Friday, September 30, 2011

दृष्टीकोण



संगणकासाठी लागणारे साहित्त्य, उपकरणे निर्मिती करणारा एक तरुण उद्ध्योजक. व्यवसायातील मंदी मुळे त्रस्त झालेला. कर्जाचा डोंगर, कच्चा माल पुरविणाऱ्या पुरवठाधारकांचा पैश्याकरिता सततचा तगादा. ह्या सर्व दुष्टचक्रातून कसा मार्ग काढावा त्याल काहीच कळत नव्हते. एक दिवशी असाच तो आतिशय उदास होवून डोक्यावर हात ठेवून बगीच्यात बसलेला होता, ह्या सर्व विपरीत आर्थिक परिस्थितून बाहेर कसे निघता येईल ह्याचाच विचार करीत होता. अचानक एक म्हातारी व्यक्ती त्यचे समोर उभी ठाकली. " तुला कोणती तरी फार मोठी चिंता किंवा समस्या भेडसावीत असावी असे मला वाटते, तो व्यकी म्हणली"

कोणापाशी तरी आपली समस्या कथन करावी, आपले दुखः हलके करावे ह्या भावनेतून त्याने आपल्या व्यवसायाबाबत सर्व काही त्या म्हातारया व्यक्तीला सांगितले. सर्व ऐकून ती म्हातारी व्यक्ती म्हणली, " मला तुझी समस्या कळलेली आहे, आणी मला वाटत मी तुला निश्चितच काही तरी मदत करू शकेन" . त्या म्हातारया व्यक्तीने त्या उद्धयोजकाचे नाव विचारले, खिशातून चेकबुक काढून त्याचे नावे एक चेक लिहून सही करून त्याचे हातात दिला आणी म्हणला, " हे पैसे असू दे, एक वर्षानंतर ह्याच दिवशी, ह्याच जागी आणी ह्याच वेळी तू मला भेट आणी मी दिलेले पैसे मला परत कर" . आणी तो जसा आला तसाच एक क्षणात पुढे काहीही ना बोलता निघून गेला आणी गायब झाला. उद्ध्योजाकाने कुतूहलापोटी तो चेक पहिला, त्याचे नावाने ५ लाख डॉलर चा तो चेक होता, सही च्या काही टायीप केलेले नाव होते, " डॉ. जॉन डी रॉकफेलर" , जगातील प्रसिद्ध अशी एक श्रीमंत व्यक्ती. ह्या पैशाने माझ्या सर्व आर्थिक विवंचना दूर होतील आणी माझा व्यवसाय पुन्हा नव्या जोमाने मला सुरु करता येईल, ह्याची जाणीव होवून तो आतिशय उत्साहित झाला. व्यवसायातील समस्या दूर करून अभिनव संकल्पना राबवून आपला व्यवसाय नजीकच्या कालावधीत आर्थिक दृष्ट्या कसा संपन्न करता येईल ह्याचे एक स्पष्ठ चित्र त्याच्या डोळ्यासमोर उभे राहिले. अगदी खूपच गरज भासली तरच हा चेक वटवून त्या पैश्याचा मी उपयोग करेन ही खुणगाठ मनाशी बांधून त्याने तो चेक एका पेटीत ठेवून दिला. गरज भासली तर आपल्याजवळ पैसा उपलब्ध असेल ह्या उत्साहाने, व्यवसायातील बारीक सारीक बाबींचे अतिशय सूक्ष्म अवलोकन करून, एक निश्चत आराखडा तयार करून नव्याने व्यवसायाला सुरवात केली. ज्या व्यवसायाच्या बाबीत तोटा होत आहे त्या बंद करून ज्या बाबीत आपणास नफा होऊ शकेल त्याच बाबी करण्याचा एक सकारात्मक दृष्ट्कोन ठेवून, नव्या उत्साहाने व्यवसाय सुरु केला. छोट्या छोट्या बाबीतून थोडासा फायदा, ह्या फायद्याचे योग्य कार्य नियोजन, असे करत करत सहा महिन्यातच त्याचे नुकसान भरून निघाले. पुढे अधिक उमेदीने व्यवसाय करून, एका वर्षात त्याच्या व्यवसायात भरभराट होवून त्याला भरपूर पैसा मिळाला.

वर्षाचे शेवटी, पेटीतील तसाच ठेवून दिलेला चेक बाहेर काढून, ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळी, त्याच बगीच्यात तो चेक परत करण्या साठी त्या म्हातारया व्यक्तीला भेटण्याकरिता तो गेला. ठरलेल्या वेळी ती म्हातारी व्यक्ती देखील उपस्थित झाली. संपूर्ण वर्षातील आपली यशोगाथा सांगून, त्या व्यक्तीचा चेक वापस करून त्याचे आभार व्यक्त करण्यासाठी तो बोलण्यास सुरवात करणार तेवढ्यातच एक नर्स धावत आली. त्या म्हातारया व्यक्तीचा हात धरून म्हणली, " परमेश्वरा, तुझे आभार मानते, हे म्हातारे आजोबा आज लवकरच सापडले, खूप शोधावे नाही लागले", आणी ती नर्स त्या व्यावसायिकाला म्हणली, " मी आपली क्षमा मागते, ह्या आजोबांनी आपणाला त्रास तर नाही ना दिला?, हे आजोबा जवळच एका वृद्धाश्रमात राहतात, असेच मधून मधून कोणालाही न सांगता निघून जातात, बागेत लोकांना भेटतात आणी मी डॉ. जॉन डी रॉकफेलर आहे असे सांगत असतात" . आणी आजोबांचा हात धरून ती नर्स निघून गेली.

