Sunday, February 20, 2011

सारांश - भाग १ - The Immortals of Melhua


बृहस्पती आणी शिवा (नीलकंठ) ह्या दोघांमधील हा संवाद:
बृहस्पती म्हणले, वैचारिक पातळीवर सोमरसाचे शरीरातील कार्य सुलभ असू शकेल, परंतू ही महान संकल्पना प्रत्यक्षात साकारण्याचे कार्य मात्र ब्रह्मदेवाचे". Aging process काही औषधांनी पुढे ढकलणे कसे शक्य आहे ह्याचा अभ्यास करण्यापूर्वी आपण जिवंत का असतो? अशी कोणती मुलभूत बाब आहे जी आपणाला जिवंत ठेवते? बृहस्पती म्हणले, ही मुलभूत बाब म्हणजेच "उर्जा". जोपर्यंत व्यक्ती जिवंत असते तो पर्यंत बोलताना, चालताना, विचार करताना, कामे करताना आणी झोपेत देखील ह्याच उर्जेचा जिवंत राहण्यासाठी उपयोग होतो. ह्या उर्जेचे स्त्रोत काय? तर आपण जे अन्नपदार्थ सेवन करतो त्या अन्नाचे उर्जेत रुपांतर होते, ती शरीरात साठविली जाते. त्यामुळे काही दिवस आपण पूर्ण उपवास जरी केला तरी आपणाला अशक्त जरूर वाटेल, पण तरीदेखील आपण जिवंत असतो. अन्नपदार्थांपासून ही उर्जा वातावरणातील हवेतील प्राणवायू मुळेच निर्माण होते. त्यामुळे, अन्नपदार्थांचे सेवन करूनही, प्राणवायू अभावी उर्जा निर्माण होणार नाही आणी जिवंत राहण्यासाठी उर्जा नसल्यामुळे मृत्त्यू अटळ आहे. शिवा म्हणला," परंतू ह्या सर्वांचा, aging प्रोसेस, काही औषधांनी पुढे ढकलण्याशी काय संबध आहे?" बृहस्पती हसले आणी म्हणले, "हीच तर खरी गोम आहे, जो प्राणवायू आपणाला जिवंत ठेवतो तोच प्राणवायू aging process आणी मृत्त्यू साठी कारणीभूत आहे. जेव्हा प्राणवायू आणी अन्नपदार्थ ह्यांचा संयोग होवून एका रासायनिक प्रक्रियेद्वारे उर्जा निर्माण होते, त्याच प्रक्रियेतून oxidents हे free radicles शरीरात निर्माण होवून साठविले जातात. जसे लोखंडावर प्राणवायूची प्रक्रिया होवून oxidizing process द्वारे त्यावर जंग (rust) निर्माण होवून हळू हळू लोखंडाची गुणवत्ता कमी कमी होत जाते, एखादे फळ हवेत ठेवले तर ते फळही कालांतराने प्राणवायूच्या प्रक्रियेमुळे खराब होते, सडते, तशीच प्रक्रिया आपल्या शरीरात देखील होते. प्राणवायूच्या प्रक्रियेमुळे निर्माण झालेले हे oxidents हळूहळू शरीरातील पेशींवर विपरीत परिणाम करण्यास सुरवात करतात. लोखंडासारखे आपले शरीरही आतून गंजत जाते, हीच aging प्रोसेस, आणी त्याचा परिपाक म्हणजे मृत्त्यू. जो प्राणवायू आपणाला जीवन देतो तोच प्राणवायू हळू हळू आपणाला मृत्त्युच्या निकट नेत राहतो". ज्याप्रमाणे आपण अन्न, पाणी शरीरात साठवून ठेवू शकतो, ह्या गोष्टी मिळाल्या नाही तरी बरेच दिवस जिवंत राहू शकतो, पण प्राणवायू मात्र साठवून ठेवू शकत नाही, काही मिनिटातच प्राणवायू अभावी मृत्त्यू अटळ आहे. कदाचित साठविलेला प्राणवायू हे शरीरासाठी विष ठरेल म्हणूनच निसर्गाने ही किमया केलेली असावी.
बर्याच शास्त्रीय अभ्यासांती ब्रह्मदेवानी सोमरसाचा शोध लावला. सोमरस प्राशन केल्यानंतर शरीरातील oxidents सोबत ह्या सोमरसाची प्रक्रिया होवून हे प्राणघातक oxidents घामाद्वारे किंवा लघविद्वारे विसर्जित केले जातात. सोमरसाचे एका विशिष्ठ कालाविधीनंतर नियमित प्राशन केल्यास aging process आणी मृत्त्यू ही प्रक्रियाच लांबते हाच ब्राह्म्देवांचा शोध. अमिष ह्या कोलकाता येथील IIM संस्थेतून पदवी प्राप्त केलेल्या लेखकाने लिहिलेल्या "The Immortals of Melhua " ह्या पुस्तकातील वरील सोमरसाची पार्श्वभूमी.

