- २२ वर्षीय विवाहित महिलेची अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेवून आत्महत्त्या - संभाव्य कारण "हुंडा"
- विषप्राशन करून २ शेतकऱ्यांची आत्महत्त्या - ? कर्जबाजारी
- दिराच्या लैंगिक छळवादाला कंटाळून फाशी लावून नवविवाहितेची आत्महत्त्या
- २ कॉलेज विध्यार्थांची हाताची नस कापून आत्महत्त्या - प्रेमातील अपयश - संभाव्य कारण
- ७ व्या माळ्यावरून उडी मारून एका तरुण म्यानेजर ची आत्महत्त्या - कामातील असःह्य झालेला ताणतणाव
- एका हॉटेल मध्ये नवविवाहित जोडप्याची झोपेच्या गोळ्या खावून आत्महत्त्या - संभाव्य कारण "अंतरजातीय विवाह"
- चालत्या गाडीतून उडी मारून एका तरुणाची आत्महत्त्या - संभाव्य कारण " लैंगिकदृष्ट्या असमर्थता"
- समुद्रात बुडून एका व्यापाऱ्याची आत्महत्त्या - संभाव्य कारण " मित्राने केलेली फसवणूक आणी धंद्यात खोट"
- वेल्लोर मेडिकल कॉलेज मधील एका कौनसिलर ची आत्महत्त्या - सतत परामर्श देताना झालेला असःह्य ताणतणाव
वर्तमानपत्र वाचताना किंवा टीवी बघताना सातत्याने दिसणाऱ्या ह्या बातम्या. २००९-२०१० चा गुन्हे विभागाचा अहवाल - गेल्या दशकात आत्महत्येचे प्रमाण १ लक्ष लोकसंखेमागे ८.४७ वरून ११.२७ इतके वाढलेले. अहवालानुसार एका वर्षात ११०५८७ आत्महत्यांची नोंद. दररोज ३१० आणी प्रत्येक ५ मिनिटाला एका आत्महत्येची नोंद. सर्वसाधारणपणे पुरुष आणी स्त्रया ह्यांचे आत्महत्येचे प्रमाण १.२ मागे १.००, परंतू १५ ते २९ वयोगटात हेच प्रमाण ०.८ मागे १.५. दूरदैवाची बाब म्हणजे केरळ सारख्या भारतातील सामाजिक - सांस्कृतिक पुढारलेल्या आणी १००% स्त्रियांची साक्षरता असणाऱ्या राज्यात हेच प्रमाण १ लक्ष लोकसंखेमागे ३१. आणी सर्वच क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या बंगलोर शहरात हेच प्रमाण १ लक्ष लोकसंखेमागे ३४. अंगावर शाहरे आणणाऱ्या ह्या बातम्या आणी ही आकडेवारी. खरोखरच आम्ही सुशिक्षित, सकारात्मक विचारसरनीचे झालेलो आहोत काय? आणि ही आकडेवारी फक्त नोंदी झालेल्या घटनांची, पोलिसांच्या आणी इतर अनेक दबावांमुळे कितीतरी घटनांची नोंदच होत नाही, ही वस्तुस्थिती. कदाचित एका मोठ्या हिमनगाचा हा एक वरवर दिसणारा भाग. आत्महत्येने नोंद झालेल्या मृत्यूंच्या १० ते २०% जास्त आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांचे प्रमाण, आणी ३०-४०% जास्त आत्महत्येचा विचार सतत मनात असणारयांचे प्रमाण (अश्या व्यक्ती त्यांच्या कामांवर संपूर्ण लक्ष केंद्रित करून, त्यांच्या कडून अपेक्षित असणारे कार्य करू शकतील काय? त्याचा विपरीत परिणाम देश्याच्या सर्वांगीण प्रगतीवर होईल काय?) . एक शास्त्रीय आकडेवारी. खरोखरच भयंकर आहे ही आकडेवारी. आणी, असं कां घडाव हा एक मोठा यक्षप्रश्न?