त्या व्यावसायिकाला तर आश्चर्याचा धक्काच बसला, संपूर्ण मन आणी शरीर बधीर झाल्यासारखे वाटले त्याला. आवश्यकता भासल्यास आपणाजवळ ५ लाख डॉलर आहेत ह्या एकाच धीरामुळे, नव-नवीन कार्य योजना आखून, त्यांची अंमलबजावणी करून आपण तोट्यात असणारा उद्योग फायदेशीर करू शकलो, त्याचे त्यालाच आश्चर्य वाटले. आणी अचानक त्याला जाणीव झाली, हा पैसा किंवा पैसा जवळ असल्याची केवळ भावना, तो आपण न वापरता, स्वकर्तुत्वावर, सकारात्मक दृष्टीकोन ठेवून केलेलीकार्य योजना आणी त्याची योग्य अंमलबजावणी हेच आपल्या यशाचे गमक होते. आणी सहजच मनात एक विचार देखील आला, " जर त्या दिवशी आपण तो चेक आपल्या खात्यात जमा केला असता आणी ते पैसे आपल्या खात्यात जमा न झाल्याचे दुसऱ्या दिवशी आपणास कळले असते तर?"

Saturday, June 4, 2011

मनसरोवर - कैलाश परिक्रमा


मनसरोवर - कैलाश परिक्रमा
ब्रह्म देवाच्या मनात निर्माण झालेले आणी त्यांनी प्रत्यक्ष्यात साकार केलेले "मनसरोवर". चीन च्या तिबेट प्रांतातील कैलाश पर्वताच्या पायथ्याशी, समुद्र सपाटीपासून ४५८० मीटर उंचीवर असणारे गोड्या पाण्याचे मनसरोवर म्हणजे जगातील एक आश्चर्यच. ८८ किलोमीटर चा परीघ आणी ३०० फुट खोली, साधारणपणे गोलाकार असणारे आणी निळसर रंगाचे पाणी असणारे हे सरोवर. राजहंस ह्या पक्ष्यांचे निवासस्थान. सतलज, ब्रह्मपुत्रा आणी इतर महत्वाच्या नद्यांचे उगमस्थान. हिंदू, बौद्ध आणी जैन ह्या धर्मांचे एक धार्मिक स्थळ. आणी मनसरोवर पासून पुढे ५३ किलोमीटर ची कैलाश पर्वताची परिक्रमा. बहुतांशी पायी किंवा घोड्यावर ही परिक्रमा करावी लागते आणी ह्या परीक्रमेस ३ दिवस लागतात. परिक्रमा करताना ४५८० मीटर उंचीवरून पुढे ६५८० मीटर उंचीवर जावून पुन्हा मनसरोवरला परत आल्यानंतर ही परिक्रमा पूर्ण होते. कैलाश पर्वत म्हणजे भगवान शंकरांचे निवास्थान. अतिशय कठीण अशी ही परिक्रमा आणी ही परिक्रमा पूर्ण केल्यास कळत नकळत केलेल्या पापांची मुक्ती होते ही धारणा.

नागपूर येथील आम्ही ७५ मित्र मंडळींची चमू ८ जून पासून ह्या यात्रेला निघून २४ जून ला वापस येणार. त्यामुळे माझ्या ब्लॉग द्वारे ह्या कालावधीत आपणाशी संपर्क साधू शकणार नाही. परंतू परत आल्यानंतर यात्रेत आलेले अनुभव निश्चितच आपणाशी माझ्या ब्लॉग द्वारे share करणार. आपल्या सर्वांच्या शुभेछ्या सोबत घेवून यात्रेला प्रयाण करीत आहो.

Wednesday, June 1, 2011

विश्वास


एका प्रसिध्द मंदिरातील एक सफाई कामगार. अतिशय श्रद्धेने आणी प्रामाणिकपणे तो सतत आपले काम करीत असायचा. रोज तो हजारो श्रद्धाळू, देवाचे दर्शन घेताना बघायचा. त्याला सतत वाटायचे, एकाच जागेवर उभे राहून रोज हजारो भाविकांना दर्शन देताना देव किती थकून जात असणार? एक दिवस मोठी हिम्मत करून अगदी निरागसपणे त्याने देवाला विचारले," हे देवा, रोज एकाच जागेवर सतत उभे राहून तू किती थकत असणार? एक दिवस तरी मला तुझ्या जागेवर उभे राहू दे ना? त्यामुळे तुला थोडातरी आराम मिळेल" देव म्हणाला, काहीच हरकत नाही, मी तुला माझेच रूप देतो आणी तू माझ्या जागेवर उभा राहा, पण, एक गोष्ट मात्र ध्यानात ठेव, फक्त माझ्या जागेवर माझ्याच रुपात उभे राहावयाचे आणी दर्शनाकरिता येणाऱ्या भाविकांना मंद हास्य करून आशीर्वाद दिल्या सारखे हावभाव चेहऱ्यावर ठेवावयाचे, काहीही बोलवायचे मात्र नाही. माझ्यावर विश्वास ठेव, दर्शनाकरिता येणाऱ्या प्रत्येक भाविकाची काय विनंती आहे आणी त्याला काय आशीर्वाद द्यावयाचे ह्या सर्वांचा आराखडा माझ्याजवळ नेहमीच तयार असतो आणी त्यानुसार कोणाला काय द्यावयाचे हे मी ठरवत असतो. तू मात्र काहीही बोलायचे नाहीस" सफाई कामगाराने देवाची ही सूचना मान्य केली.

