Wednesday, June 1, 2011
विश्वास
एका प्रसिध्द मंदिरातील एक सफाई कामगार. अतिशय श्रद्धेने आणी प्रामाणिकपणे तो सतत आपले काम करीत असायचा. रोज तो हजारो श्रद्धाळू, देवाचे दर्शन घेताना बघायचा. त्याला सतत वाटायचे, एकाच जागेवर उभे राहून रोज हजारो भाविकांना दर्शन देताना देव किती थकून जात असणार? एक दिवस मोठी हिम्मत करून अगदी निरागसपणे त्याने देवाला विचारले," हे देवा, रोज एकाच जागेवर सतत उभे राहून तू किती थकत असणार? एक दिवस तरी मला तुझ्या जागेवर उभे राहू दे ना? त्यामुळे तुला थोडातरी आराम मिळेल" देव म्हणाला, काहीच हरकत नाही, मी तुला माझेच रूप देतो आणी तू माझ्या जागेवर उभा राहा, पण, एक गोष्ट मात्र ध्यानात ठेव, फक्त माझ्या जागेवर माझ्याच रुपात उभे राहावयाचे आणी दर्शनाकरिता येणाऱ्या भाविकांना मंद हास्य करून आशीर्वाद दिल्या सारखे हावभाव चेहऱ्यावर ठेवावयाचे, काहीही बोलवायचे मात्र नाही. माझ्यावर विश्वास ठेव, दर्शनाकरिता येणाऱ्या प्रत्येक भाविकाची काय विनंती आहे आणी त्याला काय आशीर्वाद द्यावयाचे ह्या सर्वांचा आराखडा माझ्याजवळ नेहमीच तयार असतो आणी त्यानुसार कोणाला काय द्यावयाचे हे मी ठरवत असतो. तू मात्र काहीही बोलायचे नाहीस" सफाई कामगाराने देवाची ही सूचना मान्य केली.
दुसरया दिवशी प्रत्यक्ष देवाच्या जागेवर हा सफाई कामगार देवाच्याच रुपात उभा राहिला. थोड्या वेळाने एक अतिशय श्रीमंत व्यक्ती दर्शनासाठी आली. दान पेटीत भरपूर दान टाकले आणी धंद्यात अधिकाधिक भरभराट व्हावी म्हणून आशीर्वाद देण्याची देवाला प्रार्थना केली. जाताना अनवधानाने त्याचे पैस्याचे पाकीट देवासामोरच राहून गेले. देवाने काहीही बोलवायचे मात्र नाही ही ताकीद दिलेली असल्यामुळे देवाच्या रुपात असणारा हा सफाई कामगार, बोलण्याची अनिवार इच्छा होवूनही शांतपणे उभा राहिला. नंतर एका गरीब व्यक्तीने देवाचे दर्शन घेतले, जवळील एक नाणे दानपेटीत टाकले आणी प्रार्थना केली, " हे देवा, फक्त एवढेच नाणे मी तुझ्या चरणी अर्पण करू शकतो, परंतू तुझी सतत सेवा करण्याची संधी मात्र मला लाभू दे. हे देवा, माझे कुटूंब फारच अडचणीत आहे, परंतू माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणी ह्या अडचणीच्या कालावधीतून बाहेर निघण्याकरिता तुझ्या जवळ निश्चितच काहीतरी मार्ग असणार आणी त्या प्रमाणे तू मला योग्य मार्गदर्शन करशील ह्याची मला खात्री आहे". डोळे बंद करून देवाची प्रार्थान केल्यानंतर त्याने डोळे उघडले आणी श्रीमंत व्यक्तीचे विसरलेले पैशाने भरलेले पाकीट त्याला डोळ्यापुढे दिसले. देवाने आपले गाऱ्हाणे ऐकून आपणाला हा प्रसाद दिलेला आहे हे समजून पुन्हा एकदा देवाचे आभार मानून पैशाचे पाकीट घेऊन तो निघून गेला. डोळ्यापुढे हे सर्व चाललेले बघूनही देवाच्या रूपातील सफाई कामगार काहीच बोलू शकला नाही.
