Tuesday, March 29, 2011

प्रसंगावधान


१९७९ मध्ये मी नागपूर जिल्ह्यातील कचारीसावंगा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी ह्या पदावर कार्यरत होतो. डॉ. सपकाळ आमचे जिल्हा आरोग्य अधिकारी. एक वादग्रस्त व्यक्तिमत्व, पण खऱ्या अर्थाने व्यवस्थापन कौशल्य शिकावयाचे झाल्यास त्यांचे कडून शिकावे असे डॉ. सपकाळ. वेळप्रसंगी प्रशासनातील कायदे, नियम बाजूला सारून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना सतत मदत करणारे. त्यांचे दौरे मात्र संध्याकाळचे. संध्याकाळी ४-५ वाजता प्राथमिक आरोग्य केंद्रात २-३ मित्रांसोबत येणार, कामाची तपासणी, चर्चा केल्यानंतर मुक्काम करणार आणी दुसऱ्या दिवशी सकाळी नागपूरला परत जाणार. एकदा असेच सकाळी नागपूरला परत जाताना मलाही काही काम असल्यामुळे त्यांचेसोबत जाण्याची त्यांना विनंती केली आणी त्यांचेसोबत नागपूरला निघालो. त्याकाळी जिल्हा आरोग्य अधिकार्याची पांढरी raunold कार सर्वाना माहित असावयाची. कारण इतर सर्व जिल्हा स्थरावरील अधिकाऱ्यांच्या वाहनापेक्षा ही कार एक वेगळीच होती. काटोल मार्गे आम्ही नागपूर ला जाण्यास निघालो. रस्त्यात कळमेश्वर हे प्राथमिक आरोग्य केन्द्र आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात आणी रस्त्यावर २००-३०० माणसांची गर्दी. जिल्हा आरोग्य अधिकार्याची पांढरी कार बघून लोकांनी वाहन अडविले. स्थानिक वैध्यकीय अधिकार्याच्या विरोधात नारेबाजी सुरु केली. ही सर्व परिस्थिती का घडली त्याची पार्श्वभूमी:रात्री गावातील एक महिला प्रसुतीकारिता रुग्णालयात दाखल झाली. सकाळी तिची प्रसूती झाली आणी प्रसुतीनंतर तिला खूप रक्तस्त्राव सुरु झाला. वैध्यकीय अधिकार्यांनी तपासून काही जुजबी उपचार सुरु केलेत आणी अर्ध्या तासानंतर रक्तस्त्राव खूप प्रमाणात सुरूच असल्यामुळे आणी रुग्णाची सर्वसाधारण स्थिती गंभीर होत असल्यामुळे रुग्णांच्या नातेवायीकाना तिला तत्काळ नागपूर येथील वैध्यकीय महाविध्यालयात पुढील उपचारासाठी घेऊन जाण्याच्या सल्ला दिला. दुर्दैवाने त्यापूर्वीच रुग्णाचा मृत्त्यू झाला. थोड्याच वेळात १०-१२ लोक जमा झालेत. जनसमुदायाची नेहमीच आढळणारी मानसिकता. कोणत्याही परिस्थितीची शहानिशा न करता, डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे ही स्त्री दगावली, ही चुकीची बातमी वार्यासारखी गावात पसरली. १५-20 मिनीटातच १५०-२०० लोक गोळा झालेत. डॉक्टरच दोषी, मारा त्यांना, जाळून टाका हे केन्द्र, ही चर्चा आणी समुदायाची मानसिकता अधिकच भडकत गेली. डॉक्टरांनी घाबरून स्वतःला एक खोलीत कोंडून घेतले. दवाखान्यावर दगडे मारून काचा फोडल्या गेल्यात. आणी तेव्हाच आम्ही तेथे पोहचलो होतो. डॉ. सपकाळ हे जमावाच्या मध्यभागी गेलेत. कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. जमाव साहजिकच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तेवढ्यात २-३ लोकांनी रॉकेल च्या डबक्या देखील आणल्यात. बस.. जला दो, जला दो च्या घोषणा ऐकत येत होत्या. तेवढ्यात २-४ लोकांनी नारेबाजी सुरु केली, हे अधिकारी आता त्यांच्याच अधिकार्याला पाठीशी घालणार. "उनकी गाडी भी जला दो" जोर जोऱ्यात घोषणा सुरु झाल्यात. तेवढ्यात पोलीस ची गाडी ४-५ पोलिसांसह दवाखान्याच्या आवारात शिरताना दिसली. पोलिसांना बघून लोकांना अधिकच उधान आले, घोषणाबाजी सुरूच होती. आणी मग डॉ. सपकाळ ही काय चीज आहे ह्याची चुणूक दिसली. सर्वप्रथम त्यांनी पोलीस आणी त्यांची गाडी दवाखान्याच्या आवाराच्या बाहेर नेण्याचे आदेश दिलेत. एका माणसाच्या हातून रॉकेल चा डबा हिसकला, आणी कोणाच्याही लक्षात येण्यापुर्वीच स्वतःच्या गाडीवर आणी दवाखान्याच्या बाहेरील भिंतीवर डब्यातील रॉकेल भिरकविण्यास सुरवात केली. आणी आपल्या वाहन चालकास म्हणले " आन रे काडी पेटी, मीच प्रथम आग लावतो. लोकांना कळलेच नाही काय होतंय ते, क्षणात नारेबाजी थांबली. मग त्यांनी बोलण्यास सुरवात केली. त्या दुर्दैवी स्त्रीच्या मृत्यूस जर डॉक्टर जबाबदार असतील तर ह्या रुग्णालयाला मीच आग लावतो, तुम्ही कशाला तसदी घेता. नंतर, पोलीस इन्स्पेक्टर ला बोलावले, आतून डॉक्टर ला बाहेर काढले, पोलिसांना आदेश दिलेत, ह्या डॉक्टर विरुद्ध गुन्हा नोंदवून तत्काळ ह्यांना नागपूर ला पोलीस मुख्यालयी घेवून या. मला म्हणले, "देवा, १ तासात संपूर्ण निपक्षपाती चौकशी कर, कर्मचाऱ्यांचे, नातेवायीकांचे statements घे, आणी सर्व अहवाल तयार कर, तो पर्यंत मी येथेच थांबतो. लगेच नागपूर ला फोन करून वरिष्ठ अधिकार्याशी बोललेत. जमावाच्या मध्य भागी खुर्ची टाकून बसलेत आणी तेथेच स्थानिक लिपिकास डॉक्टरांचे निलंबनाचे आदेश टाईप करून आणण्याची सूचना दिली. स्वतःला अधिकार नसताना देखील ह्या आदेशावर स्वाक्षरी केली. सोबतच जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत येत आहे हे बघून त्यांचेही प्रभोदन करण्यास सुरवात केली. जमाव हळू हळू शांत झाला आणी ३० मिनीटातच जमावाची पांगापांग झाली. कधीही कल्पना देखील करू शकणार नाही असा हा मला आलेला अनुभव.२ तासानंतर आम्ही नागपूरला जाण्यास निघालो. मी म्हणलो, "सर, चौकशी अंती मला तरी डॉक्टर चा काहीच दोष दिसत नाही. उगाच आपण त्यांना निलंबनाची शिक्षा दिली आणी पोलिसांच्या गाडीत नागपूरला पाठविले" सर म्हणले, "जमावाला विवेकबुद्धी नसते, जमावाचे मानस शास्त्र जर आपण जाणले नसते तर कदाचित त्या क्षणी खरोखरच दवाखाना पेटवून दिला असता आणी डॉक्टरांना मारहाण देखील केली असती". दुपारी नागपूरला त्यांच्या कार्यालयात आलो तेंव्हा ते वैध्यकीय अधिकारी तेथेच बसले होते. फार घाबरले होते ते. डॉ. सपकाळ ह्यांनी त्यांना समजावून सांगितले, म्हणले तुम्ही निलाब्मित वगेरे काही झाला नाही आहात. तुमचा काहीच दोष नसल्यामुळे मी पूर्णपणे तुमच्या पाठीशी आहो. १५ दिवस आराम करा, परिस्थिती निवळेल, नंतर मीच तुम्हाला त्याच केंद्रात घेवून जायील. १५ दिवसांनी त्यांनी कळमेश्वर ला पंचायत समिती सभागृहात एक सभा बोलाविली. स्थानिक लोक प्रतिनिधी आणी इतर मान्यवर उपस्थित होते. डॉक्टर कसे बरोबर होते, त्यांचे काहीच चुकले नाही, दुर्दैवाने प्रसुतीपश्चात खूप रक्तस्त्राव झाल्यास ५-१० मिनिटात देखील मृत्यू होऊ शकतो, लोकांना समजावून सांगितले. तसेही त्या डॉक्टर बद्धल लोकांचे पूर्वमत चांगले असल्यामुळे त्यांना पुन्हा कामावर रुजू होऊ देण्यास कोणाचाच आक्षेप नव्हता. हेच डॉक्टर नंतर सेवानिवृत्त होत पर्यंत तेथेच होते आणी नंतर ही तेथेच स्थायिक झालेत.वरील प्रसंग, काय करावे, कसे वागावे, कोणत्याच व्यवस्थापनाच्या पुस्तकात ह्या बद्धल निश्चित सूचना नसतील. डॉक्टर सपकाळ ह्या प्रसंगी वागलेत ते योग्य कि अयोग्य, ह्यावर देखील चर्चा होऊ शकेल. परंतू त्या आकस्मिक स्थितीत त्यांनी दाखविलेले धैर्य, प्रसंगावधान आणी आपल्या अधिकार्याची चूक नाही तर त्याचे पाठीशी उभे राहणे, खरोखरच वाखाणण्यासारखे होते. केवळ डॉ. सपकाळ सारखी व्यक्तीच असे करू शकेल. परंतू, आकस्मिक स्थितीत लोकांच्या भावना अधिक न भडकावता, प्रसंगावधान दाखविणे कसे शक्य होते हे मात्र मी त्या प्रसंगातून शिकलो.

