Thursday, January 24, 2013

मला घटस्फोट हवाय


त्या दिवशी रात्री घरी परत आलो तेंव्हा  माझ्या पत्नी, जेन सोबत  भोजन करताना मी तिचा  हात हातात घेतला आणि म्हणलो, " मला, तुला काही सांगावयाचे आहे " ती शांतपणे काही न बोलता जेवत होती, पुन्हा मला तिच्या वेदना तिच्या डोळ्यातून जाणवत होत्या. विषयाला कशी सुरवात करावी मला समजत नव्हते. परंतु मी जो विचार करीत होतो तो तर मला तिला सांगावयाचाच होता. मी अतिशय शांतपणे म्हणलो, " ला घटस्फोट हवाय". माझ्या ह्या शब्दांनी काहीही विचलित न होता तो अगदी शांतपणे म्हणली, "कां ?" 

मी तिच्या प्रश्नांचे उत्तर न देत काहीही न बोलता शांत राहिलो. त्यामुळे तिचा राग अनावर झाला. टेबलवरील  चमचे जोराने फेकून अतिशय त्राग्याने ती  माझ्यावर ओरडली, " तू माणूस नाहीस". त्या रात्री आम्ही एकमेकांशी काहीच बोललो नाही, रात्रभर ती रडत होती. मला कळत होते कि तिला जाणून घ्यावयाचे आहे कि आपल्या वैवाहिक आयुष्यात असे काय घडले कि तू म्हणतोय  " मला घटस्फोट हवाय". मी तिला काहीच समाधानकारक उत्तर देवू शकत नव्हतो. मी मेरीवर प्रेम करावयाला लागलो होतो आणि त्यामुळेच जेनवर आता माझे काहीच प्रेम राहिलेले नाही ह्याचा मला ठाम विश्वास झाला होता. त्या क्षणी मला जेनची फक्त दया येत होती.

एका अपराधी भावनेने मी घटस्फोटाची सर्व कागदपत्र तयार केलीत. घर, कार, सर्व संपत्तीचा ८०% वाटा, कंपनी चे ८०% शेअर्स जेन च्या नावे , घटस्फोटाच्या कागदपत्रात ह्या सर्वांचा उल्लेख केला.जेनने हि  कागदपत्र पहिली, वाचली आणि तत्काळ फाडून टाकली. १० वर्ष ज्या जेन सोबत मी राहत होतो ती मला आता अनोळखी वाटावयास लागली. परंतु मेरीवर माझे एवढे प्रेम होतो कि मी आता कुठलीच माघार घ्यावयास तयार नव्हतो. आणी माझ्या अपेक्षेप्रमाणे जेन थोड्या वेळातच जोरजोराने रडावयास लागली. पण, ह्या सर्वांचा आता माझ्यावर काहीच परिणाम होणारा नव्हता, कारण मेरीवर माझे इतके प्रेम जडले होते की त्यापुढे जेनच्या कोणत्याही भावना जाणून घेण्याच्या मी मनस्थितीतच नव्हतो. 

दुसऱ्या  दिवशी संध्याकाळी घरी आलो तेव्हा जेन टेबलवर काही तरी लिहित होती. संपूर्ण दिवस मेरीसोबत अतिशय आनंदाने गेल्यामुळे मी काहीही न बोलता झोपावयास निघून गेलो. सकाळी जागे झालो तेव्हाही जेन टेबलवर काहीतरी लिहीतच होती. सकाळी तिने घटस्फोटाच्या तिच्या अटी माझ्यासमोर मांड्ल्या. तिला माझ्याकडून काहीच नको होते, फक्त घटस्फोटासाठी एक महिन्याचा कालवधी तिला माझ्याकडून हवा होता. आणि ह्या  कालावधीत दोघांनीही अगदी नेहमीप्रमाणे आयुषः जगावयाचे. अगदी साधे कारण, पुढील एक महिन्यात मुलाची परीक्षा होती आणि घटस्फोटाच्या कालवधीत अभ्यासापासून कोणत्याही परिस्थितीत तिला आपल्या मुलाला विचलित होऊ द्यावयाचे नव्हते. मी ह्या अटींना तत्काळ मान्यता दिली. तिला अजून काही सांगावयाचे होते. ती म्हणली, "आठवं, लग्नाच्या दिवशी रात्री किती प्रेमाने तू मला उचलून आपल्या bedroom मध्ये घेवून गेला होतास?". ती म्हणली, "पुढील एक महिन्यात रोज तू मला सकाळी तसेच  उचलून आपल्या bedroom  मधून खाली hall मध्ये आणावयाचे आहे".  मला वाटले, "हि वेडी तर झाली नाही ना?". म्हणलो, "चला एकाच तर महिना आहे, हिची हि मुर्खासारखी अट देखील मान्य करू या!"

