Wednesday, July 18, 2012

महाभारत



देवांची आपसात होणारी बौद्धिक चर्चा आणी त्या चर्चेतून प्राप्त होणारे, जीवनाचा अर्थ समजावून सागणारे संदेश, ह्या  सर्वांचे संकलन म्हणजेच "वेद". ह्या वेदांच्या माध्यमातून आणी ह्या वेदांचे मानवानी आकलन करून, त्यांचा अर्थ समजून एक चांगले अर्थपूर्ण जीवन जीवन जगण्यासाठी, मानवी समाजाची निर्मिती करण्याकरिता देवानी सात ऋषींना पृथ्वीवर पाठविले. ह्या ऋषींनी वेदांच्या तत्वांवर आधारित समाजाची निर्मिती केली. "ब्राम्हण" , "क्षत्रिय", " वैश्य", "शूद्र", हे समाजाचे चार "वर्ण" देखील ह्या  ऋषींनी निर्माण केलेत.  अनेक वर्षे अश्या प्रकारची समाजरचना सुरु होती. त्यानंतर सतत १४ वर्षे फार मोठा दुष्काळ पडला. समाजरचना संपूर्ण कोलमडून पडली. "वेद" आणी त्यांचा अर्थ लोक विसरून गेलेत. १४ वर्षानंतर शेवटी पाउस पडला. 

एका कोळीणीचा (सत्यवती)  मुलगा म्हणजे "कृष्ण द्वैपायन" जे नंतर "व्यास ऋषीं" म्हणून ओळखले गेलेत, त्यांनी पुन्हा सर्व वेदांच्या श्लोकांचे संकलन करण्यास सुरवात केली. सात ऋषींपैकी वशिष्ठ ऋषींचा नातू पराशर ऋषींचा मुलगा हे "व्यास ऋषीं". व्यास ऋषींच्या  जन्माची कथाही फार मजेदार आहे. शंतनू  राजाला गंगेपासून झालेला मुलगा हा गंगापुत्र देवव्रत  (भीष्म). शंतनू  नंतर सत्यवती ह्या  कोळीणीच्या प्रेमात पडला. उपरीचार राजाची सत्यवती ही कन्या. उपरीचार राजा एकदा जंगलात शिकारीला गेला. जंगलात त्याला आपल्या पत्नीची एवढी आठवण आली कि excite होवून त्याचा वीर्यपात झाला. वीर्य वाया जावू नये म्हणून त्याने ते एका पानात जमा केले, पान व्यवस्थित बांधून आपल्या पाळीव पोपटाला ते नेण्यास, आणी, आपल्या पत्नीला देण्याची सूचना केली. पोपट ते वीर्य घेवून उडाला, आकाशात एका ससाण्याने पोपटावर हल्ला केला. पोपटाच्या चोचीतील पानात ठेवलेले वीर्य एका नदीत पडले, नदीतील एका मासोळीने ते सेवन केले (ही मासोळी एक शापित अप्सरा होती).  त्या मासोळीला एक  मुलगा आणी एक मुलगी झाली. मुलाला नंतर  उपरीचार राजाने स्वतः चा मुलगा म्हणून स्वीकार केला, परंतू मुलीचा स्वीकार करण्यास नकार दिला. हि मत्स्यकन्या म्हणजेच सत्यवती. नदीतून  ती एका नावेतून लोकांना एका तीरावरून दुसऱ्या तीरावर नेण्याचे काम करायची. एकदा तिच्या बोटीतून पराशर ऋषीं प्रवास करीत होते. पराशर ऋषींनी सत्यवतीच्या सौंदर्यावर  लुब्ध होवून तिच्यासोबत समागम करण्याची इच्छा प्रकट केली. समागम केल्यानंतर त्यांच्या  सामर्थ्याने क्षणातच सत्यवतीला पराशर  ऋषींपासून पुत्र झाला, हा पुत्र म्हणजेच "व्यास ऋषीं".  नंतर पराशर ऋषींनी सत्यवतीला वर दिला कि तिच्या शरीराचा माश्याचा वास न येता मोहित करणारा सुगंध येईल आणी मुलगा जरी झाला तरी ती तिचे लग्न होईपर्यंत तिचे कौमार्य अबाधित राहील. ह्याच मत्स्यगंधा सत्यवतीचे पुढे राजाशी लग्न होवून ह्या दोघांपासून त्यांना झालेला पुत्र हा राजा "विचित्रवीर्य" आणी  विचित्रवीर्याचे पुत्र हे पांडू आणी धृतराष्ट्र (ह्यांच्या जन्माची देखील एक वेगळीच मजेदार कथा आहे). शंतनुला गंगेपासून झालेला पुत्र देवव्रत हा जेष्ठ पुत्र असल्यामुळे तोच भविष्यात राजा होईल म्हणून लग्न करण्यापूर्वी सत्यवतीने शंतनुला अट घातली कि जर तिचा पुत्र हा राजा होणार असेल तरच ती शंतनूशी विवाह करेल. जेष्ठ पुत्र देवव्रत ला जेव्हा हे कळले तेव्हा त्याने प्रतिज्ञा केली कि सत्यावातीचा पुत्रच राजा होईल तसेच तो आजन्म ब्रह्मचारी राहील जेणेकरून सत्यवतीच्या पुत्राचे पुत्र भविष्यात राजसिंहासन चालवतील. हीच ती भीष्मप्रतिज्ञा. त्यामुळेच देवव्रत पुढे   भीष्म ह्या नावाने परिचित झालेत.  