Saturday, March 5, 2011

सारांश - भाग 2 - The Immortals of Melhua

सोमरस, रामराज्य आणी चातुरवर्ण्य पद्धती
सोमरसाची संकल्पना आणी त्याची निर्मिती करण्याचा शोध लावणारा ब्रह्मदेव एक महान शास्त्रज्ञच. सोमरसाचा स्वतःसाठी उपयोग न करता समाजाच्या भल्यासाठी उपयोग कसा करता येईल आणी दुष्ट प्रवृत्तीचे लोक ह्याचा दुरुपयोग कसा करणार नाहीत आणी त्यावर नियंत्रण राखण्याकरिता ब्रह्मदेवाने केलेले कार्य नियोजन:
सर्व प्रदेशांमध्ये एक सखोल सर्वेक्षण करून भारताच्या सात विभागातून प्रत्येकी एक ह्या प्रमाणे अतिशय शीलवान, चारीत्र्य्पूर्ण अश्या सात तरुणांची निवड केली. स्वतःच्या गुरुकुलात समाजाच्या भल्यासाठी निरपेक्षरित्या साततत्याने कार्य करण्याची मानसिकता आणी कठोर प्रशिक्षण त्यांना दिले. Superhuman intelligence असणारे, समाजाला योग्य वर्तणुकीची दिशा दाखविणारे, कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता समाजाची सेवा करणारे, प्रत्येक प्रदेशातील एक असे हे सात ऋषी, म्हणजेच सप्तऋषी. वर्तणुकीचे अतिशय कठोर असे नियम त्यांना घालून दिले आणी नंतर त्यांनाच फक्त सोमरस प्राशन करण्याची अनुमती दिली. सप्तऋषीनी हळू हळू ब्रह्मदेवाच्या ह्या सर्व निकषानुसार नवीन नवीन तरुणांना आपल्या पंथात सामावून घेतले, त्यांना कठोर प्रशिक्षण दिले, आणी हा ब्रह्मदेवाचा पंथ किंवा ब्राह्मण म्हणून ओळखला जावू लागला. ह्या तरुणांमध्ये क्षत्रिय तथा इतर तरुण देखिल असायचे. कालांतराने, दुर्दैवाने, ह्यातील काही लोकांनी त्यांची आचारसंहिता विसरून, साधन, संपत्ती जमविण्यास सुरवात केली, सोमारसामुळे प्राप्त झालेल्या अतिरिक्त शक्तीचा दुरुपयोग करून लढाया करून आपआपली साम्राज्ये निर्माण केलीत. ब्राह्मणांमध्येसुद्धा त्यांच्या श्रेष्ठ्तेनुसार गरुड, मोर, हंस असे वर्ग होते. अहंकारामुळे स्वतःला अतिशय श्रेष्ठ् समजून त्यांनी क्षत्रिय, वैष ह्या वर्गातील श्रेष्ठ्, ज्ञानी, जबाबदार अश्या व्यक्तींची अवहेलना करण्यास सुरवात केली. ह्या सर्व प्रकारातून समाजात असहकार आणी बेबंदशाही निर्माण व्हायला लागली. शिवाय प्रत्येक समाजातील फक्त काही विशिष्ठ लोकानाच ह्याचा फायदा होत गेला आणी त्यांचीच फक्त उन्नति होत गेली. ह्या सर्व पार्श्वभूमीवर रामाने निर्माण केलेली आणी काटेकोर पणे आचरणात आणलेली चातुरवर्ण्य पद्धती कशी होती बघूया:
IIM कोलकाता येथून पदवी प्राप्त केलेल्या आमिष ह्या लेखकाने लिहिलेल्या "The Immortals of Meluha" ह्या पुस्तकातील हा सारांश. ही कोणतीही पौराणिक कथा किंवा पौराणिक कथांचे विश्लेषण नसून, वाचल्याशिवाय कळणारच नाही अशी कादंबरी.
रामाच्या असे लक्षात आले की, ह्यामुळे जातीव्यवस्था अधिकच बळकट होत आहे. ब्राह्मणांची मुले ब्राह्मण, क्षत्रियांची मुले क्षत्रिय, वैशांची मुले वैश, हीच परंपरा, ह्यात त्यांच्यातील गुणवत्तेचा, क्षमतेचा कोणताही विचार नाही. एख्याद्या ब्रह्मणाचा निर्बुद्ध मुलगाही ब्राह्मण तर एखाद्या क्षुद्राचा आतिशय हुशार, सर्व गुणवत्ता असणारा मुलगाही क्षुद्र. केवळ कर्मावर आधारित जात का नसावी हा रामाचा विचार आणी त्याने तो आमलात आणण्यास सुरवात केली. जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलाचा पालक म्हणजे राजा. ह्याकरिता रामाने काय केले? नर्मदा नदीच्या किनारी सर्व सोयीनी अध्यायावत अश्या एका फार मोठ्या रुग्णालयाची निर्मिती केली. ह्या रुग्णालयाचे नाव "माहेर". कोणत्याही जातीची असोत, संपूर्ण राज्यातील कोणतीही महिला गर्भवती असताना शेवटच्या तीन महिन्यात तिने "माहेर" मध्ये दाखल झालेच पाहिजे, हा आदेश आणी त्याची काटेकोर अंमलबजावणी. ह्यात श्रीमंत/गरीब असा कोणताही भेदभाव नाही. सर्वांच्या प्रवासाची व्यवस्था. महिलेला रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिच्या जवळ कुटुंबातील कोणीही व्यक्ती असणार नाही. त्या महिलेची संपूर्ण काळजी रुग्णालयातील प्रशिक्षित कर्मचारी घेणार. प्रसुतीनंतर काही कालावधी नंतर (४-६ महिने), ती महिला एकटीच तिच्या घरी परत जाणार. येथे जन्मलेल्या मुलांना आपले आई-वडील कोण आहेत, आपली जात कोणती? किंवा येथे जन्मलेल्या मुलांपैकी आपला मुलगा किंवा मुलगी कोणती? हे कोणालाच ठाऊक नाही. ह्या सर्व मुलांच्या आरोग्याची, विकास-वाढीची जबाबदारी राजाची. थोडी मोठी झाल्यानंतर त्यांना जवळच असणारया गुरुकुलात दाखल केले जाणार. त्यामुळे ह्या मुलांमध्ये कोण ब्राम्हणाचा, क्षत्रियाचा कि क्षुद्राचा, श्रीमंताचा कि गरीबाचा कोणालाच माहित नाही. सर्वाना सारखीच वागणूक आणी सारख्याच सोयी सवलती. ह्या सर्व मुलांचे मुलभूत शिक्षण झाल्यानंतर, त्यांच्या कला गुणवत्तेचा काटेकोर अभ्यास करून, त्या क्षेत्रात पारंगत होण्यासाठी गुरुकुलात त्यांना आवश्यक सर्व प्रशिक्षण दिले जाणार. युवावस्थेत पदार्पण केल्यानंतर ह्या प्रत्येक तरुणाला सोमरस दिला जाणार. १५ वर्ष पूर्ण केल्यानंतर त्यांची परीक्षा घेतली जाणार आणी ह्या परीक्षेच्या निकालावर आधारित त्यांना ब्राम्हण, क्षत्रिय, वैष, क्षुद्र ह्या जाती व्यवस्थेत वर्गीकरण केले जाणार. नंतर पुन्हा त्यांना जाती व्यवस्थेवर आधारित विशेष प्रशिक्षण दिले जाणार आणी त्यांना त्यांच्या वर्ण व्यवस्थेची ओळख म्हणून एक उपर्ण दिले जाणार. ब्राम्हनासाठी पांढरे, लाल क्षत्रीयासाठी, हिरवे वैशाकरिता आणी काळे क्षुद्राकरिता. रामाच्या दृष्टीकोनातून वर्ण म्हणजे रंग, जात नव्हे. पालकांनी नंतर मुलांसाठी अर्ज करायचा. ब्राह्मण पालकांना संपूर्ण ब्राह्मण वर्णातील एक मुलगा randomly दिला जाणार, त्याच प्रमाणे क्षत्रिय पालकाला क्षत्रिय वर्णातील एक मुलगा. हा मुलगा नंतर त्यांच्या पालकांकडे त्यांच्या मुलासारखाच वाढणार आणी त्याला सर्व मुलाचेच हक्क मिळणार. ह्या व्यवस्थेमुळे एखाद्या क्षुद्र मातेचा मुलगा त्याला सर्व सामान संधी उपलब्ध झाल्यामुळे आणी तो खूप हुशार असल्यास तरुणपणी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याचा वर्ण ब्राम्हण म्हणून निश्चित होणार आणी कोणी तरी ब्राम्हण पालक त्याचे पालकत्व स्वीकारणार. तसेच एखाद्या ब्राह्मण मातेच्या मुलाचे पालकत्व त्या मुलाला शिक्षणानंतर काळा वर्ण मिळाल्यास त्याचे पालकत्व एखादा शुद्र स्वीकारणार. आणी रामाने ही व्यवस्था इतक्या काटेकोरपणे आमलात आणली कि सर्व प्रजाही रामावर खुश होती.
अतिशय अनाकलनीय, बुद्धीला पटणार नाही, तरी देखील विचार करायला लावणारे एक वेगळेच लिखाण लेखकाने ह्या पुस्तकात केलेले आहे.