दुसरया दिवशी प्रत्यक्ष देवाच्या जागेवर हा सफाई कामगार देवाच्याच रुपात उभा राहिला. थोड्या वेळाने एक अतिशय श्रीमंत व्यक्ती दर्शनासाठी आली. दान पेटीत भरपूर दान टाकले आणी धंद्यात अधिकाधिक भरभराट व्हावी म्हणून आशीर्वाद देण्याची देवाला प्रार्थना केली. जाताना अनवधानाने त्याचे पैस्याचे पाकीट देवासामोरच राहून गेले. देवाने काहीही बोलवायचे मात्र नाही ही ताकीद दिलेली असल्यामुळे देवाच्या रुपात असणारा हा सफाई कामगार, बोलण्याची अनिवार इच्छा होवूनही शांतपणे उभा राहिला. नंतर एका गरीब व्यक्तीने देवाचे दर्शन घेतले, जवळील एक नाणे दानपेटीत टाकले आणी प्रार्थना केली, " हे देवा, फक्त एवढेच नाणे मी तुझ्या चरणी अर्पण करू शकतो, परंतू तुझी सतत सेवा करण्याची संधी मात्र मला लाभू दे. हे देवा, माझे कुटूंब फारच अडचणीत आहे, परंतू माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणी ह्या अडचणीच्या कालावधीतून बाहेर निघण्याकरिता तुझ्या जवळ निश्चितच काहीतरी मार्ग असणार आणी त्या प्रमाणे तू मला योग्य मार्गदर्शन करशील ह्याची मला खात्री आहे". डोळे बंद करून देवाची प्रार्थान केल्यानंतर त्याने डोळे उघडले आणी श्रीमंत व्यक्तीचे विसरलेले पैशाने भरलेले पाकीट त्याला डोळ्यापुढे दिसले. देवाने आपले गाऱ्हाणे ऐकून आपणाला हा प्रसाद दिलेला आहे हे समजून पुन्हा एकदा देवाचे आभार मानून पैशाचे पाकीट घेऊन तो निघून गेला. डोळ्यापुढे हे सर्व चाललेले बघूनही देवाच्या रूपातील सफाई कामगार काहीच बोलू शकला नाही.

लगेचच एक खलाशी दर्शनाकरिता आला. बोटीने खूप लांबच्या प्रवासाला जावयाचे असल्यामुळे, पुढील प्रवास सुरळीत व्हावा म्हणून तो डोळे बंद करून देवाची प्रार्थना करीत होता. आणि नेमके त्याच वेळी पैश्याचे पाकीट चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर ती श्रीमंत व्यक्ती सोबत पोलिसाला घेऊन मंदिरात दाखल झाली. खलाश्याला तेथे पाहून त्यानेच पैशाचे पाकीट चोरले असावे असे समजून त्या श्रीमंत व्यक्तीने खलाश्याला अटक करण्याची सूचना पोलिसाला दिली. खलाशी चोर नसून खलाश्याच्या पूर्वी मंदिरात आलेल्या व्यक्तीने पाकीट नेलेले आहे असे सांगण्याची देवाच्या रुपात असणारया सफाई कामगाराची खूप इच्छा होत होती. पण खऱ्या देवाने सांगितले होते कि काहीच बोलावयाचे नाही. त्याचे पुढे मोठा यक्षप्रश्न निर्माण झाला. श्रीमंत व्यक्तीने देवाचे आभार मानले आणी पोलीस खलाश्याला घेवून जाण्यास निघाले. सफाई कामगाराला वाटले, अश्या प्रसंगी खरा देवही चूप राहिला नसता. शेवटी त्याच्याने राहवलेच नाही आणी देवाच्या रूपातील सफाई कामगाराच्या तोंडून देववाणी बाहेर पडली. " खरा चोर खलाशी नाही, तो नीरपराध आहे, गरीब व्यक्तीनेच पैशाचे पाकीट नेलेले आहे" देववाणी ऐकून, पोलिसाने खलाश्याला सोडून दिले. श्रीमंत व्यक्तीने पुन्हा नमस्कार करून देवाचे आभार मानलेत. रात्री खरे देव प्रकट झाले आणी त्यांनी सफाई कामगाराच्या रूपातील देवाला आजचा दिवस कसा गेला ह्याची विचारणा केली. आज मी एका नीरपराध खलाश्याला कसे वाचविले हे त्याने मोठ्या अभिमानाने देवाला सांगितले. देव मात्र ऐकून फार विचारात पडला. देव म्हणला " तुला बोलू नको म्हणून सांगितले होते, का बोललास, माझ्यावर तुझा विश्वास नव्हता काय? तुला मी आधीच सांगितले होते, कोणाला काय आशीर्वाद द्यावयाचे ह्या सर्वांचा आराखडा माझ्याजवळ नेहमीच तयार असतो आणी त्यानुसार कोणाला काय द्यावयाचे हे मी ठरवत असतो. तू मात्र काहीही बोलायचे नाहीस". तुझ्या बोलण्यामुळे बघ कसा गोंधळ झाला" आणी नंतर देवाने त्याला सांगितले. देव म्हणाला, " अरे, त्या श्रीमंत व्यक्तीने लबाड्या करून खूप धन कमावले आहे, ह्या सर्व खोट्या मार्गाने कमावलेला पैसा, त्यातील काही अंश त्याने दान पेटीत टाकला, त्याच्या पाकिटात देखील खोट्या कमाईचेच पैसे होते. ती गरीब व्यक्ती मात्र माझी परम भक्त आहे, अगदी शेवटचे शिल्लक असणारे नाणे देखील त्याने मोठ्या भक्तीभावाने दान पेटीत टाकले आणी म्हणूनच ह्या पाकिटातील पैश्याची त्यालाच जास्त गरज असल्यामुळे ते पाकीट उचलण्याची इच्छा मीच त्याच्या मनात निर्माण केली. खलाशी तर नीरपराधी होताच आणी तो देखील माझा एक परम भक्त होता. आज तो ज्या बोटीने प्रवास करणार होता ती बोट रात्री वादळात सापडून बुडणार होती. त्याला जर पोलिसाने अटक करून रात्रभर जेल मध्ये ठेवले असते तर आज तो प्रवासाला निघू शकला नसता आणी त्याच जीव वाचला असता. आणी हे सर्व माझ्या भक्तांकरिता मीच केलेली उपाययोजना होती. त्या गरीब व्यक्तीस मिळालेल्या पैश्याचा त्याने निश्चितच सदूपयोग केला असता ". परंतु तू मात्र थोडासाही संयम पळू शकला नाहीस आणी सर्व गोंधळ करून ठेवलास" "माझा भक्त म्हणवतोस, माझ्या दिवसभर उभे राहण्याचे तुला वाईट वाटत होते, पण, मी सांगितलेल्या गोष्टीवर मात्र तू विश्वास ठेवला नाहीस"