कौटुंबिक समस्या, लैंगिक समस्या, सामाजिक - सांस्कृतिक - आर्थिक समस्या, दीर्घ आजार, मानसिक आजार, बेरोजगार, कामाच्या ठिकाणी सतत असह्य होत असलेला ताणतणाव, खाजगी क्षेत्रात कार्य करताना अपेक्षित कामाची सततची मागणी आणी त्यातून निर्माण होणारी विफलता, विशेषतः खाजगी क्षेत्रात कार्य करताना नौकरिची सतत अशास्वती, प्रेमभंग, परीक्षेतील अपयश, लैंगिकतेवर आधारित स्त्रियांवर होणारे अत्त्याचार ... ही सर्व साधारणपणे नोंद झालेली आत्म्हत्त्येची कारणे. परंतु ह्या सर्वामागील पार्श्वभूमी, मुलभूत कारणे, आत्म्हत्त्येस प्रवृत्त करणारी परिस्थिती कदाचित वेगळीच असू शकेल, त्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे काय? कारण अनेक वेळा पोलीस नोंदीत असणारया कारणांवर आपलाच विश्वास बसत नाही.
आरोग्य हा जर प्रत्येकाचा मुलभूत अधिकार आहे, आणी, आरोग्याच्या व्याखेत जर मानसिक आरोग्याचा समावेश आहे, तर खऱ्या अर्थाने आपण स्वतः आरोग्य म्हणजे काय हे समजून घेतो काय आणी ते प्राप्त करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतो काय? आत्महत्येचे वाढते प्रमाण हे समाजाच्या खालावलेल्या प्रवृत्तीचे द्योतक आहे. एकीकडे सगळीकडे दिसणारी/ जाणवणारी सामाजिक - आर्थिक उन्नती तर दुसरीकडे आत्महत्येचे वाढते प्रमाण, हा एक मनाला न पटणारा विपर्यास.
जर आत्म्हत्त्येस जबाबदार असणारे सकृतदर्शनी कारण, त्या मागील पार्श्वभूमी, सामाजिक - सांस्कृतिक - आर्थिक समस्या, ह्या सर्वांचा विचार केल्यास, एका करणामागील अनेक उपकारणे, प्रत्येक उपकारणांची पुन्हा उपकारणे, ह्या सर्वांचा विचार करून, वर्तनुकिंची एक समजून उमजून दिशा निश्चित कारणे आणी त्या प्रमाणे सातत्याने वर्तणूक अंगीकार करणे आवश्यक ठरते. बरेच वेळा आत्महत्त्या करणाऱ्या व्यक्तीत त्याच्या वागण्यात काही बदल झालेले जाणवू शकतात. त्यावर वेळीच उपाय योजना केल्यास ही आत्महत्त्या टळू शकते. आपल्या कुटुंबात, मित्र मंडळीमध्ये , कार्याचे ठिकाणी, आपल्या आजूबाजूच्या व्यक्तीत जाणविणारे खालील बदल भविष्यातील धोक्याची घंटा ठरू शकतात:
- नेहमीच्या वर्तणुकीत अचानक जाणवणारा बदल, झोप न लागणे किंवा खूप वेळ झोपतच राहणे
- आपल्या कामावर लक्ष केंद्रित न करणे
- विनाकारण चिडचिड, निराशा, वैफल्यता, इतरांपासून एकटे राहण्याची प्रवृत्ती, अचानकच जडणारी व्यसनाधीनता.
- जीवनात काहीही ठेवले नाही, माझी कोणालाच गरज नाही, सर्व माझ्या विरोधातच आहेत, मी कोणाच्याच उपयोगाचा राहिलेलो
नाही, मला आत्महत्त्या करावीशी वाटते, अश्या प्रकारची सतत भाषा वापरणे .
ह्या अश्या प्रकारच्या वर्तणुकीतील बदल जाणवल्यास, सर्व प्रथम अश्या व्यक्तींचे शांत पणे ऐकून घेणे, कारण शोधण्याचा प्रयत्न करून त्या करिता काही करता येईल काय हा विचार करणे, अश्या व्यक्तींना शक्क्यतोवर एकटे न सोडणे, योग्य परामर्शदात्याची भूमिका वठविणे, गरज भासल्यास मानसिकतज्ञ सल्ला, आणी सर्वात महत्वाचे, अश्या व्यक्तीची टिंगल टवाळी न करणे अतिशय महत्वाचे ठरते.