Sunday, February 20, 2011

सारांश - भाग १ - The Immortals of Melhua


बृहस्पती आणी शिवा (नीलकंठ) ह्या दोघांमधील हा संवाद:
बृहस्पती म्हणले, वैचारिक पातळीवर सोमरसाचे शरीरातील कार्य सुलभ असू शकेल, परंतू ही महान संकल्पना प्रत्यक्षात साकारण्याचे कार्य मात्र ब्रह्मदेवाचे". Aging process काही औषधांनी पुढे ढकलणे कसे शक्य आहे ह्याचा अभ्यास करण्यापूर्वी आपण जिवंत का असतो? अशी कोणती मुलभूत बाब आहे जी आपणाला जिवंत ठेवते? बृहस्पती म्हणले, ही मुलभूत बाब म्हणजेच "उर्जा". जोपर्यंत व्यक्ती जिवंत असते तो पर्यंत बोलताना, चालताना, विचार करताना, कामे करताना आणी झोपेत देखील ह्याच उर्जेचा जिवंत राहण्यासाठी उपयोग होतो. ह्या उर्जेचे स्त्रोत काय? तर आपण जे अन्नपदार्थ सेवन करतो त्या अन्नाचे उर्जेत रुपांतर होते, ती शरीरात साठविली जाते. त्यामुळे काही दिवस आपण पूर्ण उपवास जरी केला तरी आपणाला अशक्त जरूर वाटेल, पण तरीदेखील आपण जिवंत असतो. अन्नपदार्थांपासून ही उर्जा वातावरणातील हवेतील प्राणवायू मुळेच निर्माण होते. त्यामुळे, अन्नपदार्थांचे सेवन करूनही, प्राणवायू अभावी उर्जा निर्माण होणार नाही आणी जिवंत राहण्यासाठी उर्जा नसल्यामुळे मृत्त्यू अटळ आहे. शिवा म्हणला," परंतू ह्या सर्वांचा, aging प्रोसेस, काही औषधांनी पुढे ढकलण्याशी काय संबध आहे?" बृहस्पती हसले आणी म्हणले, "हीच तर खरी गोम आहे, जो प्राणवायू आपणाला जिवंत ठेवतो तोच प्राणवायू aging process आणी मृत्त्यू साठी कारणीभूत आहे. जेव्हा प्राणवायू आणी अन्नपदार्थ ह्यांचा संयोग होवून एका रासायनिक प्रक्रियेद्वारे उर्जा निर्माण होते, त्याच प्रक्रियेतून oxidents हे free radicles शरीरात निर्माण होवून साठविले जातात. जसे लोखंडावर प्राणवायूची प्रक्रिया होवून oxidizing process द्वारे त्यावर जंग (rust) निर्माण होवून हळू हळू लोखंडाची गुणवत्ता कमी कमी होत जाते, एखादे फळ हवेत ठेवले तर ते फळही कालांतराने प्राणवायूच्या प्रक्रियेमुळे खराब होते, सडते, तशीच प्रक्रिया आपल्या शरीरात देखील होते. प्राणवायूच्या प्रक्रियेमुळे निर्माण झालेले हे oxidents हळूहळू शरीरातील पेशींवर विपरीत परिणाम करण्यास सुरवात करतात. लोखंडासारखे आपले शरीरही आतून गंजत जाते, हीच aging प्रोसेस, आणी त्याचा परिपाक म्हणजे मृत्त्यू. जो प्राणवायू आपणाला जीवन देतो तोच प्राणवायू हळू हळू आपणाला मृत्त्युच्या निकट नेत राहतो". ज्याप्रमाणे आपण अन्न, पाणी शरीरात साठवून ठेवू शकतो, ह्या गोष्टी मिळाल्या नाही तरी बरेच दिवस जिवंत राहू शकतो, पण प्राणवायू मात्र साठवून ठेवू शकत नाही, काही मिनिटातच प्राणवायू अभावी मृत्त्यू अटळ आहे. कदाचित साठविलेला प्राणवायू हे शरीरासाठी विष ठरेल म्हणूनच निसर्गाने ही किमया केलेली असावी.
बर्याच शास्त्रीय अभ्यासांती ब्रह्मदेवानी सोमरसाचा शोध लावला. सोमरस प्राशन केल्यानंतर शरीरातील oxidents सोबत ह्या सोमरसाची प्रक्रिया होवून हे प्राणघातक oxidents घामाद्वारे किंवा लघविद्वारे विसर्जित केले जातात. सोमरसाचे एका विशिष्ठ कालाविधीनंतर नियमित प्राशन केल्यास aging process आणी मृत्त्यू ही प्रक्रियाच लांबते हाच ब्राह्म्देवांचा शोध. अमिष ह्या कोलकाता येथील IIM संस्थेतून पदवी प्राप्त केलेल्या लेखकाने लिहिलेल्या "The Immortals of Melhua " ह्या पुस्तकातील वरील सोमरसाची पार्श्वभूमी.

राम हा एक सूर्यवंशीय रजा, ज्याने आपल्या प्रजेसाठी आचार विचारांची एक दिशा ठरवून दिली, ज्या प्रदेशात हे रामराज्ज्य अस्तित्वात होते त्या प्रदेशाला लेखकाने "meluha " म्हणून संबोधित केले आहे आणी राजधानी देवगिरी. सोमरसाचा शोध तर ब्रह्मदेवानी लावला परंतू त्याची निर्मिती कोठे करावी जेणेकरून त्याचा दूरूपयोग होणार नाही, म्हणूनच नीती आणी अचार विचारांनी परिपक्व असणारया सूर्यवंशीय meluha ह्या राम राज्ज्यातील मंदार पर्वताची निवड करण्यात आली. बृहस्पती हे ह्या निर्मिती कारखान्याचे प्रमुख. सोमरसाच्या निर्मितीसाठी आवश्यक वनस्पती, संजीवनी वृक्ष मंदार पर्वतानजीकच्या अर्रण्यात भरपूर प्रमाणात उपलब्ध असल्यामुळेच ह्या जागेची निवड. फक्त सरस्वती नदीच्या पाण्याचाच उपयोग सोमरस निर्मितीसाठी होणार असल्यामुळे, मोठ्या कालव्याद्वारे सरस्वतीचे पाणी आणण्यात आले.