Friday, May 20, 2011

तीन इच्छा


अलेक्झांदर एक महान जगज्जेत्ता. जवळजवळ संपूर्ण जग जिंकून आपल्या सैन्यासह माघारी आपल्या देशात परतत होता. वापस जाताना तो अतिशय गंभीर आजारी झाला. अनेक उत्कृष्ट उपाय करूनही आजारातून बरे होण्याची कोणतीही लक्षणे दिसत नव्हती. जिंकलेले संपूर्ण साम्राज्ज्य, एवढी मोठी शूर सेना, आपली जगज्जेती तीक्ष्ण तलवार आणी अमाप संपत्ती, ह्या सर्वांचा त्याग करून आपणाला आता मृत्त्युला सामोरे जावे लागणार ह्याची त्याला जाणीव झाली. आपण आता कोणत्याही परिस्थितीत जिवंत आपल्या मायदेशी पोहचू शकत नाही हे त्याला कळून चुकले. मृत्त्युच्या शेवटच्या घटका मोजत असताना त्याने आपल्या सरदाराला पाचारण केले आणी म्हणाला " मी आता लवकरच हे जग सोडून निघून जाणार आहो, माझ्या तीन इच्छा आहेत आणी त्या पूर्ण करण्याची तुमची जबाबदारी आहे" सरदाराला साश्रूपूर्ण होय म्हणण्याशिवाय गत्त्यंतर नव्हते. अलेक्झांदर म्हणाला:

१. माझी पहिली इच्छा " माझ्या खाजगी डॉक्टरनेच माझी शवपेटिका एकट्यानेच उचलून न्यावी"
२. माझी दुसरी इच्छा " माझी शवपेटिका स्मशानभूमीवर नेण्याच्या संपूर्ण रस्त्यावर मी आतापर्यंत जिंकलेले सर्व सोने, चांदी, जडजवाहीर पसरून ठेवावे"
३. आणि माझी अंतिम इच्छा " माझे दोन्ही हात शवपेटिकेच्या बाहेर काढून लोंबकळत ठेवावे"

आपला राजा आपणाला कायमचे सोडून जाणार, सर्व सेना अतिशय दुखी झाली. सरदाराने इच्छा पूर्ण करण्याचे आश्वासन दिले, तरी देखील हिम्मत करून प्रश्न विचारला " हे राजन, ह्या कसल्या विचित्र इच्छा", राजाने एक दीर्घ श्वास घेतला आणी म्हणाला "माझ्या आयुष्यात मी जे काही आता शिकलो ते सर्व जगाला माहित व्हावे म्हणूनच ह्या तीन इच्छांची पूर्तता करणे गरजेचे आहे"
माझ्या खाजगी डॉक्टरनेच माझी शवपेटिका एकट्यानेच उचलून न्यावी ह्यातून मला जगाला एक संदेश द्यावयाचा आहे. जगातील कोणीही उत्कृष्ट डॉक्टर देखील तुम्हाला मरणापासून वाचवू शकत नाही. मरण हे अंतिम सत्य आहे. त्यामुळे जीवन हे गृहीत न धरता ते चांगल्या प्रकारे कोणालाही न दुखावता कसे जगता येईल हा प्रत्येकाने प्रामाणिकपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे.
जगज्जेत्ता म्हणून नावलौकिक प्राप्त करण्यासाठी मी आयुष्यभर सतत लढाया केल्या, अपार संपत्ती गोळा केली, पण मरताना मात्र मी काहीच घेवून जाणार नाही, म्हणूनच माझी दुसरी इच्छा " माझी शवपेटिका स्मशानभूमीवर नेण्याच्या संपूर्ण रस्त्यावर मी आतापर्यंत जिंकलेले सर्व सोने, चांदी, जडजवाहीर पसरून ठेवावे" केवळ संपत्ती कोणत्याही प्रकारे जमविणे म्हणजेच जीवन नाही हा संदेश लोकांना मिळेल आणी अशी संपत्ती मिळण्यासाठी केलेली धावाधाव म्हणजेच जीवनातील अमुल्य वेळेचा कालापव्य.
जनतेला कळू द्या मी रिकाम्या हातानेच ह्या जगात आलो आणी रिकाम्या हातानेच हे जग सोडून जात आहो, म्हणून माझी तिसरी इच्छा " माझे दोन्ही हात शवपेटिकेच्या बाहेर काढून लोंबकळत ठेवावे" हे सर्व सांगून थोड्याच वेळात त्याचा मृत्त्यू झाला.

बर्याच लोकांनी ही कथा वाचलेली किंवा ऐकलेली असेल. मी देखील ही इंग्रजी कथा वाचली, मुळ लेखकाचे नाव लिहिलेले नव्हते, तरी देखील मुळ लेखक ज्याने ही कथा लिहिली असेल त्याची परवानगी गृहीत धरून मराठीत केलेले भाषांतर आपणापुढे सदर करीत आहो. ह्या कथेचा भावार्थ:
आपले आरोग्य आपल्याच हातात आहे, त्याची योग्य काळजी घ्या.
जमविलेल्या संपत्तीचा आपल्या आनंदासाठी आणी लोकांच्या भल्यासाठी उपयोग करून त्यातून जर आपणाला समाधान मिळत असेल तरच ह्या मिळकतीचा उपयोग.
आपण आपल्या स्वतः करिता जीवनात जे काही केले असेल ते आपल्या मृत्त्यू सोबतच जाळले जाते, दफन केले जाते, परंतू इतरांसाठी काही चांगले केले असल्यास आपल्या मृत्त्यू नंतरही आपण लोकांच्या हृदयात जिवंत असता.
चांगल्या कार्याची लोकांना सतत आठवण राहील असे कार्य करून मृत्त्युला आनंदाने सामोरे जा.