दुसऱ्या दिवशी मेरीला हि अट सांगितली. जेनच्या मूर्खपणाला ती हसली आणि म्हणली, "आता जेनने काहीही नाटक केली तरी आपले लग्न हे होणारच" 

जेनचे आणि माझे ह्या एक महिन्याच्या कालवधीत शारीरिक संबध असण्याचा प्रश्नच नव्हता, आणि ह्या सर्व पार्श्वभूमीवर दुसऱ्या दिवशी सकाळी   bedroom  मधून  खाली hall मध्ये जेनीला उचलून आणताना दोघानाही संकोच वाटत होता. पण, हे दृष्य बघून मुलाला मात्र फार आनंद झाला आणि तो आनंदाने टाळ्या वाजवू लागला. उचलून आणताना डोळे बंद करून ती म्हणली, ' कोणत्याही परिस्थितीत मुलाला आपल्या घटस्फोटाविषयी काहीही बोलू नकोस". दुसऱ्या दिवशी उचलून आणताना हा संकोच थोडा कमी झाल्यासारखे मलाच वाटत होते. तिच्या Blouse चा सुगंध मनाला थोडा सुखावितही होता. मनात विचार आला, " किती दिवसांपासून मी जेनकडे काळजीपूर्वक बघितले देखील नाही. ती आता काही तरुण राहिली नव्हती, चेहऱ्यावर थोड्या सुरकुत्या दिसत होत्या, काळ्या केसांमधून काही पांढरे केस डोकावीत होते. ह्या दहा वर्षात आपल्या संसारासाठी किती सोसले तिने, किती झिजली ती! आणि मी तिला काय देवू शकलो, मी तिच्यासाठी काय केलेत?". 

५व्या-६व्या दिवशी उचलून आणताना एक अनामिक जवळीक, आपुलकीची संवेदना मनात निर्माण व्हायला लागली. खरच ह्या दहा वर्षात मी तिच्या साठी काय केले? ह्याचा विचार करून एक अपराधीपणाची भावना निर्माण व्हायला लागली. पुढील काही दिवसांत तर हि भावना  अधिकाधिक दृढ व्हायला लागली आणि उचलून नेण्याच्या भावनेनेच रोज माझ्या मनात उत्साह आणि एक वेगळीच संवेदना निर्माण व्हायला लागली, रोज सकाळी त्या क्षणाची मी  वाट बघू लागलो. रोज, ती पण सकाळी व्यवस्तीत तयार होवून उत्साहित दिसायला लागली. रोज कोणते कपडे घालवेत ह्या विषयी मी  देखील तिला उत्साहाने सांगू लागलो. "ती म्हणली, अशात काय झाले समजतच नाही , माझे सर्व कपडे मलाच अतिशय ढिले व्हायला लागले. आणि, अचानकच मला देखील हे जाणवले, ती फार रोड झालेली होती, कमी झालेले वजन तिला उचलून आणताना मला देखील प्रकर्षाने जाणवत होते. तिच्यासाठी काय परिस्थिती मी निर्माण केली ह्या भावनेने मला माझीच लाज वाटायला लागली. 

त्या दिवशी तर उचलून खाली आणताना मी नकळतच तिच्या कपाळावरून,केसांतून हळुवारपणे हात फिरवीत होतो. मुलाने हे बघून तोही आनंदाने टाळ्या वाजवीत होता. तिनेदेखील तिचे हात हळुवारपणे आणि अतिशय विश्वासाने माझ्या मानेभोवती गुरफटून घेतले होते. उचलून खाली ठेवताना दोघांनीही एकमेकांना नकळतच मिठीत घेतले. आणि मला क्षणात लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीचा तिला उचलून नेतानाच तो सुखद प्रसंग आठवला.    

