
१९७९ मध्ये मी नागपूर जिल्ह्यातील कचारीसावंगा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी ह्या पदावर कार्यरत होतो. डॉ. सपकाळ आमचे जिल्हा आरोग्य अधिकारी. एक वादग्रस्त व्यक्तिमत्व, पण खऱ्या अर्थाने व्यवस्थापन कौशल्य शिकावयाचे झाल्यास त्यांचे कडून शिकावे असे डॉ. सपकाळ. वेळप्रसंगी प्रशासनातील कायदे, नियम बाजूला सारून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना सतत मदत करणारे. त्यांचे दौरे मात्र संध्याकाळचे. संध्याकाळी ४-५ वाजता प्राथमिक आरोग्य केंद्रात २-३ मित्रांसोबत येणार, कामाची तपासणी, चर्चा केल्यानंतर मुक्काम करणार आणी दुसऱ्या दिवशी सकाळी नागपूरला परत जाणार. एकदा असेच सकाळी नागपूरला परत जाताना मलाही काही काम असल्यामुळे त्यांचेसोबत जाण्याची त्यांना विनंती केली आणी त्यांचेसोबत नागपूरला निघालो. त्याकाळी जिल्हा आरोग्य अधिकार्याची पांढरी raunold कार सर्वाना माहित असावयाची. कारण इतर सर्व जिल्हा स्थरावरील अधिकाऱ्यांच्या वाहनापेक्षा ही कार एक वेगळीच होती. काटोल मार्गे आम्ही नागपूर ला जाण्यास निघालो. रस्त्यात कळमेश्वर हे प्राथमिक आरोग्य केन्द्र आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात आणी रस्त्यावर २००-३०० माणसांची गर्दी. जिल्हा आरोग्य अधिकार्याची पांढरी कार बघून लोकांनी वाहन अडविले. स्थानिक वैध्यकीय अधिकार्याच्या विरोधात नारेबाजी सुरु केली. ही सर्व परिस्थिती का घडली त्याची पार्श्वभूमी:रात्री गावातील एक महिला प्रसुतीकारिता रुग्णालयात दाखल झाली. सकाळी तिची प्रसूती झाली आणी प्रसुतीनंतर तिला खूप रक्तस्त्राव सुरु झाला. वैध्यकीय अधिकार्यांनी तपासून काही जुजबी उपचार सुरु केलेत आणी अर्ध्या तासानंतर रक्तस्त्राव खूप प्रमाणात सुरूच असल्यामुळे आणी रुग्णाची सर्वसाधारण स्थिती गंभीर होत असल्यामुळे रुग्णांच्या नातेवायीकाना तिला तत्काळ नागपूर येथील वैध्यकीय महाविध्यालयात पुढील उपचारासाठी घेऊन जाण्याच्या सल्ला दिला. दुर्दैवाने त्यापूर्वीच रुग्णाचा मृत्त्यू झाला. थोड्याच वेळात १०-१२ लोक जमा झालेत. जनसमुदायाची नेहमीच आढळणारी मानसिकता. कोणत्याही परिस्थितीची शहानिशा न करता, डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे ही स्त्री दगावली, ही चुकीची बातमी वार्यासारखी गावात पसरली. १५-20 मिनीटातच १५०-२०० लोक गोळा झालेत. डॉक्टरच दोषी, मारा त्यांना, जाळून टाका हे केन्द्र, ही चर्चा आणी समुदायाची मानसिकता अधिकच भडकत गेली. डॉक्टरांनी घाबरून स्वतःला एक खोलीत कोंडून घेतले. दवाखान्यावर दगडे मारून काचा फोडल्या गेल्यात. आणी तेव्हाच आम्ही तेथे पोहचलो होतो. डॉ. सपकाळ हे जमावाच्या मध्यभागी गेलेत. कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. जमाव साहजिकच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तेवढ्यात २-३ लोकांनी रॉकेल च्या डबक्या देखील आणल्यात. बस.. जला दो, जला दो च्या घोषणा ऐकत येत होत्या. तेवढ्यात २-४ लोकांनी नारेबाजी सुरु केली, हे अधिकारी आता त्यांच्याच अधिकार्याला पाठीशी घालणार. "उनकी गाडी भी जला दो" जोर जोऱ्यात घोषणा सुरु झाल्यात. तेवढ्यात पोलीस ची गाडी ४-५ पोलिसांसह दवाखान्याच्या आवारात शिरताना दिसली. पोलिसांना बघून लोकांना अधिकच उधान आले, घोषणाबाजी सुरूच होती. आणी मग डॉ. सपकाळ ही काय चीज आहे ह्याची चुणूक दिसली. सर्वप्रथम त्यांनी पोलीस आणी त्यांची गाडी दवाखान्याच्या आवाराच्या बाहेर नेण्याचे आदेश दिलेत. एका माणसाच्या हातून