सोमरस सेवन केल्यानंतर बर्याच कालावधीपर्यंत विसर्जित होणारा घाम आणी मल- मुत्र ह्यात फार मोठ्या प्रमाणात oxidents असल्यामुळे, आणी ह्या विसर्जनाची योग्य विल्हेवाट न लावल्यास त्याचा शरीरावर आणी त्याच्या सान्निध्यात येणाऱ्या लोकांवर विपरीत परिणाम होणार हे जाणून, व्ययक्तिक स्वच्छता, रोज दोन वेळा स्नान करणे ही सूर्यवंशीयांची सवय, सांडपाण्याची मोठ मोठ्या बंद नाल्या निर्माण करून योग्य विल्हेवाटलावणे हे राजाचे कर्त्तव्य.
अभिमान वाटावे असे रामाने निर्माण केलेले सूर्यवंशीय राज्ज्य. नंतरच्या अनेक पिढ्यातील सूर्यवंशीय राजांनी ही परंपरा जोपासलेली, परंतू हळू हळू ही परंपरा नष्ट होईल काय ह्या भीतीने धास्तावलेले दक्ष (पुस्तकात रामाचा वंशज म्हणून दक्ष राजाचा उल्लेख आहे, दक्ष राज्याचे वय १८८ वर्ष आणी दक्ष राजाची पुत्री म्हणजे सती किंवा पार्वती - वय - ८८). भीती वाटण्याचे महत्वाचे कारण म्हणजे सरस्वती नदीच्या पाण्याचा सतत कमी होत असणारा स्त्रोत. शिवाय शेजारच्या चंद्रवंशीय आणी नागा राज्ज्यकर्त्यांचे सतत होणारे आक्रमण. ह्या सर्व परिस्थितीवर फक्त एकाच व्यक्ती तोडगा काढू शकेल ज्या व्यक्तीचा गळा सोमरसाचे सेवन केल्यानंतर निळ्या रंगाचा होईल. तिबेट मधील मानसरोवर परिसरातील क्षेत्रात अनेक आदिवासी टोळ्या राहत होत्या. अश्याच एका टोळीचा शिवा हा नायक. सूर्यवंशीय राज्याचे मुख्यालय म्हणजे देवगिरी (सात नद्यांचा हा प्रदेश - गंगा, यमुना, सरस्वती, सिंधू, ब्रह्मपुत्रा, शरयू आणी दक्षिणेची राज्याची हद्द म्हणजे नर्मदा). मेलुहा प्रदेशाचा प्रधान म्हणजे "नंदी" . तो शिवाला त्याच्या टोळीसह मेलुहा राज्यातील श्रीनगर येथे घेऊन येतो. सर्व पाहुण्यांना सोमरस दिल्यानंतर, फक्त शिवा सोडून सर्वाना फार त्रास व्हायला लागतो. फक्त शिवाला मात्र काहीच त्रास होत नाही, किंबहुना सोमरस पिल्यानंतर त्याचा कंठ नेहमीचा निळा होतो. हाच तो नीलकंठ, सूर्यवंशीयांना वाचविणारा, म्हणून नंदी त्याला देवगिरी राज्यात घेवून येतो. सोबत शिवाचा मित्र वीरभद्र हा देखील असतो.

आपण सर्वांनी ऐकलेल्या पौराणिक कथांच्या अगदी वेगळे असे हे कथानक. बर्याच गोष्टी अत्तर्क्य, अनाकलनीय, विश्वास न पटण्यासारख्या, तरी देखील, पुस्तकातील राम राज्याची, सोमरसाची संकल्पना विचार करण्यासारखी. आणी अगदी पहिल्या पानापासून वाचतच राहावं असे वाटणारे हे कथानक. सोमरसाची निर्मिती केल्यानंतर त्याचा दूरूपयोग होऊ नये म्हणून ब्रह्मदेवाने केलेली उपाययोजना आणी त्याच अनुषंगाने नंतर रामाने अमलात आणलेली चातुरवर्ण्य पद्धती ह्या बाबत वाचा माझा पुढील लेख ..

Saturday, February 12, 2011

उंदीर आणी प्रशासन


मंत्रालयातील सामान्य प्रशासन हा अतिशय महत्वाचा विभाग. श्री करडे, ह्या विभागातील एक अतिशय कर्मठ कर्मचारी. सेवानिवृत्तीला एक वर्ष राहिले असताना कक्ष अधिकारी म्हणून पदोन्नती झालेली. सर्व कायदे मुखोद्गत, कायद्याचा किडा म्हणूनच प्रसिद्धी. काम झाले नाही तरी चालेल पण कायदे, नियम मात्र पाळले गेलेच पाहिजे हा सततचा अट्टाहास. त्यामुळेच कोणाशीच न पटणारी ही व्यक्ती. सामान्य प्रशासन विभागातील भांडार म्हणजे एक मोठं कक्ष आणी त्यात ३०-४० racks, जुन्या पुराण्या असंख्य files त्यात ठेवलेल्या. ह्या साठी एक कक्ष अधिकारी आणी एक शिपाई एवढाच staff. फायीलींची आवक जावक आणी त्यांच्या नोंदी ठेवणे एवढेच काम. कोणालाच नको असणारया श्री करडे ह्यांना साहजिकच पदोन्नती नंतर ह्या भांडारात पाठविण्यात आले.

एक दिवशी सकाळी ११ वाजता आपल्या खुर्चीत बसले असता श्री करडे ह्यांना एक उंदीर दिसला आणी त्यांचे विचारचक्र सुरु झाले. कायदे आणी नियमाचा किडा ते, एक नस्ती (file ) घेतली आणी कागदावर लिहिण्यास सुरवात केली. " दिनांक .. वेळ . विषय: उंदीर आणी त्यामुळे शासनाचे होणारे संभावित नुकसान - आदरणीय महोदय, आज सकाळी खुर्चीवर बसलेलो असताना सकाळी ११ वाजून १७ मिनिटांनी एक उंदीर मला rack क्रमांक ९ समोरून निघून rack क्रमांक १० खाली गेलेला दिसला. ह्या कक्षात अनेक अतिशय महत्वाच्या files आहेत, हा उंदीर त्या files नष्ट करण्याची शक्यता नाकारता येत नाही. मला सेवानिवृत्तीला फक्त १० महिने राहिलेले आहेत. ह्या files व्यवस्थित राखणे माझी नियम क्रमांक ..... नुसार जबाबदारी आहे. परंतू ह्या उंदरावर कोणतीही कार्यवाही करण्याचा नियम क्रमांक ..... नुसार मला अधिकार नाही. त्यामुळे ह्या विषयावर त्वरित कार्यवाही न झाल्यास आणी काही महत्वाच्या files नष्ट झाल्यास मी जबाबदार राहणार नाही. शेवटच्या ओळीवर लाल शाईने अधोरेखांकित केले. खाली आपली स्वाक्षरी केली. त्याखाली नियमानुसार सेवा जेष्ठतेनुसार अवर सचिव, उप सचिव, सचिव आणी प्रधान सचिव ह्याची नावे लिहिली. file ला "प्रथम प्राधान्य", "अति महत्वाचे", "तातडीचा निर्णय" "विशेष दुताद्वारे" असे ४-५ लाल रंगाचे tags लावले. शिपायाला बोलावून ही file तत्काळ अवर सचिवांकडे घेवून जाण्याचे आदेश दिले. शिपाई file घेवून अवर सचिवांच्या कक्षात गेला. सामान्यतः मंत्रालयात कोणत्याच file वर तातडीने निर्णय होत नसतो. ४-५ tags लावलेली file, शेवटचे फक्त लाल शाईने अधोरेखांकित केलेले वाक्य वाचले. विचार केला "काही तरी भंयकर प्रकरण दिसतंय, न वाचताच आपली लहान स्वाक्षरी केली आणी त्याच शिपायाला ही file उप सचिवांकडे घेवून जाण्याची सूचना दिली. " ह्या विषयावर त्वरित कार्यवाही न झाल्यास आणी काही महत्वाच्या files नष्ट झाल्यास मी जबाबदार राहणार नाही" हे लाल शाईने अधोरेखांकित केलेले वाक्य वाक्य पाहून वरील अधिकार्यांनीही न वाचता सही करून शेवटी शिपाई ही file घेवून प्रधान सचिवांच्या कक्षात गेला. त्यांनीही शेवटचे वाक्य वाचले आणी त्याखालील सर्वांच्या सह्या पहिल्या. इतर काहीच वाचले नाही. आता आपण निर्णय घेतला आणी फसलो तर? त्यांनी तत्काळ त्यांच्या हाताखालच्या अधिकार्याला पाचारण केले. file त्यांच्या अंगावर फेकली "मूर्ख, मी सचिव असताना अश्या files मी कधीच वरिष्ठांकडे पाठवत नव्हतो, मीच निर्णय घेत होतो. कशाला बसलात ह्या खुर्चीवर, मूर्ख, बेजबाबदार" शिव्या देवून हाकलून दिले. आणी नंतर हीच वर्तणूक आणी हेच वाक्य - उप सचिव, अवर सचिव ह्यांनी देखील त्याच प्रमाणे आपल्या हाताखालच्या अधिकाऱ्यांच्या अंगावर ही नस्ती फेकून दिली. आणी सर्वात शेवटी शिपायाच्या अंगावर. बिचारा शिपाई ही file घेवून वापस आला. श्री करडे चहा पिण्यासाठी बाहेर गेलेले पाहून शिपायाने ही file साहेबांच्या खुर्चीतील उशीखाली दडवून ठेवली.