लगेचच एक खलाशी दर्शनाकरिता आला. बोटीने खूप लांबच्या प्रवासाला जावयाचे असल्यामुळे, पुढील प्रवास सुरळीत व्हावा म्हणून तो डोळे बंद करून देवाची प्रार्थना करीत होता. आणि नेमके त्याच वेळी पैश्याचे पाकीट चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर ती श्रीमंत व्यक्ती सोबत पोलिसाला घेऊन मंदिरात दाखल झाली. खलाश्याला तेथे पाहून त्यानेच पैशाचे पाकीट चोरले असावे असे समजून त्या श्रीमंत व्यक्तीने खलाश्याला अटक करण्याची सूचना पोलिसाला दिली. खलाशी चोर नसून खलाश्याच्या पूर्वी मंदिरात आलेल्या व्यक्तीने पाकीट नेलेले आहे असे सांगण्याची देवाच्या रुपात असणारया सफाई कामगाराची खूप इच्छा होत होती. पण खऱ्या देवाने सांगितले होते कि काहीच बोलावयाचे नाही. त्याचे पुढे मोठा यक्षप्रश्न निर्माण झाला. श्रीमंत व्यक्तीने देवाचे आभार मानले आणी पोलीस खलाश्याला घेवून जाण्यास निघाले. सफाई कामगाराला वाटले, अश्या प्रसंगी खरा देवही चूप राहिला नसता. शेवटी त्याच्याने राहवलेच नाही आणी देवाच्या रूपातील सफाई कामगाराच्या तोंडून देववाणी बाहेर पडली. " खरा चोर खलाशी नाही, तो नीरपराध आहे, गरीब व्यक्तीनेच पैशाचे पाकीट नेलेले आहे" देववाणी ऐकून, पोलिसाने खलाश्याला सोडून दिले. श्रीमंत व्यक्तीने पुन्हा नमस्कार करून देवाचे आभार मानलेत. रात्री खरे देव प्रकट झाले आणी त्यांनी सफाई कामगाराच्या रूपातील देवाला आजचा दिवस कसा गेला ह्याची विचारणा केली. आज मी एका नीरपराध खलाश्याला कसे वाचविले हे त्याने मोठ्या अभिमानाने देवाला सांगितले. देव मात्र ऐकून फार विचारात पडला. देव म्हणला " तुला बोलू नको म्हणून सांगितले होते, का बोललास, माझ्यावर तुझा विश्वास नव्हता काय? तुला मी आधीच सांगितले होते, कोणाला काय आशीर्वाद द्यावयाचे ह्या सर्वांचा आराखडा माझ्याजवळ नेहमीच तयार असतो आणी त्यानुसार कोणाला काय द्यावयाचे हे मी ठरवत असतो. तू मात्र काहीही बोलायचे नाहीस". तुझ्या बोलण्यामुळे बघ कसा गोंधळ झाला" आणी नंतर देवाने त्याला सांगितले. देव म्हणाला, " अरे, त्या श्रीमंत व्यक्तीने लबाड्या करून खूप धन कमावले आहे, ह्या सर्व खोट्या मार्गाने कमावलेला पैसा, त्यातील काही अंश त्याने दान पेटीत टाकला, त्याच्या पाकिटात देखील खोट्या कमाईचेच पैसे होते. ती गरीब व्यक्ती मात्र माझी परम भक्त आहे, अगदी शेवटचे शिल्लक असणारे नाणे देखील त्याने मोठ्या भक्तीभावाने दान पेटीत टाकले आणी म्हणूनच ह्या पाकिटातील पैश्याची त्यालाच जास्त गरज असल्यामुळे ते पाकीट उचलण्याची इच्छा मीच त्याच्या मनात निर्माण केली. खलाशी तर नीरपराधी होताच आणी तो देखील माझा एक परम भक्त होता. आज तो ज्या बोटीने प्रवास करणार होता ती बोट रात्री वादळात सापडून बुडणार होती. त्याला जर पोलिसाने अटक करून रात्रभर जेल मध्ये ठेवले असते तर आज तो प्रवासाला निघू शकला नसता आणी त्याच जीव वाचला असता. आणी हे सर्व माझ्या भक्तांकरिता मीच केलेली उपाययोजना होती. त्या गरीब व्यक्तीस मिळालेल्या पैश्याचा त्याने निश्चितच सदूपयोग केला असता ". परंतु तू मात्र थोडासाही संयम पळू शकला नाहीस आणी सर्व गोंधळ करून ठेवलास" "माझा भक्त म्हणवतोस, माझ्या दिवसभर उभे राहण्याचे तुला वाईट वाटत होते, पण, मी सांगितलेल्या गोष्टीवर मात्र तू विश्वास ठेवला नाहीस"
Subscribe to:
Post Comments (Atom)
Devachi lila samjavinari ek udbodhak ni marmik katha.
ReplyDeleteFor those who believe in God, a good moral story
ReplyDeletevery good story mama...mom also read it...liked it a lot..nicely written...:)
ReplyDeleteEvery situation, good or bad,is monitored by god. We must have faith in god.
ReplyDeleteR. P. Rokade