Wednesday, March 20, 2013

देव आहे?




हिमालय पर्वताच्या एका शिखरावरील चौकीवर posting झाल्यामुळे १५ शिपाई मेजर साहेबांसोबत base camp  पासून निघाले होते. ३ महिन्यासाठी ह्या शिखरावरील चौकीवर त्यांचे posting झाले होते. ह्या चौकीवर असणारा troop त्यांची आतुरतेने वाट बघत होता, कारण हा नवीन  troop तेथे पोहचल्यानंतर त्यांना  base camp  वर परत येता  येणार होते. त्यातील काही रजेवर जाण्याची, आपल्या कुटुंबियांना भेटण्याची स्वप्न बघत आशेने नवीन येणाऱ्या  troop वाट बघत होते, आपले कार्य आपण चोख बजावले ह्याचा आनंदही त्यांचे चेहऱ्यावर होता. 

base camp  पासून पर्वताच्या शिखरावरील चौकीवर पर्वतारोहण करून पोहचण्याचा मार्ग अतिशय कठीण आणि जिकरीचा होता. सकळी निघाल्यानंतर हा troop दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पोहोचणार होता. रस्त्यातील जीवघेणी थंडी आणि मधूनच होणारा हिमवर्षाव, त्यांचे मार्गक्रमणात बाधा आणत होता. रात्रीचे दोन वाजले होते, थंडीने सर्व गारठले होते, "आता ह्या वेळी गरम चहा मिळाला तर किती बरे होईल", मेजरच्या मनात सुखद विचार आला. परंतु ही सुखद  इच्छा पूर्ण होणे शक्य नाही हे देखील मेजर साहेबाना ठाऊक होते. ह्याच विपरीत परिस्थितीत चढाई करताना एक तासाने त्यांना एक टपरीवजा झोपडे दिसले. तेथे कदाचित चहा मिळेल ह्या आशेने जवळ गेल्यानंतर त्या झोपडीला कुलूप दिसले. झोपडीचा मालक शोधावा तर जवळपास कोठेही एखादेतरी घरही दिसत नव्हते. "Boys, चहा मिळायची आशा आता सोडा, थोडावेळ विश्रांती घेऊन पुन्हा चढायीला निघू या!", मेजर साहेबांचे फर्मान. " सर, हे निश्चितच चहाचे दुकान दिसतंय, आपण हे कुलूप तोडून चहा बनवू काय?" एका शिपायाची विनंती. 

सर्व शिपाई आतिशय थकलेले पाहून आणि आता सर्वाना हुशारी/तरतरी येण्याकरिता चहाची निश्चितच आवश्यकता आहे हे जाणून,  बुद्धीला न पटणारे होते तरी मेजर साहेबांनी कुलूप तोडण्याचे आदेश दिलेत. कुलूप तोडले गेले. सर्व खूप भाग्यशाली होते, दुकानात चहाचे सर्व साहित्य आणि बिस्किटांची काही पाकिटे देखील उपलब्ध होती. चहा करून सर्वांनी गरमागरम चहा पिला, सोबत काही बिस्किटे देखील खाल्लीत. ताजेतवाने होवून पुढील मार्गक्रमणासाठी सर्व तयार झालेत. मेजर साहेब मात्र चिंतेत होते, आपण हे चूक केलेत हे त्यांना जाणवत होते. चहाचे पैसे घेण्यासाठी देखील आजूबाजूला कोणीच नव्हते. आपण शिस्तबद्ध सैनिक आहोत, कोणी चोर नव्हेत हे मेजर साहेबाना जाणवत होते.  त्यांनी खिश्यातून १००० रुपयांची नोट काढली, टेबलवरील साखरेच्या डब्याखाली सहज दिसेल अश्या रीतीने ठेवली आणि नंतर झोपडीचे दर बंद करून पुढील मार्गक्रमण सुरु केले.   

चौकीवर पोहचल्यानंतर, दिवस, आठवडे, महिने निघून गेलेत, त्यांना नेमून दिलेले कार्य त्यांनी आगदी प्रामाणिकपणे यशस्वी केले. तीन महिन्यानंतर दुसरा troop त्यांना relieve करण्यासाठी आला आणि ते  base camp ला परत निघाले. परत येताना रस्त्यातील त्या झोपडीपाशी थांबले, झोपडीचे दर उघडे होते. एक गरीब म्हातारा झोपडीत बसला होता. १५-१६ लोक झोपडीकडे येताना पाहून आता किमान १५-१६ चहाची विक्री होऊन पैसे मिळतील ह्या आशेने त्याचा चेहरा उजळला. चहा पिल्यानंतर गप्पांचा ओघ सुरु झाला, बराच वेळ गप्पा मारल्यानंतर म्हातारा झोपडीतील एका कोपऱ्यात जावून नमाज पढू लागला. नमाज पूर्ण झाल्यानंतर गप्पांचा ओघ " देव आहे काय? देवावरील विश्वास" ह्या विषयाकडे वळला. सैनिकच ते, देव नाहीच, नुसते एक थोतांड आहे, हे आपले म्हणणे म्हाताऱ्याला पटवून सांगत होते. शांतपणे ऐकल्यानंतर म्हातारा म्हणला " देव निश्चितच आहे, मला अनुभव आलेला आहे, मी हे सिद्ध करू शकतो",  म्हातार्याने त्याचा अनुभव कथन केला. " नाहक संशय घेवून तीन महिन्यांपुर्वी माझ्या एकुलत्याएक मुलाला काही अतिरेक्यांनी खूप मारहाण केली. माहित झाल्यानंतर लगेच दुकान बंद करून मुलाला दवाखान्यात नेले. औषधांसाठी काहीच पैसे नव्हते, त्यामुळे औषधाधोपचाराविनाच मुलाला घरी आणले. आता काय करावेत ह्याच विवंचनेत होतो, शेजाऱ्यांना उधार पैसे मागितले, पण अतिरेक्यांच्या  धाकामुळे कोणीही पैसे देण्यास तयार झाले नाहीत. रात्रभर विचार करून तळमळत होतो. सकाळी दुकानांत गेलो आणि बघतो काय तर देवाने दुकानाचे कुलूप उघडले होते आणि साखरेच्या बरणीखाली १००० रुपयांची नोट ठेवून तो निघून गेला होता. आता तुम्ही सर्व मला सांगा देव आहे कि नाही?" "देवावरील विश्वास", सर्व सैनिक मेजर साहेबांकडे बघत होते, आणि डोळ्यांनीच कोणीही काहीही बोलायचे नाही ही सूचना मेजर साहेबांनी केली.

चहाचे पैसे म्हाताऱ्याला दिलेत, सर्वांचे डोळे पाणावले होते,मेजर साहेबांनी म्हाताऱ्याला घट्ट मिठी मारली आणि म्हणले, " होय बाबा, देव आहे आणि निश्चितच त्याचे अस्तित्व आहे". मनात विचार केला, आपल्या पैकी कोणीही, कधीही, कोणासाठीतरी "देव" होऊ शकतो.