२ महिन्यानंतर श्री करडे खुर्चीत बसले असता त्यांच्या ढुंगनाला काही तरी टोचले. उशी वर करून पहिले तर ही file , त्याचीच एक टाचणी त्यांच्या ढुंगनाला टोचली होती. पुन्हा ४-५ नियम, कायदे ह्यांचा उल्लेख करून एक पानभर लिहून ही नस्ती वर पाठविली. शेवटी ही नस्ती प्रधान सचिवांकडे पोहचली. नस्ती वाचावीच लागली त्यांना. एक उंदीर आपल्या विभागात धुमाकूळ घालतोय हे त्यांना कळले. त्यांनी शेरा लिहिला " सामान्य प्रशासन विभागाकडे, उंदराच्या अपेक्षित कार्यवाही बाबत तांत्रिक ज्ञान असणारे अधिकारी नसल्यामुळे ही नस्ती तांत्रिक मार्ग्दर्षानाकरिता आणी योग्य उपाय योजना सुचविण्याकरिता संबंधित विभागांकडे पाठविण्यात यावी. आरोग्य विभाग, कृषी विभाग, warehouse corporation आणी defense ह्या चार विभागांची निवड झाली. पत्रव्यवहार सुरु झाला. आरोग्य विभागाचे अधिकार चौकशी साठी आले. त्यांचा अहवाल " आरोग्य विभाग उंदरांमुळे निर्माण होणारया रोगांच्या प्रतीबंधानाचे तथा उपचाराचे कार्य करते, उंदराला नाहीशे करणे ह्या विभागाचे काम नाही". कृषी विभागाचा चौकशी अहवाल " हा उंदीर घरगुती उंदीर होता कि शेतातील ह्याचा खुलासा करावा, शेतातील उंदीर असल्यास कृषी विभाग निश्चितच मार्गदर्शन करू शकेल". warehouse corporation चा अहवाल " आम्ही उंदीर मारीत नाही तर उंदीर आत येवू शकणार नाही असे warehouse बांधतो. आपल्या विभागाला असे भांडार निर्माण करावयाचे असल्यास आम्ही निश्चितच तांत्रिक सल्ला देवू" सुरक्षा विभाग थोडा समजदार असावा, अधिकारी न पाठवता त्यांनी उलट विचारणा केली " आकस्मिक स्थितीतच सुरक्षा विभाग नागरी विभागास मदत करू शकतो. आपल्या राज्यात आकस्मिक स्थिती जाहीर झालेली आहे काय? नसल्यास कृपया आकस्मिक स्थिती जाहीर करण्यासाठी माननीय राष्ट्रपती महोदयांना प्रथम विनंती करावी"

तो पर्यंत एक उंदीर धुमाकूळ घालतोय हे मंत्रालयात सर्वाना माहित व्हायला लागले. सर्व अहवालांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी महाबळेश्वर येथे दोन दिवसांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ४०-५० अधिकारी सपरिवार उपस्थित होते. निर्णय झाला "ह्या उन्दरासाठी काय करावे ह्याची तांत्रिक माहिती आपल्या कोणत्याच विभागाकडे नसल्यामुळे परदेश प्रशिक्षण दौरा आयोजित करून ३-४ देशांना भेटी द्याव्या". ५ अधिकारी , ५ मंत्री आणी ५ आमदार असे सर्व ४ देशांचा १५ दिवसांचा परदेश दौरा करून परत आले. पुन्हा कार्यशाळा, चर्चा सुरूच राहिली. प्रत्येक विभागात काही असंतुष्ठ अधिकारी, कर्मचारी असतातच. त्यांनी ही सर्व माहिती गोळा करून विरुद्ध पक्षाच्या आमदारांना पुरविली. विधानसभेत आणी विधान परिषदेत प्रश्न विचारण्यात आले, अनेक तास चर्चा झाली, दोन वेळा सभात्याग झाला.

सेवानिवृत्तीला एक महिना राहिला असताना, शिपायाने श्री करडे ह्यांना ह्या उंदराच्या प्रकरण बाबत विचारणा केली. नस्तीतील सर्व माहिती नियम आणी कायद्यासह श्री करडे ह्यांनी शिपायाला समजावून सांगितली. शिपाई म्हणाला, " अर्रेचा, हाच तो उंदीर होता काय? साहेब आपणाला ज्या दिवशी तो उंदीर दिसला त्यानंतर २-३ दिवसांनी मी दरवाज्याजवळ स्टूल वर बसलो होतो, मला तो उंदीर आलामारीखाली दिसला, हातात झाडू घेवून दबा धरून बसलो, थोड्या वेळाने तो पुन्हा बाहेर आला, एका झाडूतच त्याला मारला आणी बाहेर फेकून दिला". श्री करडे, अरे त्या उंदराची केस सुरु असताना तू त्याला कसा मारलास? त्यांनी पुन्हा कायदे, नियम लिहून नस्ती तयार करून वर पाठविली आणी शेवटी चौकशी सुरु असणारया उंदराला मारले म्हणून शिपायाला निलंबित करण्यात आले.

प्रशासन आणी व्यवस्थापन हे दोन शब्द आपण नेहमीच ऐकत असतो. प्रशासन म्हणजे कायद्याच्या, नियमांच्या चौकटीत राहून कार्य करणे. तर व्यवस्थापन म्हणजे उपलब्ध मनुष्यबळ, सामुग्री आणी पैसा ह्यांचा योग्य विनियोग करून अपेक्षित उद्धेश अपेक्षित कालवधीत साध्य करणे. अपेक्षित उद्धेश साध्य करणे हे व्यवस्थापनाचे महत्वाचे कार्य, प्रशासनाचेही तेच कार्य आहे, परंतू उद्धेश साध्य करण्याकडे प्राथमिकता न देता कायदा आणी नियमांचा कीस पडून, फक्त कायद्याच्या, नियमांच्या चौकटीत राहून कार्य करणे हा शासकीय दृष्टीकोन. उंदीर हा जर problem होता तर माझ्या दृष्टीने तो शिपाई एक चांगला व्यवस्थापक होता कारण त्वरित निर्णय घेवून त्याने हा प्रोब्लेम सोडविला होता. पण प्रशासन बघा, बक्शिश तर सोडाच, चौकशी सुरु असणारया उंदराला मारले म्हणून त्यालाच निलंबित व्हावे लागले. ह्या प्रसंगाकडे एक हास्यास्पद कथा म्हणून न बघता, अनावश्यक कालाप्यव्यय, पैश्याचा अनाठायी खर्च टाळण्यासाठी प्रशासन आणी व्यवस्थापन योग्य रित्या समजून आपला उद्धेश कश्या प्रकारे साध्य करता येईल ह्याकडे लक्ष देवून अधिक जाणीवपूर्वक कार्य करणे महत्वाचे ठरते.

Friday, January 28, 2011

आत्महत्त्या



आत्महत्त्या


  • २२ वर्षीय विवाहित महिलेची अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेवून आत्महत्त्या - संभाव्य कारण "हुंडा"
  • विषप्राशन करून २ शेतकऱ्यांची आत्महत्त्या - ? कर्जबाजारी
  • दिराच्या लैंगिक छळवादाला कंटाळून फाशी लावून नवविवाहितेची आत्महत्त्या
  • २ कॉलेज विध्यार्थांची हाताची नस कापून आत्महत्त्या - प्रेमातील अपयश - संभाव्य कारण
  • ७ व्या माळ्यावरून उडी मारून एका तरुण म्यानेजर ची आत्महत्त्या - कामातील असःह्य झालेला ताणतणाव
  • एका हॉटेल मध्ये नवविवाहित जोडप्याची झोपेच्या गोळ्या खावून आत्महत्त्या - संभाव्य कारण "अंतरजातीय विवाह"
  • चालत्या गाडीतून उडी मारून एका तरुणाची आत्महत्त्या - संभाव्य कारण " लैंगिकदृष्ट्या असमर्थता"
  • समुद्रात बुडून एका व्यापाऱ्याची आत्महत्त्या - संभाव्य कारण " मित्राने केलेली फसवणूक आणी धंद्यात खोट"
  • वेल्लोर मेडिकल कॉलेज मधील एका कौनसिलर ची आत्महत्त्या - सतत परामर्श देताना झालेला असःह्य ताणतणाव