Saturday, April 23, 2011

आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोहे


" आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोहे" मराठीतील एक अतिशय चाकोरीबाहेर विचार करणारे कवी, संगीतकार, गायक श्री. अवधूत गुप्ते ह्यांचे हे एक प्रसिद्ध गीत. ह्या गीताचे लेखक अवधूत नसून दुसरे कोणी असल्यास मी त्यांची माफी मागतो. कारण अवधूत गुप्तेचेच म्हणून हे गाणे प्रसिद्ध आहे. "सनई चौघडे " ह्या मराठी चित्रपटातील हे गीत. "आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोहे" ह्या संपूर्ण गीतातील ह्या चार शब्दांचा अर्थ काय असावा ह्याचा अनेक दिवसांपासून विचार करतोय. संपूर्ण गीत ऐकल्यानंतरही ह्या चार शब्दांचा काय अर्थ असेल, केवळ सुंदर चाल, सुंदर आवाजातील गीत आणी गायक अवधूत गुप्ते म्हणून तर हे गीत इतके लोकप्रिय झालेले नसेल ना? अर्थ मात्र मनाशी तदात्य्म होण्यासारखा सापडतच नव्हता. आणी, आज पुन्हा मनाशीच हे गीत गुणगुणताना ह्या चार शब्दांचा मला समजलेला अर्थ:

" आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोहे" , कांदेपोहे खाताना आणी ते आपणाला आवडणारे असे झाले असतील तर त्याची चव काही काळतरी आपल्या जिभेवर रेंगाळत असते आणी त्या कालवधीत त्या कान्देपोह्याची आपण पुन्हा पुन्हा आठवण काढून आनंदी, सुखी होतो, हा आनंद आणी हे सुख आपण इतरांशी देखील भरभरून share करतो. अश्याच प्रकारे आपणाला जाणवणारे सुखाचे क्षण आपल्या आयुष्यात येत राहतात, पुढील आयुष्य जगण्याची एक नवी उमेद आपणाला देत राहतात आणी एक सकारात्मक दृष्टीकोन ठेवून आपण आपले आयुष्य जगत असतो. किंबहुना असलेच क्षण/प्रसंग जीवन जगण्यासाठी संजीवनी ठरत असतात. कांदेपोहे आणी आयुष्य, म्हणजेच जीवनात येणारे छोटे छोटे सुखाचे क्षण आणी त्यात मिळणारा आनंद, हा कदाचित ह्या चार शब्दातून मिळणारा संदेश असावा.

परंतु, कांदेपोहे, त्याची चव, खाताना मिळणारा आनंद आणी नंतर काही कालावधीपर्यंत रेंगाळत राहणारी चव, चांगल्या आठवणी, ह्या फक्त सकृतदर्शनी नाहीत काय? ह्या उत्कृष्ठ कांदेपोह्यांची पार्श्वभूमी आपण कधी जाणून त्याचे विश्लेषण करण्याचा करण्याचा प्रयत्न करतो काय? कांदेपोहे म्हणजे आयुष्यातील एक अविस्मरणीय चांगला क्षण. पण, हा चांगला क्षण कश्यामुळे निर्माण होऊ शकला, त्यासाठी कोणी कोणी प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष प्रयास केलेत हे मात्र आपण सोयीस्करपणे विसरून जातो. " आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोहे" ह्या ओळीतील चूल आणी कढई, आयुष्यातील ह्या दोन शब्दांचा आपण कधी विचार केलाय काय? कांदेपोहे म्हणजे आयुष्यातील एक चांगला, आठवणीत राहणारा क्षण, पण, हा क्षण अविस्मरणीय होण्यासाठी चूल आणी कढई तेवढीच महत्वाची नाही काय? कदाचित कांदेपोहे करणारी व्यक्ती फार सुगरण असलेही, पण जेवढे कांदेपोहे करावयाचे आहे हे ध्यानात ठेवून त्यासाठी नेमकी आवश्यक आकाराची कढई नसल्यास,व्यवस्थित परतून हे कांदेपोहे चांगले झाले असते काय? आणी " चूल"?, कांदेपोहे करणारी व्यक्ती सुगरण, कढई देखील योग्य आकाराची, मग चुलीचे काय महत्व? कांदेपोहे स्वादिष्ठ होण्यासाठी, त्याला योग्य प्रमाणात आच उष्णता मिळण्यासाठी, ते योग्य प्रमाणात शिजण्यासाठी, " चूल" देखील तेवढीच महत्वाची नाही काय?, आणी ही उष्णता निर्माण करताना जाळून राख होणारी ती लाकड?

