Sunday, September 26, 2010

गोष्ट प्रत्येक लीनाची ?


सहा महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या १९ वर्षांच्या लेकीला तिची आई गर्भपातासाठी क्‍लिनिकमध्ये घेऊन आली. आईने दिलेले गर्भपाताचे कारणही सयुक्तिक होते. तिच्या लेकीचा नवरा त्यांच्या कुटुंबातला एकुलता एक मुलगा. त्याला दोन बहिणी आणि साहजिकच त्याच्यावर बहिणींच्या लग्नाची जबाबदारी. नजीकच्या भविष्यातील आर्थिक जबाबदारी लक्षात घेता तिने आणि तिच्या नवऱ्याने दोन वर्षे मूल होऊ न देण्याचा निर्णय घेतला. मात्र दुर्दैवाने हे नियोजन फसले आणि ती गर्भवती राहिली. या कहाणीच्या आधारे त्यांच्या मुलीचा वैद्यकीय गर्भपात करण्यास काहीच कायदेशीर अडचणी नव्हत्या; पण या साऱ्या चर्चेत मुलीची आईच फक्त बोलत होती आणि ती मान खाली घालून शांतपणे बसली होती. तिचे सर्व हावभाव, देहबोली पाहून डॉक्‍टरांना काही शंका आली. ते तिला तपासण्यासाठी आत घेऊन गेले. तिच्या आईला जाणीवपूर्वक बाहेरच थांबायला सांगितले. तिच्याशी संवाद साधल्यानंतर डॉक्‍टरांना वेगळीच माहिती मिळाली.

ती अविवाहित होती. १९ वर्षांची नसून, फक्त १६ वर्षांची होती. त्यांचा एक दूरचा नातलग, २२-२३ वर्षांचा मुलगा नोकरी शोधण्याच्या निमित्ताने १५-२० दिवस राहण्यासाठी आला होता. मुलगा अतिशय स्मार्ट होता. तो हळूहळू तिच्यामध्ये स्वारस्य दाखवू लागला. ती षोडषाही त्याच्या मोहजालात अडकली. तीन-चार वेळा त्यांचे शारीरिक संबंध आले आणि ती गर्भवती राहिली. ही बाब घरच्यांना समजल्यावर त्यांनी ताबडतोब त्या मुलाशी संपर्क साधला; पण त्याने मात्र आपले असे काही संबंध आले होते, हे नाकारले. आता तिच्या घरच्यांसमोर गर्भपाताशिवाय दुसरा पर्याय नव्हता. त्यातूनच ही कहाणी तयार करण्यात आली.

ही कहाणी आपल्याला अपवादात्मक वाटेल. अशा प्रकारच्या घटना क्वचितच घडतात, असे आपल्याला वाटते. विवाहपूर्व लैंगिक संबंध ही अपवादात्मकच घटना असते, असे आपण समजतो. ही आपली मानसिकता असेल किंवा दांभिकपणा; पण वस्तुस्थिती आणि उपलब्ध शास्त्रीय आकडेवारी वेगळेच काही दर्शवते ः

किशोरावस्थेतील मुलींच्या गर्भपाताचे प्रमाण ३० टक्के
मुंबई उपनगरांतील अभ्यासानुसार एकूण गर्भपातांपैकी २१.७ टक्के गर्भपात १६ वर्षांखालील मुलींचे.
किशोर वयोगटात एचआयव्हीचे प्रमाण वाढते आहे.
किशोर वयोगटात लैंगिक आजारांचे प्रमाणही वाढते आहे.

ही घटना त्या एकट्या मुलीच्या आयुष्यात घडलेली नाही. अशी काही उदाहरणे आपल्यालाही माहीत असतील; पण त्याकडे दुर्लक्ष करण्याची आपली मानसिकता असते. मग या अशा घटनांमध्ये दोष कोणाचा मानावा? मुलगी, तो मुलगा, तिचे कुटुंबीय, आजची सामाजिक-सांस्कृतिक जीवनपद्धती, अधिक मुक्त समाजपद्धती, की आणखी काही? अशा प्रकारांसाठी यातले एखादे कारण निश्‍चित करणे केवळ अशक्‍य आहे.