तिच्या कमी होणाऱ्या वजनाची मात्र आता मला काळजी वाटायला लागली. शेवटच्या दिवशी तर तिला उचलल्यानंतर, उद्यापासून काय? ह्या विचाराने मला पुढे पाऊल देखील टाकणे अशक्य होत होते. मुलगा शाळेत गेला होता. मी तिला घट्ट मिठीत घेतले, प्रेमाने तिच्या शरीरावर हात फिरविला आणि म्हणलो," खरच, माझ्या ह्या अश्या वागण्यामुळे आपण एकमेकांपासून दूर गेलेलो होतो, मी तुझ्या भावना कधी समजू शकलोच नाही". क्षणात पुन्हा मेरीचा चेहरा डोळ्यासमोर आला, खूप विचार केल्यास कदाचित आपला निर्णय बदलेल म्हणून लगेच तिच्या पासून दूर होवून ऑफिस मध्ये गेलो.

 ऑफिस मध्ये जाताना जेनचेच विचार राहून राहून मनात येत होते. ऑफिस मध्ये गेल्याबरोबर हसूनमेरीने, हसून माझे स्वागत केले आणि प्रेमळपणे गळ्याभोवती हात टाकला. मी म्हणलो, "मेरी, माफ कर मला, पण मला आता जेन पासून घटस्फोट घेता येणार नाही. मला आता खऱ्या प्रेमाचा अर्थ समजलेला आहे, आणि माझी चूकही लक्षात आलेली". मेरी ने फाडकन माझ्या गालावर एक थापड मारली, खूप शिव्या दिल्यात आणि रडत रडत जोराने दार बंद करून निघून गेली. संध्याकाळी घरी जाताना एक सुंदर पुष्पगुछ  विकत घेतला, विकणारी ती मुलगी म्हणली, ह्या कार्डवर काय लिहू? मी हसलो आणि कार्डवर लिहिले,  " आता फक्त मृत्त्युच आपणाला वेगळे करू शकेल, तो पर्यंत रोज मी तुला असेच उचलून आपल्या bedroom  मधून खाली hall मध्ये आणेल, खूप प्रेम करेन आणि माझ्या चुकांची पूर्ण भरपाई करून तुला सुखात ठेवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेन".

अतिशय उत्साहाने, आनंदाने हातात  पुष्पगुछ घेवून घरी आलो, धावतच bedroom मध्ये गेलो, तर काय बघतोय, माझी जेन बेडवर शांतपणे झोपलेली होती, ती मरण पावलेली होती. जेन अनेक महिन्यांपासून cancer शी झागडीत होती. मी माझ्या कामात आणि मेरीच्या प्रेमात इतका गुरफटलेलो होतो कि मी जेनकडे आणि तिच्या आजाराकडे संपूर्ण दुर्लक्ष केलेले होते. ती मरणार हे तिला माहित होत, आणि घटस्फोटाचा विपरीत परिणाम मुलाच्या भविष्यावर होऊ नये म्हणूनच तिने एक महिन्याचा कालावधी मागितला होता. निदान, एक प्रेमळ पती हेच चित्र तिला मुलाच्या मनात ठसवावयाचे होते.

जीवनातील भौतिक सुख हि महत्वाची असतात, पण पती-पत्नी ने एकमेकांना समजून घेणे, एकरूप होवून जीवन जगणे अति महत्वाचे नाही काय? प्रेम हा जीवनातील सर्वात महत्वाचा खजिना आहे, आपल्या भागीदाराकडून काही अपेक्षा करताना, आपण स्वतः शी प्रामाणिक आहोत का?, आपल्या भागीदाराला समजून घेतोय का?, आणि त्याप्रमाणे जाणीवपूर्वक काही बदल स्वतः मध्ये करतोय का? एक साधी गोष्ट, पण सर्वाना खूप अंतर्मुख करणारी आणि खूप शिकवून जाणारी (रुची कुंटे देव हिने Face Book टाकलेल्या गोष्टीचा मराठी अनुवाद )