राम हा एक सूर्यवंशीय रजा, ज्याने आपल्या प्रजेसाठी आचार विचारांची एक दिशा ठरवून दिली, ज्या प्रदेशात हे रामराज्ज्य अस्तित्वात होते त्या प्रदेशाला लेखकाने "meluha " म्हणून संबोधित केले आहे आणी राजधानी देवगिरी. सोमरसाचा शोध तर ब्रह्मदेवानी लावला परंतू त्याची निर्मिती कोठे करावी जेणेकरून त्याचा दूरूपयोग होणार नाही, म्हणूनच नीती आणी अचार विचारांनी परिपक्व असणारया सूर्यवंशीय meluha ह्या राम राज्ज्यातील मंदार पर्वताची निवड करण्यात आली. बृहस्पती हे ह्या निर्मिती कारखान्याचे प्रमुख. सोमरसाच्या निर्मितीसाठी आवश्यक वनस्पती, संजीवनी वृक्ष मंदार पर्वतानजीकच्या अर्रण्यात भरपूर प्रमाणात उपलब्ध असल्यामुळेच ह्या जागेची निवड. फक्त सरस्वती नदीच्या पाण्याचाच उपयोग सोमरस निर्मितीसाठी होणार असल्यामुळे, मोठ्या कालव्याद्वारे सरस्वतीचे पाणी आणण्यात आले.

सोमरस सेवन केल्यानंतर बर्याच कालावधीपर्यंत विसर्जित होणारा घाम आणी मल- मुत्र ह्यात फार मोठ्या प्रमाणात oxidents असल्यामुळे, आणी ह्या विसर्जनाची योग्य विल्हेवाट न लावल्यास त्याचा शरीरावर आणी त्याच्या सान्निध्यात येणाऱ्या लोकांवर विपरीत परिणाम होणार हे जाणून, व्ययक्तिक स्वच्छता, रोज दोन वेळा स्नान करणे ही सूर्यवंशीयांची सवय, सांडपाण्याची मोठ मोठ्या बंद नाल्या निर्माण करून योग्य विल्हेवाटलावणे हे राजाचे कर्त्तव्य.
अभिमान वाटावे असे रामाने निर्माण केलेले सूर्यवंशीय राज्ज्य. नंतरच्या अनेक पिढ्यातील सूर्यवंशीय राजांनी ही परंपरा जोपासलेली, परंतू हळू हळू ही परंपरा नष्ट होईल काय ह्या भीतीने धास्तावलेले दक्ष (पुस्तकात रामाचा वंशज म्हणून दक्ष राजाचा उल्लेख आहे, दक्ष राज्याचे वय १८८ वर्ष आणी दक्ष राजाची पुत्री म्हणजे सती किंवा पार्वती - वय - ८८). भीती वाटण्याचे महत्वाचे कारण म्हणजे सरस्वती नदीच्या पाण्याचा सतत कमी होत असणारा स्त्रोत. शिवाय शेजारच्या चंद्रवंशीय आणी नागा राज्ज्यकर्त्यांचे सतत होणारे आक्रमण. ह्या सर्व परिस्थितीवर फक्त एकाच व्यक्ती तोडगा काढू शकेल ज्या व्यक्तीचा गळा सोमरसाचे सेवन केल्यानंतर निळ्या रंगाचा होईल. तिबेट मधील मानसरोवर परिसरातील क्षेत्रात अनेक आदिवासी टोळ्या राहत होत्या. अश्याच एका टोळीचा शिवा हा नायक. सूर्यवंशीय राज्याचे मुख्यालय म्हणजे देवगिरी (सात नद्यांचा हा प्रदेश - गंगा, यमुना, सरस्वती, सिंधू, ब्रह्मपुत्रा, शरयू आणी दक्षिणेची राज्याची हद्द म्हणजे नर्मदा). मेलुहा प्रदेशाचा प्रधान म्हणजे "नंदी" . तो शिवाला त्याच्या टोळीसह मेलुहा राज्यातील श्रीनगर येथे घेऊन येतो. सर्व पाहुण्यांना सोमरस दिल्यानंतर, फक्त शिवा सोडून सर्वाना फार त्रास व्हायला लागतो. फक्त शिवाला मात्र काहीच त्रास होत नाही, किंबहुना सोमरस पिल्यानंतर त्याचा कंठ नेहमीचा निळा होतो. हाच तो नीलकंठ, सूर्यवंशीयांना वाचविणारा, म्हणून नंदी त्याला देवगिरी राज्यात घेवून येतो. सोबत शिवाचा मित्र वीरभद्र हा देखील असतो.

