Sunday, September 26, 2010

का रे दुरावा ?


" पन्नाशी हे तारुण्यातील म्हातारपण तर साठी ही म्हातारपणातील तारुण्य"

कोणत्याही वाहनास त्याला लागणारे आवश्यक इंधन आणी तेल मिळाले नाही तर वाहन बंद पडते. मानवी जीवनही वाहनाच्या पेट्रोल च्या टाकी सारखे आहे. तारुण्य टिकविण्यासाठी भूतकाळातील प्रेमाची टाकी भरलेली असणे आवश्यक आहे. मानवी जीवनातील "साठी" हा एक महत्वाचा कार्यकाल आहे. माझे आयुष्य आताही निरर्थक नाही, आपली कोणाला तरी गरज आहे, ती पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे आणी माझ्यात ही क्षमता आहे, ही मानसिकता ह्या कालावधीत पुरुषात निर्माण झाल्यास, जीवन जगण्यात त्याला अधिक आनंद, उत्साह वाटायला लागतो. आनंदाने, उत्साहाने जीवन जगण्यासाठी, मी काही एकटी नाही, मला माझ्या जोडीदाराची योग्य सोबत, साथ आहे, ही भावना स्त्रीमध्ये ह्या वयात जोपासणे आवश्यक आहे. २५-३० वर्षे एकत्रित सोबत राहिल्यानंतरही, भूतकाळातील आनंदी क्षणांच्या आठवणी जोपासून, सुखी, समाधानी जीवन जगण्याऐवजी, ह्या वयात आगदी लहानसहान कारणांसाठी पतीपत्नीत वाद निर्माण होवून त्यांच्यात गैरसमजुतींची एक न भरून निघणारी दरी का निर्माण होते, समजण्यापलीकडले आहे. पुरुषांचा अहंकारी स्वभाव तर ह्याला कारणीभूत नसावा? असं का घडव? गैरसमजुतींच्या मुळाशी कोणती कारण असावीत? एकमेकांना समजून घेवून पुढील आयुष्य अधिक अर्थपूर्ण, आनंदी कसे जगता येईल?

आर्थिकदृष्ट्या मध्यवर्गीय तथा उच्चवर्गीय कुटुंबात ह्या वयोगटात सर्वसाधारणपणे आर्थिकस्थैर्य प्राप्त झालेले असते, मुलांची शिक्षण पूर्ण झालेली असतात, बहुतेक सर्व भौतिक सुखसाधने उपलब्ध असतात. मुले, शिक्षणात किंवा त्यांच्या नौकरी/पेशात मग्न झालेली असतात. पालकांना वाटत, मुलांनी त्यांच्याशी सुसंवाद साधावा, आपल्याकडे लक्ष ध्यावे, परंतू ह्या वयात मुले त्यांचाच विश्वात गुंग असतात, पालकांशी जास्त संवाद साधत नाहीत, ही त्यांची ह्या वयाला अनुरूप सहज वर्तणूक. मुले आपणाकडे दुर्लक्ष करतात ही उगाचच वाढणारी गैरसमजूत, त्यातून नाहक निर्माण होणारे वादविवाद , आणी नंतर निर्माण होणारा नाहकच मानसिक तानतणाव. २५-३० वर्षांपूर्वी आपले आपल्या पालकांशी कसे सौहार्दपूर्ण संबंध होते, आम्ही आमच्या पालकांशी किती चांगले वागत होतो, आणी आता आमच्या मुलांची मात्र आमच्याशी असणारी वर्तणूक, उगाच एक तुलना सुरु होते आणी निर्माण होणारया तानतणावात अधिकच भर घालत असते. आम्ही आमच्या मुलांसाठी, त्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता, शिक्षणाकरिता, आमचे स्वतःचे जीवन आम्हाला जसे जगावयाचे होते तसे न जगता, आमचा वेळ, श्रम, पैसा सर्व मुलांसाठीच खर्च केला, पण मुले मात्र आता ह्या सर्वांचा साधा उल्लेखही करीत नाहीत, आम्हाला समजूनच घेत नाहीत ही अधिकाधिक drudh होणारी भावना आणी त्यातून निर्माण होणारे नैराष्य. आणी अश्याप्रकारच्या भावना असणारया पालकांना टाळणे ही मुलांची अगदी सहज प्रवृत्ती. ह्या सर्व मानसिकतेतून पुढे वाढत जाणारी दरी, आणी त्यतून निर्माण होणारे पेचप्रसंग. दुर्दैवाने बरेचदा ह्या सर्वांचा परिपाक म्हणजे विशेषतः पुरुषांची नाहकच आपल्या पत्नीवर होणारी चीडचीड.

मुलांसोबत योग्य सुसंवाद कसा साधावा ह्या करिता कोणताही रामबाण उपाय नाही किंवा अंकगणितासारखे २ + २ = ४ असे कोणतेही निश्चित उत्तर नाही. पालकांनीच सर्व परिस्थितीचे आकलन करण्याची गरज आहे. मुलांची सतत बदलत जाणारी वर्तणूक त्यांच्यासाठी कदाचित साहजिक वर्तणूक असेल, त्यांच्या बदलत्या वर्तणुकीवर पालकांचे फार नियंत्रण राहू शकत नाही, पालक मात्र नाहकच ह्या वर्तणुकीचा स्वतः त्रागा करून घेतात. गरज आहे, बदलत्या परिस्थितीनुसार पालकांना स्वतः चे आत्मपरीक्षण करण्याची, आणी स्वतःमध्ये आमुलाग्र बदल घडवून आणून मुलांशी सुसंवाद साधण्याची. कदाचित ह्या बदलामुळे मुलेही आपल्या वर्तणुकीत आपेक्षित बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करतील. वर्तनुकीद्वारे, बोलण्यातून, देहबोलीतून मुलांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केल्यास सुसंवादाचा मार्ग मोकळा होऊ शकेल.