वर्तमानपत्र वाचताना किंवा टीवी बघताना सातत्याने दिसणाऱ्या ह्या बातम्या. २००९-२०१० चा गुन्हे विभागाचा अहवाल - गेल्या दशकात आत्महत्येचे प्रमाण १ लक्ष लोकसंखेमागे ८.४७ वरून ११.२७ इतके वाढलेले. अहवालानुसार एका वर्षात ११०५८७ आत्महत्यांची नोंद. दररोज ३१० आणी प्रत्येक ५ मिनिटाला एका आत्महत्येची नोंद. सर्वसाधारणपणे पुरुष आणी स्त्रया ह्यांचे आत्महत्येचे प्रमाण १.२ मागे १.००, परंतू १५ ते २९ वयोगटात हेच प्रमाण ०.८ मागे १.५. दूरदैवाची बाब म्हणजे केरळ सारख्या भारतातील सामाजिक - सांस्कृतिक पुढारलेल्या आणी १००% स्त्रियांची साक्षरता असणाऱ्या राज्यात हेच प्रमाण १ लक्ष लोकसंखेमागे ३१. आणी सर्वच क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या बंगलोर शहरात हेच प्रमाण १ लक्ष लोकसंखेमागे ३४. अंगावर शाहरे आणणाऱ्या ह्या बातम्या आणी ही आकडेवारी. खरोखरच आम्ही सुशिक्षित, सकारात्मक विचारसरनीचे झालेलो आहोत काय? आणि ही आकडेवारी फक्त नोंदी झालेल्या घटनांची, पोलिसांच्या आणी इतर अनेक दबावांमुळे कितीतरी घटनांची नोंदच होत नाही, ही वस्तुस्थिती. कदाचित एका मोठ्या हिमनगाचा हा एक वरवर दिसणारा भाग. आत्महत्येने नोंद झालेल्या मृत्यूंच्या १० ते २०% जास्त आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांचे प्रमाण, आणी ३०-४०% जास्त आत्महत्येचा विचार सतत मनात असणारयांचे प्रमाण (अश्या व्यक्ती त्यांच्या कामांवर संपूर्ण लक्ष केंद्रित करून, त्यांच्या कडून अपेक्षित असणारे कार्य करू शकतील काय? त्याचा विपरीत परिणाम देश्याच्या सर्वांगीण प्रगतीवर होईल काय?) . एक शास्त्रीय आकडेवारी. खरोखरच भयंकर आहे ही आकडेवारी. आणी, असं कां घडाव हा एक मोठा यक्षप्रश्न?

कौटुंबिक समस्या, लैंगिक समस्या, सामाजिक - सांस्कृतिक - आर्थिक समस्या, दीर्घ आजार, मानसिक आजार, बेरोजगार, कामाच्या ठिकाणी सतत असह्य होत असलेला ताणतणाव, खाजगी क्षेत्रात कार्य करताना अपेक्षित कामाची सततची मागणी आणी त्यातून निर्माण होणारी विफलता, विशेषतः खाजगी क्षेत्रात कार्य करताना नौकरिची सतत अशास्वती, प्रेमभंग, परीक्षेतील अपयश, लैंगिकतेवर आधारित स्त्रियांवर होणारे अत्त्याचार ... ही सर्व साधारणपणे नोंद झालेली आत्म्हत्त्येची कारणे. परंतु ह्या सर्वामागील पार्श्वभूमी, मुलभूत कारणे, आत्म्हत्त्येस प्रवृत्त करणारी परिस्थिती कदाचित वेगळीच असू शकेल, त्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे काय? कारण अनेक वेळा पोलीस नोंदीत असणारया कारणांवर आपलाच विश्वास बसत नाही.

आरोग्य हा जर प्रत्येकाचा मुलभूत अधिकार आहे, आणी, आरोग्याच्या व्याखेत जर मानसिक आरोग्याचा समावेश आहे, तर खऱ्या अर्थाने आपण स्वतः आरोग्य म्हणजे काय हे समजून घेतो काय आणी ते प्राप्त करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतो काय? आत्महत्येचे वाढते प्रमाण हे समाजाच्या खालावलेल्या प्रवृत्तीचे द्योतक आहे. एकीकडे सगळीकडे दिसणारी/ जाणवणारी सामाजिक - आर्थिक उन्नती तर दुसरीकडे आत्महत्येचे वाढते प्रमाण, हा एक मनाला न पटणारा विपर्यास.

जर आत्म्हत्त्येस जबाबदार असणारे सकृतदर्शनी कारण, त्या मागील पार्श्वभूमी, सामाजिक - सांस्कृतिक - आर्थिक समस्या, ह्या सर्वांचा विचार केल्यास, एका करणामागील अनेक उपकारणे, प्रत्येक उपकारणांची पुन्हा उपकारणे, ह्या सर्वांचा विचार करून, वर्तनुकिंची एक समजून उमजून दिशा निश्चित कारणे आणी त्या प्रमाणे सातत्याने वर्तणूक अंगीकार करणे आवश्यक ठरते. बरेच वेळा आत्महत्त्या करणाऱ्या व्यक्तीत त्याच्या वागण्यात काही बदल झालेले जाणवू शकतात. त्यावर वेळीच उपाय योजना केल्यास ही आत्महत्त्या टळू शकते. आपल्या कुटुंबात, मित्र मंडळीमध्ये , कार्याचे ठिकाणी, आपल्या आजूबाजूच्या व्यक्तीत जाणविणारे खालील बदल भविष्यातील धोक्याची घंटा ठरू शकतात:

  • नेहमीच्या वर्तणुकीत अचानक जाणवणारा बदल, झोप न लागणे किंवा खूप वेळ झोपतच राहणे
  • आपल्या कामावर लक्ष केंद्रित न करणे
  • विनाकारण चिडचिड, निराशा, वैफल्यता, इतरांपासून एकटे राहण्याची प्रवृत्ती, अचानकच जडणारी व्यसनाधीनता.
  • जीवनात काहीही ठेवले नाही, माझी कोणालाच गरज नाही, सर्व माझ्या विरोधातच आहेत, मी कोणाच्याच उपयोगाचा राहिलेलो नाही, मला आत्महत्त्या करावीशी वाटते, अश्या प्रकारची सतत भाषा वापरणे.

ह्या अश्या प्रकारच्या वर्तणुकीतील बदल जाणवल्यास, सर्व प्रथम अश्या व्यक्तींचे शांत पणे ऐकून घेणे, कारण शोधण्याचा प्रयत्न करून त्या करिता काही करता येईल काय हा विचार करणे, अश्या व्यक्तींना शक्क्यतोवर एकटे न सोडणे, योग्य परामर्शदात्याची भूमिका वठविणे, गरज भासल्यास मानसिकतज्ञ सल्ला, आणी सर्वात महत्वाचे, अश्या व्यक्तीची टिंगल टवाळी न करणे अतिशय महत्वाचे ठरते.

आत्महत्त्या टाळण्यासाठी समाजाने, इतरांनी, कार्यालयातील वरिष्ठ अधिकार्यांनी, घरातील वडील व्यक्तींनी, आरोग्य विभागाने काय करायला हवे, कसे वागायला हवे, ह्यावर न संपणारी चर्चा न करता, "मी एक व्यक्ती म्हणून काय करू शकतो, ते सर्वस्वी माझ्या हातात आहे असा विचार करून, मी प्रथम माझ्या वर्तणुकीत कसा बदल घडवून आणेल, ह्याचे आत्मपरीक्षण करण्याची जास्त गरज आहे. तसेच मी एक चांगला परामर्शदाता कसा ठरू शकेल, ह्याकरिता जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे. अशी दुर्दैवी घटना माझ्या कुटुंबात देखील घडू शकेल आणी हे टाळण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याची गरज