म्हणजेच काय तर कांदेपोहे हा जीवनातील एक अविस्मरणीय चांगला क्षण असेल तर, फक्त कान्देपोह्याची उत्कृष्ठ चव किंवा ते करणारी सुगरण व्यक्ती, फक्त ह्याचा विचार न करता, ह्या अविस्मरणीय चांगल्या क्षणासाठी कारणीभूत ठरणाऱ्या, परंतू सकृतदर्शनी न जाणवणाऱ्या बाबींचा देखील आपण विचार केल्यास आयुष्यातील हा एक अविस्मरणीय चांगला क्षण अधिक काळ पर्यंत आपणाला आठवत राहील आणी विचारांची, वर्तणुकीची एक वेगळीच दिशा आपणास देत राहील आणी खऱ्या अर्थाने आपणाला "चूल" आणी "कढई" ह्या दोन शब्दांचा अर्थ आणी त्याचे महत्व कळेल. आणी सर्वात महत्वाचे म्हणजे, ह्या सुंदर क्षणासाठी कोठेही उल्लेख न झालेली, राख झालेली ती लाकड?, स्वतः जाळून नाहीशी झालेली ती लाकड आणी त्यांचा त्याग, ह्याचाही विचार केल्यास " आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोहे" ह्या चार शब्दांचे, आयुष्याच्या आठवणीतील चांगल्या क्षणाचे महत्व बरेच काल पर्यंत आपल्या स्मरणात राहील.

Thursday, April 7, 2011

दमलेल्या बाबाची.......

३ मुले आणी आई वडील असे हे कुटूंब. परिस्थिती अतिशय मध्यमवर्गीय. वडील एका कंपनीत लेखापाल ह्या पदावर. कुटुंबाचा खर्च जेमतेम भागेल एव्हडेच मासिक उत्पन्न. आपले मासिक उत्पन्न वाढविण्याकरिता आणी पदोन्नतीसाठी किमान पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे ह्याची वडिलाना जाणीव. दिवसभर काम करून संध्याकाळच्या कॉलेज मध्ये जाऊन, घरी वापस आल्यानंतर पुन्हा अभ्यास. ध्येय एकाच,आपल्या मुलांना चांगल्यात चांगल्या परीस्तीतीत ठेवण्यासाठी कोणतीही मेहनत करण्याची तयारी. ह्या सर्व ओढाताणीत, मुलांशी खेळण्यासाठी, बोलण्यासाठी, एकत्रित जेवण्यासाठी, पत्नीशी देखील बोलण्यासाठी वेळच नाही. आपले उज्वल भविष्य आणी त्याकरिता करावी लागणारी मेहनत, एव्हडेच विचार सतत डोक्यात. मेहनत करून पदवी परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केल्यानंतर पदोन्नती आणी पगारवाढ. घरची आर्थिक परिस्थिती थोडी सुधारलेली. तरी देखील अधिक सुधारण्याकरिता पुन्हा पदव्युत्तर परीक्षेची तयारी आणी सतत काम. नंतर अधिकारी ह्या पदावर पदोन्नती, पुन्हा पगारवाढ. दोन खोल्यांच्या घरातून ३ खोल्यांच्या घरात स्थानांतर. मुलांचे उत्तम भावित्तव्य घडविण्यासाठी, घरातील सर्वाना उत्तमात उत्तम सुविधा प्राप्त होण्यासाठी पुन्हा उच्च शिक्षण, पुन्हा कंपनीत फार मोठ्या पदावर पदोन्नती. सतत मेहनत आणी कामात व्यग्र ह्यामुळे ८-८ दिवस मुलांशी, पत्नीशी बोलणे देखील होत नव्हते. मुलांची आणी पत्नीची, बाबाशी/पतीशी बोलणेच होत नाही ही सततची तक्रार आणी ठराविक उत्तर, "मी ही सर्व मेहनत कोणासाठी करीत आहो?". आर्थिक परिस्थितीत अधिक सुधारणा झाल्यानंतर, स्वतः चा ५ खोल्यांचा ब्लॉक, पत्नीला कामात त्रास होऊ नये म्हणून दोन घरगड्यांची नियुक्ती, मुलांना उत्तमात उत्तम कॉलेज मध्ये दाखला, त्यांना कॉलेज मध्ये जाण्यासाठी कार आणी वाहनचालक.

नंतर कंपनीच्या सर्वात जेष्ठ पदावर पदोन्नती. समुद्रकिनारी, मुलांसाठी, पत्नी साठी नवीन बंगल्याची खरेदी. जेवढे मोठे पद तेव्हडीच कामाची जास्त व्यग्रता, सततचे दौरे, प्रवास आणी आपण सुरवातीला जे काही ठरविले होते ते सर्व आपल्या मुलांना मिळत आहे हे बघून धन्न्यता. परंतु वडील मात्र आपल्या पासून फार दुरावलेले आहेत, त्यांना आपणासाठी काहीच वेळ नाही ही मुलांची सततची तक्रार, पत्नीचीही हीच तक्रार. परिवारात एकत्रित संवादाचा संपूर्ण अभाव.

वडील, वय वर्षे ५५, संध्याकाळी चुकून लवकर घरी आले. मुले बाहेर गेलेली, पत्नी देखील मैत्रिणीसोबत बाहेर गेलेली. बंगल्यातील बाल्कनीत बसून चहा पीत समुद्र किनार्याचे अवलोकन. निसर्ग इतका सुंदर आहे ह्याची प्रथमच जाणीव झालेली. मनात अनेक विचार आणी आयुष्याचा संपूर्ण चित्रपट डोळ्यापुढे. आयुष्याच्या ह्या कुतरओढीत सर्व ऐहिक सुख प्राप्त केले, पण खऱ्या अर्थाने जीवन मात्र जगावयाचे राहूनच गेले. मुले, पत्नी दुरावलेली, काय मिळविले आयुष्याच्या ह्या संध्याकाळी. डोळ्यात दोन अश्रू आलेत आणी निर्धार केला. बस झाली ही धावाधाव, उद्यापासून प्रत्येक क्षण मुलांसाठी, पत्नीसाठी जगायचा. रात्री मुले, पत्नी घरी आलीत. अनेक वर्षानंतर सर्वांनी एकत्र जेवण केले, खूप गप्पा मारल्यात आणी वडिलांनी आपली चूक काबुल केली. सर्वाना हा एक सुखद धक्काच होता. वडिलांनी जाहीर केले, उद्यापासून सकाळी आपण सर्व समुद्रकिनारी फिरायला जावू , रोज संध्याकाळी मी लवकर घरी येईन, एकत्रित सर्वांनी जेवण करायचे, खूप गप्पा मारायच्या, शनिवार, रविवार संपूर्ण कुटुंबासाठी, आता ह्यापुढील सर्व आयुष्य फक्त आणी फक्त कुटुंबासाठीच. घरात प्रथमच अतिशय आनंदी वातावरण, आणी ह्याच आनंदी वातावरणात सर्व झोपायला गेलेत.

