्यू पैकी ६५% टक्कल असणारे (केसांचे आच्छादन नसल्यामुळे हेड इंज्युरीचा जास्त धोका)
६. विवाहित टक्कल असणारया तरुणाला त्याची पत्नी सतत हिणवत असते, प्रणयाचे वेळी तिला त्याच्या केसातून हात फिरविण्याची संधी मिळत नाही .. ह्यातून निर्माण होणारा दुरावा.
७. अर्धवट टक्कल, डोक्यावर थोडेसे केस, आणी ह्या केसांनी सतत टक्कल झाकण्याचा प्रयत्न. त्यामुळे सतत कामाकडे होणारे दुर्लक्ष. किंवा, टक्कल झाकण्यासाठी विगचा वापर, त्याचे वेगळेच टेन्शन (माझ्या एका मित्राचा विग मोटारसायकल चालविताना उडून गेला आणी मागे उभ्या असलेल्या गाई ने खाल्ला)
८. एका अभ्यासाचा निष्कर्ष: ३२% युवकांना अकाली टक्कल
म्हणजे, ही एक निश्चितच आरोग्य विषयक समस्या ठरू शकते. शिवाय, ३२% युवकांना अकाली टक्कल, ह्याचा दुष्परिणाम कंगवे, शाम्पू , तेल ह्यांच्या विक्रीवर. देशाचे आर्थिक नुकसान. म्हाल्यांच्या धंद्यावरही विपरीत परिणाम. आणी, ह्या सर्व विचारातून, अभ्यासातून निर्माण झाला एक राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम " राष्ट्रीय अकाली टक्कल उपचार कार्यक्रम". ह्या कार्यक्रमाची अंमलबजावणीची थोडक्यात रूपरेषा:
१. राष्ट्रीय लसीकरण कार्याक्रसोबातच हा कार्यक्रम राबविला जाणार (कारण लसीकरणासाठी आरोग्य कर्मचारी १५ दिवसातून एक वेळा गावात जात असतात).
२. जनगणनेच्या वेळी टक्कल असणारया तरुणांची गणना (पूर्ण टक्कल, अधर्वट टक्कल ह्यांचे वर्गीकरण).
३. आरोग्य सेविकेला तेलाचा पुरवठा (वापरा आणी फेका ह्या तत्वावर असणारया १० ml च्या कुप्या).
४. लसीकरण सत्राचे वेळी टक्कल असणारया तरुणांनी येण्याकरिता मोठ्या प्रमाणात आरोग्य शिक्षण मोहीम ( ह्या करिता उत्कृष्ठ घोषवाक्क्ये तयार करणार्यांना विशेष बक्शिश - विचार करा आणी सुचवा चांगली घोषवाक्क्ये) .
५. लसीकरण सत्राचे वेळी १५ दिवसातून एकदा येणाऱ्या टक्कल असणारया तरुणांची आरोग्य सेविकेद्वारे तेलाने १० मिनिटे मालिश. मालिश करण्याकरिता आपल्या मैत्रिणीला आणण्याची तरुणांना मुभा. विवाहित टकले त्यांच्या पत्नी सोबत येतील, सोबत मुलानाही लसीकरणासाठी आणतील)
(थोडा वेळ डोळे बंद करून वरील चित्र आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न करा - आहा हा - काय सुंदर चित्र - स्त्रिया मुलांना पोलियो, ट्रिपल च्या लसीकरणासाठी घेवून आलेल्या आहेत, लसी करणानंतर मुले खेळत आहेत, टकल्या नवर्यांना बायका डोक्यावर तेल चोळत आहेत, आरोग्य सेविका काही टकल्या तरुणांचे मालिश करीत आहेत (ह्या प्रसंगातून ह्या टकल्यानंचे आणी आरोग्य सेविकेच्या विवाहाचे योग जुळून येण्याची शक्यता) , काही अविवाहित टकले आपल्या प्रेयसी सोबत आलेले आहेत, कोपर्यात जावून प्रेयसी त्यांना मालिश करीत आहे ...)

राष्ट्रीय अकाली टक्कल उपचार कार्यक्रम - फायदे:
१. लोकांच्या गरजांवर आधारित एकमेव उपचारात्मक कार्यक्रम (बरेच राष्ट्रीय कार्यक्रम प्रतिबंधात्मक आहेत)
२. मालिश चा फायदा दिसत असल्यामुळे, लोकांचा आरोग्य सेवेवरील विश्वास वाढेल, त्यामुळे, इतर आरोग्य कार्यक्रम देखील यशस्वीरीत्या राबविले जातील.
३. उपचार कार्यक्रमामुळे, तरुणांमधील नैराश्यतेचे तथा मानसिक आजारांचे प्रमाणात कमी, असामाजिक आचरणाकडे वळण्याच्या वृत्तीत बदल.
४. मालिश करण्यासाठी तरुण मुलीनी पुढाकार घेतल्यास, प्रेम विवाह आणी हुंड्याचे प्रमाण कमी होण्यास मदत.
५. कंगवे, शाम्पू, तेल ह्यांच्या विक्रीत वाढ होवून देशाची आर्थिक उन्नती.
६. टक्कल नाहीसे झाल्यामुळे अधिक उमेदीने कामावर लक्ष केंद्रित, राष्ट्राच्या विकासात हातभार.
७. तेलाच्या निर्मितीचे गृहउद्ध्योग कारखाने - त्यामुळे राष्ट्राच्या आर्थिक विकासाला हातभार.

टीप: हा लेख वाचून, राष्ट्रीय कार्यक्रमाच्या नियोजनात, अंमलबजावणीत अभिनव कल्पना सुचविणाऱ्या वाचकांना राष्ट्रपती तर्फे पारितोषक दिले जायील.

ताजा कलम: तेलाच्या खरेदीत प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा तथा ह्या तेलाच्या परिणामकारकतेबद्धल विरोधी पक्षांनी आरोप केल्यामुळे, सध्या भारत सरकारने हा कार्यक्रम सुरूच केलेला नाही. कृपया लेख वाचून नाहकच गंभीरपणे विचार करू नका, शिल्लक असलेले केस गळून पडतील.