आपण सर्वांनी ऐकलेल्या पौराणिक कथांच्या अगदी वेगळे असे हे कथानक. बर्याच गोष्टी अत्तर्क्य, अनाकलनीय, विश्वास न पटण्यासारख्या, तरी देखील, पुस्तकातील राम राज्याची, सोमरसाची संकल्पना विचार करण्यासारखी. आणी अगदी पहिल्या पानापासून वाचतच राहावं असे वाटणारे हे कथानक. सोमरसाची निर्मिती केल्यानंतर त्याचा दूरूपयोग होऊ नये म्हणून ब्रह्मदेवाने केलेली उपाययोजना आणी त्याच अनुषंगाने नंतर रामाने अमलात आणलेली चातुरवर्ण्य पद्धती ह्या बाबत वाचा माझा पुढील लेख ..

Saturday, February 12, 2011

उंदीर आणी प्रशासन


मंत्रालयातील सामान्य प्रशासन हा अतिशय महत्वाचा विभाग. श्री करडे, ह्या विभागातील एक अतिशय कर्मठ कर्मचारी. सेवानिवृत्तीला एक वर्ष राहिले असताना कक्ष अधिकारी म्हणून पदोन्नती झालेली. सर्व कायदे मुखोद्गत, कायद्याचा किडा म्हणूनच प्रसिद्धी. काम झाले नाही तरी चालेल पण कायदे, नियम मात्र पाळले गेलेच पाहिजे हा सततचा अट्टाहास. त्यामुळेच कोणाशीच न पटणारी ही व्यक्ती. सामान्य प्रशासन विभागातील भांडार म्हणजे एक मोठं कक्ष आणी त्यात ३०-४० racks, जुन्या पुराण्या असंख्य files त्यात ठेवलेल्या. ह्या साठी एक कक्ष अधिकारी आणी एक शिपाई एवढाच staff. फायीलींची आवक जावक आणी त्यांच्या नोंदी ठेवणे एवढेच काम. कोणालाच नको असणारया श्री करडे ह्यांना साहजिकच पदोन्नती नंतर ह्या भांडारात पाठविण्यात आले.