सकाळी ५.३० वाजता फिरायला जाण्यासठी मुलाने वडिलांच्या खोलीचा दरवाजा ठोठावला, दरवाजा उघडाच होता, वडील पलंगावर झोपलेले होते, वडिलांना उठविण्याचा मुलाने प्रयत्न केला, पण रात्रीच वडिलांची प्राणज्योत मालविलेली होती. वडिलांसाठी, कुटुंबासाठी ही सुंदर सकाळ झालेलीच नव्हती.

बहुदा अनेकांनी वाचलेली किंवा ऐकलेली ही कथा, परंतू जीवनात कोणत्या वेळी कशाला प्राधान्य द्यावे, बरेच काही आपणाला अंतर्मुख होवून विचार करावयास लावणारी.

Tuesday, March 29, 2011

प्रसंगावधान


१९७९ मध्ये मी नागपूर जिल्ह्यातील कचारीसावंगा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी ह्या पदावर कार्यरत होतो. डॉ. सपकाळ आमचे जिल्हा आरोग्य अधिकारी. एक वादग्रस्त व्यक्तिमत्व, पण खऱ्या अर्थाने व्यवस्थापन कौशल्य शिकावयाचे झाल्यास त्यांचे कडून शिकावे असे डॉ. सपकाळ. वेळप्रसंगी प्रशासनातील कायदे, नियम बाजूला सारून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना सतत मदत करणारे. त्यांचे दौरे मात्र संध्याकाळचे. संध्याकाळी ४-५ वाजता प्राथमिक आरोग्य केंद्रात २-३ मित्रांसोबत येणार, कामाची तपासणी, चर्चा केल्यानंतर मुक्काम करणार आणी दुसऱ्या दिवशी सकाळी नागपूरला परत जाणार. एकदा असेच सकाळी नागपूरला परत जाताना मलाही काही काम असल्यामुळे त्यांचेसोबत जाण्याची त्यांना विनंती केली आणी त्यांचेसोबत नागपूरला निघालो. त्याकाळी जिल्हा आरोग्य अधिकार्याची पांढरी raunold कार सर्वाना माहित असावयाची. कारण इतर सर्व जिल्हा स्थरावरील अधिकाऱ्यांच्या वाहनापेक्षा ही कार एक वेगळीच होती. काटोल मार्गे आम्ही नागपूर ला जाण्यास निघालो. रस्त्यात कळमेश्वर हे प्राथमिक आरोग्य केन्द्र आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात आणी रस्त्यावर २००-३०० माणसांची गर्दी. जिल्हा आरोग्य अधिकार्याची पांढरी कार बघून लोकांनी वाहन अडविले. स्थानिक वैध्यकीय अधिकार्याच्या विरोधात नारेबाजी सुरु केली. ही सर्व परिस्थिती का घडली त्याची पार्श्वभूमी:रात्री गावातील एक महिला प्रसुतीकारिता रुग्णालयात दाखल झाली. सकाळी तिची प्रसूती झाली आणी प्रसुतीनंतर तिला खूप रक्तस्त्राव सुरु झाला. वैध्यकीय अधिकार्यांनी तपासून काही जुजबी उपचार सुरु केलेत आणी अर्ध्या तासानंतर रक्तस्त्राव खूप प्रमाणात सुरूच असल्यामुळे आणी रुग्णाची सर्वसाधारण स्थिती गंभीर होत असल्यामुळे रुग्णांच्या नातेवायीकाना तिला तत्काळ नागपूर येथील वैध्यकीय महाविध्यालयात पुढील उपचारासाठी घेऊन जाण्याच्या सल्ला दिला. दुर्दैवाने त्यापूर्वीच रुग्णाचा मृत्त्यू झाला. थोड्याच वेळात १०-१२ लोक जमा झालेत. जनसमुदायाची नेहमीच आढळणारी मानसिकता. कोणत्याही परिस्थितीची शहानिशा न करता, डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे ही स्त्री दगावली, ही चुकीची बातमी वार्यासारखी गावात पसरली. १५-20 मिनीटातच १५०-२०० लोक गोळा झालेत. डॉक्टरच दोषी, मारा त्यांना, जाळून टाका हे केन्द्र, ही चर्चा आणी समुदायाची मानसिकता अधिकच भडकत गेली. डॉक्टरांनी घाबरून स्वतःला एक खोलीत कोंडून घेतले. दवाखान्यावर दगडे मारून काचा फोडल्या गेल्यात. आणी तेव्हाच आम्ही तेथे पोहचलो होतो. डॉ. सपकाळ हे जमावाच्या मध्यभागी गेलेत. कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. जमाव साहजिकच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तेवढ्यात २-३ लोकांनी रॉकेल च्या डबक्या देखील आणल्यात. बस.. जला दो, जला दो च्या घोषणा ऐकत येत होत्या. तेवढ्यात २-४ लोकांनी नारेबाजी सुरु केली, हे अधिकारी आता त्यांच्याच अधिकार्याला पाठीशी घालणार. "उनकी गाडी भी जला दो" जोर जोऱ्यात घोषणा सुरु झाल्यात. तेवढ्यात पोलीस ची गाडी ४-५ पोलिसांसह दवाखान्याच्या आवारात शिरताना