Monday, January 17, 2011

पती-पत्नी एकाच नाण्याच्या दोन बाजू


दोन प्रसंग/अनुभव:
प्रसंग १: उच्चमध्यमवर्गीय कुटूंब, लग्नाला १५-२० वर्षे झालेली. ऑफिस मध्ये रजा टाकल्यामुळे पती घरी. छोट्या छोट्या कारणांवरून दोघांमध्ये धूसपूस, आणी रागाने पती बाहेर निघून जातो. घरातील मुलांच्या, सासूसासर्यांच्या जबाबदारया, घरातील कामे, पती समजूनच घेत नाही म्हणून ती देखील रागावलेली. संध्याकाळी तो घरी आला. खोलीत तिला पाहून पलंगावरील नीट असलेली चादर त्याने उगाच पुन्हा नीट केली, मोगरयाची चार फुले तिच्या उशीजवळ ठेवून दिली, आणी म्हणला, चुकलेच माझे, असे वागायला नको होते. ह्या शब्दांनी ती देखील विरघळली आणी म्हणली "अहो कळतोना तुमचा राग आणी धूसपूस, पण दिवसभर सर्वांसाठी राबताना केवळ तुम्हीच एकटे माझे, मग माझाही वैताग मी कोणावर काढणार?" तो म्हणला, " आज रजा होती, वाटल मोकळेपणे जगावे, तुला नाही का वाटत कधी तरी अगदी मोकळ मोकळ व्हावस, झटकून सगळी ओझी एक दिवस तरी दुसऱ्याच जगात जगावस?' ती म्हणली " बघून मोगरयाची ही फुले आणी जाणवणारे तुमचे हे प्रेम मनोमनी, जगतेच तर आहे दुसऱ्या जगात ह्या क्षणी" स्वतःचाच मग त्याला राग आला आणी डोळ्यात अश्रू आले दोन, माझ्याशिवाय हिला समजणारे दुसरे आहे तरी कोण? वाटल होत फुकट गेली आज माझी रजा, पण राग येण आणी नंतर जवळ येण हीच तर जीवनाची खरी मजा"

प्रसंग २: उच्चमध्यमवर्गीय कुटूंब, लग्नाला १५-२० वर्षे झालेली. ऑफिस मध्ये रजा टाकल्यामुळे पती घरी. छोट्या छोट्या कारणांवरून दोघांमध्ये धूसपूस, आणी रागाने पती बाहेर निघून जातो, संध्याकाळी तो घरी येतो आणी टीवी बघत बसतो. ती म्हणते, अहो चुकले माझे, बस झाला ना राग, चला जेवायला. "तूच जेव, खूप काम करतेना तूच एकटी ह्या घरात, मला नाही जेवायचे" (बाहेरून मस्त खाउन आलेलो आहे हे मात्र सांगण्यास विसरलेला). रात्रीचे ११.३०: पलंगाच्या एका कडावर नवर्याकडे पाठ करून झोपलेली ती, डोळे बंद असले तरी आसवं पीत विचार करीत पडलेली, माझे काय चुकले?. पहा ना, कशी मस्त झोपली ही, माझी काळजीच नाही, पलंगाच्या दुसऱ्या कडावर बायकोकडे पाठ करून झोपलेला तो .. उद्याचा दिवस कसा निघणार?

मध्यंतरी एक पुस्तक वाचले "Men are from Mars - Women are from Venus" पुरुष आणी स्त्री भिन्न ग्रहांवरील दोन व्यक्ती, एकंदरीतच दोघांचीही जडणघडण थोडी वेगळी, आणी विवाहानंतर ह्या दोन व्यक्ती एकत्र येणार. एकमेकांच्या समजुतीतील फरक, मतभिन्नता, समाजाकडे पाहण्याचा दृष्टीकोन, स्वतः चे अस्तित्व, स्वतः ची वयक्तिक ध्येय, ह्या सर्वांमुळे विवाहानंतर वाद विवाद, कुरबुर, भांडणे ही तर होणारच. मतभिन्नता, वाद विवाद हा विवाहित जीवनाचा एक अविभ्ज्ज्य घटक आहे. अगदी आदर्श विवाहित जोडप्यात देखील असले प्रसंग येणारच, त्यामुळे असले प्रसंग टाळण्यापेक्षा असले प्रसंग निर्माण झाल्यास त्यावर कशी तोड काढावी हे महत्वाचे ठरते.

एरीच फ्रोम म्हणतो: " मी तुझ्यावर प्रेम करतो कारण मला तुझी गरज आहे, ही अपरिपक्व प्रेमाची भाषा, तर मला तू हवी आहेस कारण माझे तुझ्यावर प्रेम आहे, ही परिपक्व प्रेमाची भाषा"
वादविवाद, भांडणावर कशी तोड काढावी ह्यावर अंकगणितासारखे २+२=४ असले उत्तर कुठेही मिळणार नाही. परंतू खालील बाबी लक्षात घेवून दोघांनीही सातत्याने जाणीवपूर्वक प्रयत्न केल्यास ही विषमता टाळणे शक्य होईल:
१. विषमता निर्माण होणारी चिन्हे आणी लक्षणे ओळखता येणे: काही तरी बिघडले आहे, मानसिक तणाव निर्माण होतो आहे. आणी हे कश्यामुळे असू शकेल ह्याचे निदान करण्याचे कौशल्य निर्माण करणे.
२. वादविवाद, विषमता अधिकच बळावू नये ह्या करिता पुढाकार घेऊन योग्य स्थळ आणी वेळ निश्चित करणे (दोघानाही सोयीची असणारी). पुढाकार कोणी घ्यावा ह्याचा नाहकच prestige issue करू नये.
३. दोघांपैकी कोणीतरी पुढाकार घेऊन ह्या वादग्रस्त विषयाची सुरवात करणे, त्याची पार्श्वभूमी जाणून घेणे, एकमेकांवर दोषारोपण न करता सकारात्मक वातावरणात चर्चा घडवून आणणे, फक्त माझेच नेहमी बरोबर असते हा अहंभाव बाजूला सारणे, शांतपणे ऐकून घेण्याची कला आत्मसात करणे. आणी सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या प्रसंगावर वादविवाद निर्माण झालेला असावा फक्त त्याच विषयावर चर्चा करणे. जुनी पुराणी जळमट, वादविवाद ह्या क्षणी पुन्हा पुन्हा उकरून न काढणे (ह्यामुळे निराशे शिवाय काहीही निष्पन्न होणार नाही)
४. विषमता निर्माण होण्यात आपण स्वतः बर्याच अंशी कारणीभूत होता असे आपल्या मनास वाटत असेल तर, ती जबाबदारी घेवून चुकलेच माझे, मी असे वागायला नको होते ह्या वाक्याने सुरवात करा. पुढील मळभ दूर होण्यास ह्यामुळे निश्चितच मदत होईल.
५. मागील असल्याच प्रसंगात दोघानीही चर्चा करून कशी तोड काढली आणी वाद कसा मिटविला, दोघे एकत्र कसे आलो होतो, ह्या सर्वांची आठवण करून, ह्या अनुभवाचा उपयोग करणे.
६. कदाचितच फक्त एकाच तोडगा दोघानाही मान्य असेल. एका पेक्षा जास्त पर्याय असतील तर दोघानाही कोणता पर्याय मान्य असू शकेल हे जाणून त्यावर सकारात्मक चर्चा करणे.
७. दोघानाही मान्य झालेला तोडगा म्हणजेच वादावर पडदा पडणे. परंतू पुन्हा पुन्हा ह्याच विषयावर विवाद निर्माण होणार नाहीत ह्या करिता जाणीवपूर्वक आपल्या स्वभावात, वर्तणुकीत बदल घडवून आणून ह्या वर्तणुकीत सातत्य राखण्याचा प्रयत्न करणे.
८. विवाद मिटल्याचा क्षण दोघांनीही आनंदाने साजरा करणे (हा कसा साजरा करायचा हे आपणासच शोधायचे आहे). एकमेकांनी केलेल्या प्रयासांची मुक्त कंठाने तारीफ करणे. त्या दिवसाचा वाद शक्यतोवर त्याच दिवशी सोडविण्याचा प्रयत्न करणे.
हे टाळा:
१. दोषारोपण
२. नावे ठेवणे (तू/तुम्ही अशीच आहे/असेच आहात, तू/तुम्ही नेहमीच)
३. आपलाच मुद्धा बरोबर आहे हेच ठासून सांगणे
४. त्याच त्याच जुन्या गोष्टी उकरून काढणे (तू/तुम्ही त्यावेळी अशी/असे वागली/वागले होती/होता)
५. विवाद निर्माण होण्या करिता आपल्या दोघांव्यतिरिक्त इतर व्यक्ती कारणीभूत असल्यास आणी त्या व्यक्ती उपस्थित नसल्यास, त्यांनी कसे वागावे ह्यावर जास्त चर्चा करणे टाळणे. कारण त्यांच्या वर्तणुकीवर आपले विशेष बंधन नसते.
६. विवादाचे स्वरूप गंभीर होण्यापर्यंत न थांबणे.
७. मीच का पुढाकार घ्यावा?
पहिला प्रसंग, छोटे छोटे विवाद, गैरसमजुती मिटविण्याकरिता, काय करता येईल, अगदी छोट्या छोट्या गोष्टी - बरेच काही आपणास शिकवून जातो. आपण प्रत्येकाने लक्षात घ्यावे, पती किंवा पत्नी हे काही दोघांचे शत्रू नाहीत. तुम्ही एकमेकांवर थोडेतरी निश्चितीच प्रेम करता, मग आपल्या प्रेमाच्या व्यक्तीसाठी कोणीतरी पुढाकार घेऊन हा विवाद मिटविण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास हे विवादाचे मळभ दूर जाऊन एक सुंदर ताराकांकित आकाश आपणास दिसावयास लागेल आणी उद्याच्या सुंदर ठरणाऱ्या दिवसाकरिता आपण अधिक उमेदीने सामोरे जाऊ.