विशेषतः पुरुषांमध्ये सेवा निवृत्तीनंतर एक पोकळी निर्माण होते. काल पर्यंत कामात मग्न होते, आतामात्र विशिष्ठ काहीच काम नाही, घरात भरपूर रिकामा वेळ, उगाचच पुरुषांना आपण घरातील एक महत्वाची व्यक्ती नाहीत असे वाटायला लागते. आणि मग स्वतःचे महत्व वाढविण्यासाठी उगाचच घरातील दैनंदिन कामात लुडबुड, अगदी छोट्या छोट्या कारणांसाठी पत्नीवर चिडचिड. कारणांशिवाय पत्नीचे, मुलांचे दोष काढून उगाच आगपाखड करणे, उद्धेश एकच, घरातील आपले महत्व तसेच टिकून राहावे. पतीमध्ये जाणवणारा हा आमुलाग्र बदल पत्नीच्या समजण्या पलीकडील असतो. आणि ह्याच कालावधीत बरेचवेळा पत्नी मध्ये ही मासिक पाळी बंद होते वेळी काही शारीरिक, मानसिक बदल होत असतात, पती ते कधीच समजावून घेण्याचा प्रयत्नं करीत नाही. ह्या सर्व परिस्थितीत पत्नी हळू हळू पतीला दुर्लक्षित करायला लागते, घरातील पतीचे सततचे वास्तव्य आणी चीडचीड, छोट्या छोट्या गोष्टींवरून उगाच दोष काढण्याची पतीची प्रवृत्ती, त्यातच मुलांची बदलणारी वर्तणूक, ह्या सर्वांचा विपरीत परिणाम शेवटी तिच्या शारीरिक आणी मानसिक आरोग्यावर होतो.

घरातील आपले वास्तव्य सर्वांसाठी आनंददायक कसे ठरू शकेल, त्या साठी आपल्या वर्तणुकीत जाणीवपूर्वक काय काय बदल घडवून आणणे गरजेचे आहे, हे समजून पुरुषांनीच पुढाकार घेणे आवश्यक ठरते. पत्नी करीत असलेल्या छोट्या छोट्या कामात तिला मदत करणे, ती करीत असलेल्या कामांची प्रशंसा करणे, स्वतःही घरातील छोटी छोटी कामे करणे, दोघानाही ज्या गोष्टींची आवड असेल ती आवड अधिक वृद्धिंगत करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करणे, चर्चा घडवून आणणे, स्वतः ला शारीरिक, अध्यात्मिक आणी मानसिक रित्या निरोगी राखण्यासाठी सतत प्रयत्न करणे, ह्या आणी अश्या अनेक छोट्या छोट्या बाबी, आपले घरातील वास्तव्य सर्वांसाठी आनंद दायक ठरण्यासाठी आणी महत्वाचे पती आणी पत्नी ला मानाने अधिक जवळ आणण्या करिता कारणीभूत ठरू शकतील.
वेळ भरपूर असल्यामुळे, विचार ही भरपूर, भूतकाळातील नकोश्या , क्लेशदायक, दुखावह घटनांची अश्यावेळी प्रकर्षाने आठवण आणी त्यांची नाहकच कारण मीमांसा करण्याचा प्रयत्न, ही सहज आढळणारी वृत्ती. नकारात्मक विचार, पुन्हा पुन्हा त्या आठवणी, चर्चा, दोषारोपण, ह्या सर्वांचा परीपाक म्हणजे पुन्हा एकमेकांमध्ये गैरसमजुतींची दरी निर्माण करणे. भूतकाळातील नकोश्या, क्लेशदायक, एकमेकांवरील घडलेल्या अविश्वासाच्या घटना, ह्या जाणीवपूर्वक विसरण्याचा प्रयत्न करणे, आनंदी घटनांवर चर्चा करणे, त्या पुन्हा पुन्हा आठवाने, ह्या सर्व वर्तणुकीतून अविश्वासाचे, गैरसमजुतींचे मळभ दूर होवून जीवनाचे आकाश स्वच्छ दिसायला लागेल आणी ह्यातून आनंददायी जीवनाचा मार्ग जगण्याची योग्य दिशा मिळेल.
ह्या वयोगटात तुम्ही कसे वागवेत ह्याचे परामर्शदाता तुम्ही स्वतःच आहात. प्रथम स्वतःला बदलण्याचा जाणीवपूर्वक विचार करून तो सातत्याने अमलात आणण्याचा प्रयास करा, बघा, घरातील वातावरण निश्चितपणे बदलेल, आणी साठी नंतरच्या आनंददायी जीवनाची सुरवात होईल. " In the end it is not the years in your life that counts , it is the life in your years "

2 comments:

  1. RD said: I am retired just before two months and I agree with many points you have written.

    ReplyDelete
  2. Ka Re Durawa is really an eye opener for changing behavior of males in this age group - Jaya

    ReplyDelete