दिसली. पोलिसांना बघून लोकांना अधिकच उधान आले, घोषणाबाजी सुरूच होती. आणी मग डॉ. सपकाळ ही काय चीज आहे ह्याची चुणूक दिसली. सर्वप्रथम त्यांनी पोलीस आणी त्यांची गाडी दवाखान्याच्या आवाराच्या बाहेर नेण्याचे आदेश दिलेत. एका माणसाच्या हातून रॉकेल चा डबा हिसकला, आणी कोणाच्याही लक्षात येण्यापुर्वीच स्वतःच्या गाडीवर आणी दवाखान्याच्या बाहेरील भिंतीवर डब्यातील रॉकेल भिरकविण्यास सुरवात केली. आणी आपल्या वाहन चालकास म्हणले " आन रे काडी पेटी, मीच प्रथम आग लावतो. लोकांना कळलेच नाही काय होतंय ते, क्षणात नारेबाजी थांबली. मग त्यांनी बोलण्यास सुरवात केली. त्या दुर्दैवी स्त्रीच्या मृत्यूस जर डॉक्टर जबाबदार असतील तर ह्या रुग्णालयाला मीच आग लावतो, तुम्ही कशाला तसदी घेता. नंतर, पोलीस इन्स्पेक्टर ला बोलावले, आतून डॉक्टर ला बाहेर काढले, पोलिसांना आदेश दिलेत, ह्या डॉक्टर विरुद्ध गुन्हा नोंदवून तत्काळ ह्यांना नागपूर ला पोलीस मुख्यालयी घेवून या. मला म्हणले, "देवा, १ तासात संपूर्ण निपक्षपाती चौकशी कर, कर्मचाऱ्यांचे, नातेवायीकांचे statements घे, आणी सर्व अहवाल तयार कर, तो पर्यंत मी येथेच थांबतो. लगेच नागपूर ला फोन करून वरिष्ठ अधिकार्याशी बोललेत. जमावाच्या मध्य भागी खुर्ची टाकून बसलेत आणी तेथेच स्थानिक लिपिकास डॉक्टरांचे निलंबनाचे आदेश टाईप करून आणण्याची सूचना दिली. स्वतःला अधिकार नसताना देखील ह्या आदेशावर स्वाक्षरी केली. सोबतच जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत येत आहे हे बघून त्यांचेही प्रभोदन करण्यास सुरवात केली. जमाव हळू हळू शांत झाला आणी ३० मिनीटातच जमावाची पांगापांग झाली. कधीही कल्पना देखील करू शकणार नाही असा हा मला आलेला अनुभव.२ तासानंतर आम्ही नागपूरला जाण्यास निघालो. मी म्हणलो, "सर, चौकशी अंती मला तरी डॉक्टर चा काहीच दोष दिसत नाही. उगाच आपण त्यांना निलंबनाची शिक्षा दिली आणी पोलिसांच्या गाडीत नागपूरला पाठविले" सर म्हणले, "जमावाला विवेकबुद्धी नसते, जमावाचे मानस शास्त्र जर आपण जाणले नसते तर कदाचित त्या क्षणी खरोखरच दवाखाना पेटवून दिला असता आणी डॉक्टरांना मारहाण देखील केली असती". दुपारी नागपूरला त्यांच्या कार्यालयात आलो तेंव्हा ते वैध्यकीय अधिकारी तेथेच बसले होते. फार घाबरले होते ते. डॉ. सपकाळ ह्यांनी त्यांना समजावून सांगितले, म्हणले तुम्ही निलाब्मित वगेरे काही झाला नाही आहात. तुमचा काहीच दोष नसल्यामुळे मी पूर्णपणे तुमच्या पाठीशी आहो. १५ दिवस आराम करा, परिस्थिती निवळेल, नंतर मीच तुम्हाला त्याच केंद्रात घेवून जायील. १५ दिवसांनी त्यांनी कळमेश्वर ला पंचायत समिती सभागृहात एक सभा बोलाविली. स्थानिक लोक प्रतिनिधी आणी इतर मान्यवर उपस्थित होते. डॉक्टर कसे बरोबर होते, त्यांचे काहीच चुकले नाही, दुर्दैवाने प्रसुतीपश्चात खूप रक्तस्त्राव झाल्यास ५-१० मिनिटात देखील मृत्यू होऊ शकतो, लोकांना समजावून सांगितले. तसेही त्या डॉक्टर बद्धल लोकांचे पूर्वमत चांगले असल्यामुळे त्यांना पुन्हा कामावर रुजू होऊ देण्यास कोणाचाच आक्षेप नव्हता. हेच डॉक्टर नंतर सेवानिवृत्त होत पर्यंत तेथेच होते आणी नंतर ही तेथेच स्थायिक झालेत.वरील प्रसंग, काय करावे, कसे वागावे, कोणत्याच व्यवस्थापनाच्या पुस्तकात ह्या बद्धल निश्चित सूचना नसतील. डॉक्टर सपकाळ ह्या प्रसंगी वागलेत ते योग्य कि अयोग्य, ह्यावर देखील चर्चा होऊ शकेल. परंतू त्या आकस्मिक स्थितीत त्यांनी दाखविलेले धैर्य, प्रसंगावधान आणी आपल्या अधिकार्याची चूक नाही तर त्याचे पाठीशी उभे राहणे, खरोखरच वाखाणण्यासारखे होते. केवळ डॉ. सपकाळ सारखी व्यक्तीच असे करू शकेल. परंतू, आकस्मिक स्थितीत लोकांच्या भावना अधिक न भडकावता, प्रसंगावधान दाखविणे कसे शक्य होते हे मात्र मी त्या प्रसंगातून शिकलो.