किशोरावस्थेतील लैंगिक वर्तन - वस्तुस्थिती
१५ ते २० वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुली लैंगिक प्रलोभनाला फार लवकर बळी पडतात.
तारुण्यातील शारीरिक आणि लैंगिक बदल, लैंगिक अवयवांबद्दल वाढणारी उत्सुकता आणि प्रायोगिक वृत्ती.
विरुद्धलिंगी व्यक्तीबद्दल वाटणारे आकर्षण, ओढ आणि त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याची उत्सुकता.
मित्रांचा दबाव. सर्वसाधारणपणे किशोर वयोगटात शारीरिक आणि लैंगिक बदलाबद्दल योग्य शास्त्रीय माहिती नसणे किंवा त्याबद्दलची शास्त्रीय माहिती सहज उपलब्ध न होणे, या विषयाबाबत पालकांशी खुला सुसंवाद नसणे, अशा परिस्थितीत माहिती मिळविण्याची जागा म्हणजे त्यांचे मित्र... बहुधा त्यांच्यापेक्षा वयाने थोडे मोठे असणारे मित्र. त्यांच्याकडून या मुलांना जी माहिती मिळते, तीही बऱ्याचदा चुकीची, दिशाभूल करणारी असते. सोबत अश्‍लील पुस्तके, इंटरनेटवरील साइट्‌स यांची सहज उपलब्धता. या साऱ्याचा परिपाक म्हणजे लैंगिकतेची अधिक ओढ, प्रयोग करून बघण्याची उत्सुकता आणि लैंगिक प्रलोभनांना सहजपणे बळी पडणे.

बऱ्याचदा प्रथम लैंगिक संबंध हे पुढील धमकीची सुरवात ठरू शकतात. त्या मुलीला बदनामीचा धाक दाखवून पुढेही असे संबंध ठेवण्यास भाग पाडले जाते.

असेही निदर्शनात आलेले आहे, की सुरवातीला उत्सुकतेपोटी लैंगिक संबंध ठेवणारे जेव्हा स्वतःचे आत्मपरीक्षण करतात, तेव्हा त्यांना आपली फार मोठी चूक झाली आहे, असे वाटू लागले. अशा वाटण्यातून ते अंतर्मुख होतात आणि या साऱ्याचा त्यांच्या भविष्यातील शैक्षणिक, शारीरिक आणि लैंगिक विकासावर परिणाम होतो.

"तिच्या'सारखी घटना निदर्शनास आल्याबरोबर होणारी पालकांची प्रतिक्रिया -
सामाजिक स्थितीच संपूर्ण बिघडलेली आहे.
मनोरंजनाच्या साधनांची सहज उपलब्धता, टीव्ही, इंटरनेट यामुळे आजची पिढी पूर्णपणे बिघडत आहे.
किशोरवयात होणाऱ्या शारीरिक, मानसिक, लैंगिक बदलांबाबत मुलांशी चर्चा करू नये. या गोष्टी शाळेत शिकवल्यामुळे मुलांची उत्सुकता जागृत होते आणि त्यामुळेच ही मुले प्रयोग करून पाहण्यासाठी प्रवृत्त होतात. आमच्या वेळी आम्हाला कोणी असे काही शिकविले होते का? आम्ही किती चांगले वागत होतो! आम्हाला ही माहिती मिळाली नाही म्हणून आमचे कुठे काय बिघडले?
आम्ही मुलांसाठी दिवसभर मर मर मरावे; त्यांच्या सुखासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी पैसे कमवावेत, तरीदेखील ही मुले चांगली का वागत नाहीत? आम्ही तर आमची सारी कर्तव्ये पूर्ण करत आहोत; पण ही आजची पिढी आम्हाला समजूनच घेत नाही.
शारीरिक, लैंगिक विषयांबाबत आम्हाला आमच्याच मुलांशी बोलण्यात संकोच वाटतो. नाही बोलू शकत आम्ही मुलांशी या विषयांवर.
आमची मुले खूप गुणी आहेत; पण त्यांचे मित्र वाईट आहेत. आमच्या मुलांना तेच मित्र वाईट वळण लावतात; पण आम्ही तरी त्यांच्यावर किती आणि कुठे कुठे लक्ष देणार?
विभक्त कुटुंबपद्धती आणि मुलांचे आजी-आजोबाही या परिस्थितीला बऱ्याच अंशी कारणीभूत आहेत. ते करत असलेले मुलांचे अनावश्‍यक लाड त्यांना बिघडवत आहेत.
२४ तासांतील किती तास मुले आमच्या सोबत असतात? घराच्या चार भिंतींबाहेर जी बदलती सामाजिक परिस्थिती आहे, तिच्याशी आम्ही कसे लढणार?

अशी काही घटना घडली, की पालकांच्या साधारणपणे या अशाच प्रतिक्रिया असतात. बदलत्या सामाजिक परिस्थितीला दोष देऊन आणि ही परिस्थिती आपल्या नियंत्रणाबाहेर आहे, अशी सबब सांगून आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला जातो. खरोखरच पालक म्हणून आपण आत्मपरीक्षण करण्याचा आणि आपल्याच चुका शोधण्याचा प्रयत्न करतो का? बदलती सामाजिक परिस्थिती जरी गंभीर असली, तरी ती नियंत्रणाबाहेर निश्‍चितच नाही. कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता, योग्य वेळी योग्य तो निर्णय घेण्याची क्षमता आपण आपल्या पाल्यांमध्ये निर्माण करतो आहोत का, हा कळीचा प्रश्‍न आहे. पालक म्हणून आपण जाणीवपूर्वक काय केले पाहिजे, हे समजून घेण्याची ही वेळ आहे.