एक दिवशी सकाळी ११ वाजता आपल्या खुर्चीत बसले असता श्री करडे ह्यांना एक उंदीर दिसला आणी त्यांचे विचारचक्र सुरु झाले. कायदे आणी नियमाचा किडा ते, एक नस्ती (file ) घेतली आणी कागदावर लिहिण्यास सुरवात केली. " दिनांक .. वेळ . विषय: उंदीर आणी त्यामुळे शासनाचे होणारे संभावित नुकसान - आदरणीय महोदय, आज सकाळी खुर्चीवर बसलेलो असताना सकाळी ११ वाजून १७ मिनिटांनी एक उंदीर मला rack क्रमांक ९ समोरून निघून rack क्रमांक १० खाली गेलेला दिसला. ह्या कक्षात अनेक अतिशय महत्वाच्या files आहेत, हा उंदीर त्या files नष्ट करण्याची शक्यता नाकारता येत नाही. मला सेवानिवृत्तीला फक्त १० महिने राहिलेले आहेत. ह्या files व्यवस्थित राखणे माझी नियम क्रमांक ..... नुसार जबाबदारी आहे. परंतू ह्या उंदरावर कोणतीही कार्यवाही करण्याचा नियम क्रमांक ..... नुसार मला अधिकार नाही. त्यामुळे ह्या विषयावर त्वरित कार्यवाही न झाल्यास आणी काही महत्वाच्या files नष्ट झाल्यास मी जबाबदार राहणार नाही. शेवटच्या ओळीवर लाल शाईने अधोरेखांकित केले. खाली आपली स्वाक्षरी केली. त्याखाली नियमानुसार सेवा जेष्ठतेनुसार अवर सचिव, उप सचिव, सचिव आणी प्रधान सचिव ह्याची नावे लिहिली. file ला "प्रथम प्राधान्य", "अति महत्वाचे", "तातडीचा निर्णय" "विशेष दुताद्वारे" असे ४-५ लाल रंगाचे tags लावले. शिपायाला बोलावून ही file तत्काळ अवर सचिवांकडे घेवून जाण्याचे आदेश दिले. शिपाई file घेवून अवर सचिवांच्या कक्षात गेला. सामान्यतः मंत्रालयात कोणत्याच file वर तातडीने निर्णय होत नसतो. ४-५ tags लावलेली file, शेवटचे फक्त लाल शाईने अधोरेखांकित केलेले वाक्य वाचले. विचार केला "काही तरी भंयकर प्रकरण दिसतंय, न वाचताच आपली लहान स्वाक्षरी केली आणी त्याच शिपायाला ही file उप सचिवांकडे घेवून जाण्याची सूचना दिली. " ह्या विषयावर त्वरित कार्यवाही न झाल्यास आणी काही महत्वाच्या files नष्ट झाल्यास मी जबाबदार राहणार नाही" हे लाल शाईने अधोरेखांकित केलेले वाक्य वाक्य पाहून वरील अधिकार्यांनीही न वाचता सही करून शेवटी शिपाई ही file घेवून प्रधान सचिवांच्या कक्षात गेला. त्यांनीही शेवटचे वाक्य वाचले आणी त्याखालील सर्वांच्या सह्या पहिल्या. इतर काहीच वाचले नाही. आता आपण निर्णय घेतला आणी फसलो तर? त्यांनी तत्काळ त्यांच्या हाताखालच्या अधिकार्याला पाचारण केले. file त्यांच्या अंगावर फेकली "मूर्ख, मी सचिव असताना अश्या files मी कधीच वरिष्ठांकडे पाठवत नव्हतो, मीच निर्णय घेत होतो. कशाला बसलात ह्या खुर्चीवर, मूर्ख, बेजबाबदार" शिव्या देवून हाकलून दिले. आणी नंतर हीच वर्तणूक आणी हेच वाक्य - उप सचिव, अवर सचिव ह्यांनी देखील त्याच प्रमाणे आपल्या हाताखालच्या अधिकाऱ्यांच्या अंगावर ही नस्ती फेकून दिली. आणी सर्वात शेवटी शिपायाच्या अंगावर. बिचारा शिपाई ही file घेवून वापस आला. श्री करडे चहा पिण्यासाठी बाहेर गेलेले पाहून शिपायाने ही file साहेबांच्या खुर्चीतील उशीखाली दडवून ठेवली.

२ महिन्यानंतर श्री करडे खुर्चीत बसले असता त्यांच्या ढुंगनाला काही तरी टोचले. उशी वर करून पहिले तर ही file , त्याचीच एक टाचणी त्यांच्या ढुंगनाला टोचली होती. पुन्हा ४-५ नियम, कायदे ह्यांचा उल्लेख करून एक पानभर लिहून ही नस्ती वर पाठविली. शेवटी ही नस्ती प्रधान सचिवांकडे पोहचली. नस्ती वाचावीच लागली त्यांना. एक उंदीर आपल्या विभागात धुमाकूळ घालतोय हे त्यांना कळले. त्यांनी शेरा लिहिला " सामान्य प्रशासन विभागाकडे, उंदराच्या अपेक्षित कार्यवाही बाबत तांत्रिक ज्ञान असणारे अधिकारी नसल्यामुळे ही नस्ती तांत्रिक मार्ग्दर्षानाकरिता आणी योग्य उपाय योजना सुचविण्याकरिता संबंधित विभागांकडे पाठविण्यात यावी. आरोग्य विभाग, कृषी विभाग, warehouse corporation आणी defense ह्या चार विभागांची निवड झाली. पत्रव्यवहार सुरु झाला. आरोग्य विभागाचे अधिकार चौकशी साठी आले. त्यांचा अहवाल " आरोग्य विभाग उंदरांमुळे निर्माण होणारया रोगांच्या प्रतीबंधानाचे तथा उपचाराचे कार्य करते, उंदराला नाहीशे करणे ह्या विभागाचे काम नाही". कृषी विभागाचा चौकशी अहवाल " हा उंदीर घरगुती उंदीर होता कि शेतातील ह्याचा खुलासा करावा, शेतातील उंदीर असल्यास कृषी विभाग निश्चितच मार्गदर्शन करू शकेल". warehouse corporation चा अहवाल " आम्ही उंदीर मारीत नाही तर उंदीर आत येवू शकणार नाही असे warehouse बांधतो. आपल्या विभागाला असे भांडार निर्माण करावयाचे असल्यास आम्ही निश्चितच तांत्रिक सल्ला देवू" सुरक्षा विभाग थोडा समजदार असावा, अधिकारी न पाठवता त्यांनी उलट विचारणा केली " आकस्मिक स्थितीतच सुरक्षा विभाग नागरी विभागास मदत करू शकतो. आपल्या राज्यात आकस्मिक स्थिती जाहीर झालेली आहे काय? नसल्यास कृपया आकस्मिक स्थिती जाहीर करण्यासाठी माननीय राष्ट्रपती महोदयांना प्रथम विनंती करावी"