Saturday, January 1, 2011

अकाली टक्कल - तरुणांसाठी आशेचा किरण


मध्यंतरी एक बातमी वाचली. केरळ येथील एका व्यक्तीने वनस्पतींचा अभ्यास करून एक तेल तयार केले आहे. १५ दिवसातून एकवेळा फक्त १० मिनिटे ह्या तेलाने टकलावर ६ महिने सतत मालिश केल्यास टक्कल नाहीसे होते, हा नवीन शोध. देशातील सर्वोच्य अश्या वैज्ञानिक संस्थेने ह्या तेलाचा शास्त्रीय अभ्यास करून हे तेल अतिशय परिणामकारक असल्याची आणी ह्या तेलाच्या मालिश चा आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम होत नसल्याची ग्वाही दिली. बातमी वाचून एक विचार आला? खरोखर तरुणांना पडणारे अकाली टक्कल, एक आरोग्यविषयक किंवा सामाजिक समस्या असेल काय? आणी असल्यास ह्यावर एखादा राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम राबविणे शक्य होईल काय? बराच अभ्यास केल्यानंतर ही समस्या किती गंभीर आहे ह्याची माहिती मिळाली, त्यातील काही निष्कर्ष:
१. अकाली टक्कल - तरुणांमध्ये निर्माण होणारया मानसिक विकृतीचे महत्वाचे कारण. टक्कल असणारे तरुण जेव्हा सुंदर केस असणारया आपल्या मित्रांसोबत तुलना करतात, त्यामुळे त्यांच्यात एक प्रकारचा मानसिक न्यूनगंड निर्माण होतो.
२. विवाहाकरिता मुलीने नकार दिलेल्या अनेक कारणांपैकी, तरुणाला असलेले टक्कल हे एक अतिशय महत्वाचे कारण.
३. केवळ टक्कल असल्यामुळे, शिक्षित असूनही तथा आवश्यक सर्व कौशल्य असूनही, नौकरी न मिळाल्याची अनेक उदाहरणे.
४. टक्कल असल्यामुळे त्यांना सतत हिणवत असल्यामुळे, समाजावरील त्यांचा राग आणी त्यातून असामाजिक आचरणाकडे वळण्याची त्यांची वृत्ती.
५. मुंबई येथील एका अभ्यासाचा निष्कर्ष: रस्त्यांवरील अपघातात मृत्त्यू पैकी ६५% टक्कल असणारे (केसांचे आच्छादन नसल्यामुळे हेड इंज्युरीचा जास्त धोका)
६. विवाहित टक्कल असणारया तरुणाला त्याची पत्नी सतत हिणवत असते, प्रणयाचे वेळी तिला त्याच्या केसातून हात फिरविण्याची संधी मिळत नाही .. ह्यातून निर्माण होणारा दुरावा.
७. अर्धवट टक्कल, डोक्यावर थोडेसे केस, आणी ह्या केसांनी सतत टक्कल झाकण्याचा प्रयत्न. त्यामुळे सतत कामाकडे होणारे दुर्लक्ष. किंवा, टक्कल झाकण्यासाठी विगचा वापर, त्याचे वेगळेच टेन्शन (माझ्या एका मित्राचा विग मोटारसायकल चालविताना उडून गेला आणी मागे उभ्या असलेल्या गाई ने खाल्ला)
८. एका अभ्यासाचा निष्कर्ष: ३२% युवकांना अकाली टक्कल
म्हणजे, ही एक निश्चितच आरोग्य विषयक समस्या ठरू शकते. शिवाय, ३२% युवकांना अकाली टक्कल, ह्याचा दुष्परिणाम कंगवे, शाम्पू , तेल ह्यांच्या विक्रीवर. देशाचे आर्थिक नुकसान. म्हाल्यांच्या धंद्यावरही विपरीत परिणाम. आणी, ह्या सर्व विचारातून, अभ्यासातून निर्माण झाला एक राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम " राष्ट्रीय अकाली टक्कल उपचार कार्यक्रम". ह्या कार्यक्रमाची अंमलबजावणीची थोडक्यात रूपरेषा:
१. राष्ट्रीय लसीकरण कार्याक्रसोबातच हा कार्यक्रम राबविला जाणार (कारण लसीकरणासाठी आरोग्य कर्मचारी १५ दिवसातून एक वेळा गावात जात असतात).
२. जनगणनेच्या वेळी टक्कल असणारया तरुणांची गणना (पूर्ण टक्कल, अधर्वट टक्कल ह्यांचे वर्गीकरण).
३. आरोग्य सेविकेला तेलाचा पुरवठा (वापरा आणी फेका ह्या तत्वावर असणारया १० ml च्या कुप्या).
४. लसीकरण सत्राचे वेळी टक्कल असणारया तरुणांनी येण्याकरिता मोठ्या प्रमाणात आरोग्य शिक्षण मोहीम ( ह्या करिता उत्कृष्ठ घोषवाक्क्ये तयार करणार्यांना विशेष बक्शिश - विचार करा आणी सुचवा चांगली घोषवाक्क्ये) .
५. लसीकरण सत्राचे वेळी १५ दिवसातून एकदा येणाऱ्या टक्कल असणारया तरुणांची आरोग्य सेविकेद्वारे तेलाने १० मिनिटे मालिश. मालिश करण्याकरिता आपल्या मैत्रिणीला आणण्याची तरुणांना मुभा. विवाहित टकले त्यांच्या पत्नी सोबत येतील, सोबत मुलानाही लसीकरणासाठी आणतील)
(थोडा वेळ डोळे बंद करून वरील चित्र आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न करा - आहा हा - काय सुंदर चित्र - स्त्रिया मुलांना पोलियो, ट्रिपल च्या लसीकरणासाठी घेवून आलेल्या आहेत, लसी करणानंतर मुले खेळत आहेत, टकल्या नवर्यांना बायका डोक्यावर तेल चोळत आहेत, आरोग्य सेविका काही टकल्या तरुणांचे मालिश करीत आहेत (ह्या प्रसंगातून ह्या टकल्यानंचे आणी आरोग्य सेविकेच्या विवाहाचे योग जुळून येण्याची शक्यता) , काही अविवाहित टकले आपल्या प्रेयसी सोबत आलेले आहेत, कोपर्यात जावून प्रेयसी त्यांना मालिश करीत आहे ...)

राष्ट्रीय अकाली टक्कल उपचार कार्यक्रम - फायदे:
१. लोकांच्या गरजांवर आधारित एकमेव उपचारात्मक कार्यक्रम (बरेच राष्ट्रीय कार्यक्रम प्रतिबंधात्मक आहेत)
२. मालिश चा फायदा दिसत असल्यामुळे, लोकांचा आरोग्य सेवेवरील विश्वास वाढेल, त्यामुळे, इतर आरोग्य कार्यक्रम देखील यशस्वीरीत्या राबविले जातील.
३. उपचार कार्यक्रमामुळे, तरुणांमधील नैराश्यतेचे तथा मानसिक आजारांचे प्रमाणात कमी, असामाजिक आचरणाकडे वळण्याच्या वृत्तीत बदल.
४. मालिश करण्यासाठी तरुण मुलीनी पुढाकार घेतल्यास, प्रेम विवाह आणी हुंड्याचे प्रमाण कमी होण्यास मदत.
५. कंगवे, शाम्पू, तेल ह्यांच्या विक्रीत वाढ होवून देशाची आर्थिक उन्नती.
६. टक्कल नाहीसे झाल्यामुळे अधिक उमेदीने कामावर लक्ष केंद्रित, राष्ट्राच्या विकासात हातभार.
७. तेलाच्या निर्मितीचे गृहउद्ध्योग कारखाने - त्यामुळे राष्ट्राच्या आर्थिक विकासाला हातभार.

टीप: हा लेख वाचून, राष्ट्रीय कार्यक्रमाच्या नियोजनात, अंमलबजावणीत अभिनव कल्पना सुचविणाऱ्या वाचकांना राष्ट्रपती तर्फे पारितोषक दिले जायील.

ताजा कलम: तेलाच्या खरेदीत प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा तथा ह्या तेलाच्या परिणामकारकतेबद्धल विरोधी पक्षांनी आरोप केल्यामुळे, सध्या भारत सरकारने हा कार्यक्रम सुरूच केलेला नाही. कृपया लेख वाचून नाहकच गंभीरपणे विचार करू नका, शिल्लक असलेले केस गळून पडतील.