आपल्यात आणि आपल्या पाल्यांमध्ये असणारी दरी दूर करण्यासाठी काय करता येईल?
आपणच सर्वज्ञानी आहोत, हा गैरसमज प्रथम दूर करा. प्रजनन स्वास्थ्य, किशोरवयीन प्रजनन स्वास्थ्य, लैंगिकता, किशोरवयीन मानसिकता या विषयांचे वाचन, अभ्यास आणि ते समजून घेण्याची गरज आहे.
पालक आणि पाल्यांमध्ये विश्‍वासार्हता, जवळीक आणि आत्मीयता असावी.
पाल्याचा चांगला शिक्षक, मार्गदर्शक आणि सल्लागार होण्याचा प्रयत्न करा.
आपल्या पाल्याला लैंगिक विषयांची योग्य शास्त्रीय माहिती असलेली पुस्तके द्या.
आपल्या पाल्यामध्ये जाणवणारे छोटेसे मानसिक बदलही लगेच ओळखा आणि त्याच्याशी चर्चा करा.
खूप कामामुळे मुलांशी बोलताही येत नाही, असे वातावरण नको. मुलांना आवडणाऱ्या विषयांवर अनौपचारिक गप्पा मारून त्यांच्याशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न करा.
घरात सदैव आनंदी, खेळकर, उत्साहाचे वातावरण असेल याचा प्रयत्न करा.
मुलांकरिता नियमितपणे जाणीवपूर्वक वेळ काढा. घरामध्ये वातावरण निरोगी असेल, तर मुले अधिक मोकळेपणाने बोलण्याचा, सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करतील.
स्वतःचे निर्णय मुलांवर लादण्याचा प्रयत्न अजिबातच करू नका. मुलांना त्यांचे निर्णय स्वतःच घेण्यासाठी प्रवृत्त करा.
"तुमच्या वयात असताना, मी असा वागत होतो किंवा होते,' हे वाक्‍य सदान्‌कदा म्हणू नका. तुम्ही कसे होता, ते मुलांवर अजिबात लादू नका.
मुलांच्या नियमित व्यवहारात नाहक ढवळाढवळ करू नका.
विकासासाठी योग्य शिस्त आवश्‍यकच असते; पण त्याच शिस्तीचा अतिरेक झाला, की ती विकासाला बाधक असते.
लक्षात ठेवा, मुलांचे पहिले शिक्षक तुम्हीच आहात. त्यामुळे तुम्ही काय बोलता, काय सांगता, काय सल्ला देता आणि त्याच वेळी तुम्ही स्वतः कसे वागत असता, यावर त्यांचे बारीक लक्ष असते. त्यामुळे त्यात विसंगती नको.
बदलत्या सामाजिक परिस्थितीचा खूप मोठा बागुलबुवा निर्माण करून मुलांना नाहकच घाबरवू नका.
मुलांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी त्यांनी केलेल्या चांगल्या कामाचे कौतुक इतरांसमोर आवर्जून करा. बाहेरच्यांसमोर त्यांचा पाणउतारा करू नका.

साधारणपणे या गोष्टी पालकांनी पाळल्या पाहिजेत. अर्थात ही काही काळ्या दगडावरची रेघ नाही. आपण या नियमांत बदलही करू शकतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, की किशोरवयीन अवस्था आणि उत्सुकता यांचे दृढ नाते असते. संपर्काची नवी साधने, जीवन जगण्याच्या पद्धतीतील आमूलाग्र बदल, बदलती लैंगिक मूल्ये, लैंगिक प्रलोभने आणि अर्धवट माहितीच्या आधारे निर्माण होणारी प्रायोगिक वृत्ती, या सर्व परिस्थितीतून आजचा युवा वर्ग जात आहे. त्याचा विचार करून, कोणत्या
परिस्थितीत कोणी कसे वागावे, हे सांगणारा एकच एक असा रामबाण उपाय नाही.


वरील लेख सकाळ च्या २० सप्टेंबर च्या रेशीमनाती या सदरात प्रकाशित झाला होता.
सकाळ वरील लेख

5 comments:

  1. good write-up pappa ekdum sahi lihiley aahey!!

    ReplyDelete
  2. Pratyek Palkani Vachava Asa Lekh.
    Dushyant

    ReplyDelete
  3. Dr.Deshmukh: Yes, I agree with immediate reactions of parents and certainly this is not a rare incidence. Worth including in adolescents training programs.

    ReplyDelete
  4. dr.deo I am involved in training of adolescents, excellent case, can I use this?

    ReplyDelete