तो पर्यंत एक उंदीर धुमाकूळ घालतोय हे मंत्रालयात सर्वाना माहित व्हायला लागले. सर्व अहवालांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी महाबळेश्वर येथे दोन दिवसांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ४०-५० अधिकारी सपरिवार उपस्थित होते. निर्णय झाला "ह्या उन्दरासाठी काय करावे ह्याची तांत्रिक माहिती आपल्या कोणत्याच विभागाकडे नसल्यामुळे परदेश प्रशिक्षण दौरा आयोजित करून ३-४ देशांना भेटी द्याव्या". ५ अधिकारी , ५ मंत्री आणी ५ आमदार असे सर्व ४ देशांचा १५ दिवसांचा परदेश दौरा करून परत आले. पुन्हा कार्यशाळा, चर्चा सुरूच राहिली. प्रत्येक विभागात काही असंतुष्ठ अधिकारी, कर्मचारी असतातच. त्यांनी ही सर्व माहिती गोळा करून विरुद्ध पक्षाच्या आमदारांना पुरविली. विधानसभेत आणी विधान परिषदेत प्रश्न विचारण्यात आले, अनेक तास चर्चा झाली, दोन वेळा सभात्याग झाला.

सेवानिवृत्तीला एक महिना राहिला असताना, शिपायाने श्री करडे ह्यांना ह्या उंदराच्या प्रकरण बाबत विचारणा केली. नस्तीतील सर्व माहिती नियम आणी कायद्यासह श्री करडे ह्यांनी शिपायाला समजावून सांगितली. शिपाई म्हणाला, " अर्रेचा, हाच तो उंदीर होता काय? साहेब आपणाला ज्या दिवशी तो उंदीर दिसला त्यानंतर २-३ दिवसांनी मी दरवाज्याजवळ स्टूल वर बसलो होतो, मला तो उंदीर आलामारीखाली दिसला, हातात झाडू घेवून दबा धरून बसलो, थोड्या वेळाने तो पुन्हा बाहेर आला, एका झाडूतच त्याला मारला आणी बाहेर फेकून दिला". श्री करडे, अरे त्या उंदराची केस सुरु असताना तू त्याला कसा मारलास? त्यांनी पुन्हा कायदे, नियम लिहून नस्ती तयार करून वर पाठविली आणी शेवटी चौकशी सुरु असणारया उंदराला मारले म्हणून शिपायाला निलंबित करण्यात आले.

प्रशासन आणी व्यवस्थापन हे दोन शब्द आपण नेहमीच ऐकत असतो. प्रशासन म्हणजे कायद्याच्या, नियमांच्या चौकटीत राहून कार्य करणे. तर व्यवस्थापन म्हणजे उपलब्ध मनुष्यबळ, सामुग्री आणी पैसा ह्यांचा योग्य विनियोग करून अपेक्षित उद्धेश अपेक्षित कालवधीत साध्य करणे. अपेक्षित उद्धेश साध्य करणे हे व्यवस्थापनाचे महत्वाचे कार्य, प्रशासनाचेही तेच कार्य आहे, परंतू उद्धेश साध्य करण्याकडे प्राथमिकता न देता कायदा आणी नियमांचा कीस पडून, फक्त कायद्याच्या, नियमांच्या चौकटीत राहून कार्य करणे हा शासकीय दृष्टीकोन. उंदीर हा जर problem होता तर माझ्या दृष्टीने तो शिपाई एक चांगला व्यवस्थापक होता कारण त्वरित निर्णय घेवून त्याने हा प्रोब्लेम सोडविला होता. पण प्रशासन बघा, बक्शिश तर सोडाच, चौकशी सुरु असणारया उंदराला मारले म्हणून त्यालाच निलंबित व्हावे लागले. ह्या प्रसंगाकडे एक हास्यास्पद कथा म्हणून न बघता, अनावश्यक कालाप्यव्यय, पैश्याचा अनाठायी खर्च टाळण्यासाठी प्रशासन आणी व्यवस्थापन योग्य रित्या समजून आपला उद्धेश कश्या प्रकारे साध्य करता येईल ह्याकडे लक्ष देवून अधिक जाणीवपूर्वक कार्य करणे महत्वाचे ठरते.