"व्यास ऋषीं" नंतर "वेदव्यास" ह्या नावाने ओळखू जावू लागले. व्यासांनी सर्व वेदांच्या श्लोकांचे संकलन करण्यास सुरवात केली. देवांची स्तुती करणाऱ्या ह्या श्लोकांचे चार विभाग केलेत, हे चार विभाग म्हणजेच -- "ऋग्वेद", "यजुर्वेद", "सामवेद" आणी "अथर्ववेद". ह्या वेदांतील श्लोकाचा अर्थ अगदी सरळ सोप्या भाषेत, काव्य/कथा स्वरुपात सर्वसामान्य लोकांना समजावा, ही इच्छा त्यांनी देवांपुढे प्रकट केली. व्यासांची संकल्पना मूर्त स्वरुपात साकार व्हावी म्हणून, व्यासांनी कथन केलेले लिहिण्यासाठी गणेशाची नियुक्ती करण्यात आली. व्यासांनी काव्य/कथा स्वरुपात कथन केलेले आणी गणेशाने लिहिलेले काव्य म्हणजे "जय", विजयाचे आख्यान. मुळात  ह्याचे ६ आध्याय  होते, परंतू त्यातील एकाच आध्याय कालांतराने मानावांपर्यंत, व्यासांच्या वैशंपायन ह्या शिष्यामार्फात पोहचला. 

व्यासांनी सांगितलेले आणी गणेशानी लिहिलेले काव्य,  नंतर एका पासून दुसऱ्या पर्यंत पोहचताना त्यात नवीन नवीन गोष्टींचा समावेश करण्यात आला. कालांतराने "जय" ह्या मुळ काव्याला "विजय" ह्या नावाने ओळखले जावू लागले. भारत राजाने त्यात १००००० श्लोकांचा समावेश करून हेच काव्य नंतर "भरत" नावाने ओळखले जावू लागले. कालांतराने कृष्णजन्माची आणी नंतर कृष्णाच्या अनेक कथांचा ह्यात समावेश करून हे काव्य "महाभारत" म्हणून लोकांपर्यंत पोहचले. 

देवदत्त पटनायक ह्या वैध्यकीय चिकित्सकाने लिहिलेल्या "जय -- महाभारत कथा" ह्या पुस्तकातील महाभारताच्या ग्रंथाच्या निर्मितीची ही कथा. एका वैध्यकीय चिकित्सकाने महाभारतावरील लिहिलेले हे पुस्तक अतिशय सोप्या इंग्रजी भाषेतील असून, सर्वांनी वाचावे असे आहे. महाभारतातील कथांचे अतिशय इंटरेस्टिंग असे वर्णन ह्यात केलेले आहे. ह्याच लेखकाने अशाच प्रकारची पौराणिक कथांवर आधारित ४ पुस्तके लिहिलेली आहेत. 

व्यासांनी  ही कथा त्यांच्या मुलाला देखील सांगितली, ही कथा सांगताना जैमिनी ह्या त्यांच्या शिष्याने देखील ऐकली. परंतु ह्या काव्यांचा अर्थ न समजल्यामुळे जैमिनी अर्थ समजावून घेण्यासाठी मार्कंडेय ऋषींकडे गेला. परंतु ऋषींनी मौनव्रत धारण केल्यामुळे, त्यांच्या  शिष्याने  एक पक्षाकडे जैमिनीला जाण्याची सूचना केली (त्या काळी असे पक्षी म्हणजे गंधर्व किंवा अप्सरा, देवांच्या शापाने पक्षी झालेले असायचे, परंतू त्यांना मानवासारखे बोलता यायचे).  पुन्हा एक गमतीदार कथा .... महाभारताचे युध्द सुरु असताना ही पक्षिणी आकाशात उडत होती. तिच्या पोटात चार अंडी होती. युध्द सुरु असताना एक बाण ह्या पक्षिणीच्या पोटात शिरून तिचे पोट फाटले आणी त्यातील चार अंडी जमिनीवर पडली. जमिनीवर रक्त-मासांचा आणी हत्ती, घोड्यांच्या विष्टेचा चिखल झालेला होता म्हणून अंडी फुटली नाहीत. त्यातून पिले बाहेर निघाली. त्यांच्या आईने ही अंडी पोटात असताना व्यासांचे " जय" काव्य आणी त्यांचा अर्थ ह्या अंड्यातील गर्भाना सांगितला होता. ह्या पिल्लांनी नंतर संपूर्ण १८ दिवसांच्या महाभारताच्या युद्धाचे प्रत्यक्षदर्शी वर्णन आणी "जय" काव्य जैमिनीला समजावून सांगितले. त्यामुळे नंतर व्यास ऋषींनी सांगितलेल्या "जय" काव्यात महाभारताच्या युद्धाचा देखील समावेश करण्यात आला. ह्याच पुस्तकात  महाभारतातील पौराणिक कथांकडे भारतातील प्रत्येक राज्ज्यात कश्या दृष्टीकोनातून बघितल्या जाते ह्याचे देखील उत्तम विश्लेषण केलेले आहे.