रॉकेल चा डबा हिसकला, आणी कोणाच्याही लक्षात येण्यापुर्वीच स्वतःच्या गाडीवर आणी दवाखान्याच्या बाहेरील भिंतीवर डब्यातील रॉकेल भिरकविण्यास सुरवात केली. आणी आपल्या वाहन चालकास म्हणले " आन रे काडी पेटी, मीच प्रथम आग लावतो. लोकांना कळलेच नाही काय होतंय ते, क्षणात नारेबाजी थांबली. मग त्यांनी बोलण्यास सुरवात केली. त्या दुर्दैवी स्त्रीच्या मृत्यूस जर डॉक्टर जबाबदार असतील तर ह्या रुग्णालयाला मीच आग लावतो, तुम्ही कशाला तसदी घेता. नंतर, पोलीस इन्स्पेक्टर ला बोलावले, आतून डॉक्टर ला बाहेर काढले, पोलिसांना आदेश दिलेत, ह्या डॉक्टर विरुद्ध गुन्हा नोंदवून तत्काळ ह्यांना नागपूर ला पोलीस मुख्यालयी घेवून या. मला म्हणले, "देवा, १ तासात संपूर्ण निपक्षपाती चौकशी कर, कर्मचाऱ्यांचे, नातेवायीकांचे statements घे, आणी सर्व अहवाल तयार कर, तो पर्यंत मी येथेच थांबतो. लगेच नागपूर ला फोन करून वरिष्ठ अधिकार्याशी बोललेत. जमावाच्या मध्य भागी खुर्ची टाकून बसलेत आणी तेथेच स्थानिक लिपिकास डॉक्टरांचे निलंबनाचे आदेश टाईप करून आणण्याची सूचना दिली. स्वतःला अधिकार नसताना देखील ह्या आदेशावर स्वाक्षरी केली. सोबतच जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत येत आहे हे बघून त्यांचेही प्रभोदन करण्यास सुरवात केली. जमाव हळू हळू शांत झाला आणी ३० मिनीटातच जमावाची पांगापांग झाली. कधीही कल्पना देखील करू शकणार नाही असा हा मला आलेला अनुभव.२ तासानंतर आम्ही नागपूरला जाण्यास निघालो. मी म्हणलो, "सर, चौकशी अंती मला तरी डॉक्टर चा काहीच दोष दिसत नाही. उगाच आपण त्यांना निलंबनाची शिक्षा दिली आणी पोलिसांच्या गाडीत नागपूरला पाठविले" सर म्हणले, "जमावाला विवेकबुद्धी नसते, जमावाचे मानस शास्त्र जर आपण जाणले नसते तर कदाचित त्या क्षणी खरोखरच दवाखाना पेटवून दिला असता आणी डॉक्टरांना मारहाण देखील केली असती". दुपारी नागपूरला त्यांच्या कार्यालयात आलो तेंव्हा ते वैध्यकीय अधिकारी तेथेच बसले होते. फार घाबरले होते ते. डॉ. सपकाळ ह्यांनी त्यांना समजावून सांगितले, म्हणले तुम्ही निलाब्मित वगेरे काही झाला नाही आहात. तुमचा काहीच दोष नसल्यामुळे मी पूर्णपणे तुमच्या पाठीशी आहो. १५ दिवस आराम करा, परिस्थिती निवळेल, नंतर मीच तुम्हाला त्याच केंद्रात घेवून जायील. १५ दिवसांनी त्यांनी कळमेश्वर ला पंचायत समिती सभागृहात एक सभा बोलाविली. स्थानिक लोक प्रतिनिधी आणी इतर मान्यवर उपस्थित होते. डॉक्टर कसे बरोबर होते, त्यांचे काहीच चुकले नाही, दुर्दैवाने प्रसुतीपश्चात खूप रक्तस्त्राव झाल्यास ५-१० मिनिटात देखील मृत्यू होऊ शकतो, लोकांना समजावून सांगितले. तसेही त्या डॉक्टर बद्धल लोकांचे पूर्वमत चांगले असल्यामुळे त्यांना पुन्हा कामावर रुजू होऊ देण्यास कोणाचाच आक्षेप नव्हता. हेच डॉक्टर नंतर सेवानिवृत्त होत पर्यंत तेथेच होते आणी नंतर ही तेथेच स्थायिक झालेत.वरील प्रसंग, काय करावे, कसे वागावे, कोणत्याच व्यवस्थापनाच्या पुस्तकात ह्या बद्धल निश्चित सूचना नसतील. डॉक्टर सपकाळ ह्या प्रसंगी वागलेत ते योग्य कि अयोग्य, ह्यावर देखील चर्चा होऊ शकेल. परंतू त्या आकस्मिक स्थितीत त्यांनी दाखविलेले धैर्य, प्रसंगावधान आणी आपल्या अधिकार्याची चूक नाही तर त्याचे पाठीशी उभे राहणे, खरोखरच वाखाणण्यासारखे होते. केवळ डॉ. सपकाळ सारखी व्यक्तीच असे करू शकेल. परंतू, आकस्मिक स्थितीत लोकांच्या भावना अधिक न भडकावता, प्रसंगावधान दाखविणे कसे शक्य होते हे मात्र मी त्या प्रसंगातून शिकलो.